
>> सुधाकर वसईकर
मोबाईलचे दिवस अवतरलेत आणि पत्रांतून होणारे कागदावरचे संवाद क्रीनवर होऊ लागलेत. वाचक, लेखक आणि सगळेच हातातल्या मोबाईलवर आपल्या मनातले शब्द गिरवू नव्हे, तर ‘टच’ करू लागलेत. यामुळे काही चांगल्या गोष्टी हरवल्या, तर काही गवसल्याही. दूरवरून आलेल्या पत्रात, आंतर्देशीय पत्रात काय असेल याची ते फोडण्याआधीची हुरहुर हरवली. फार नाही साधारण 15-20 वर्षांपूर्वीचा काळ असेल. ख्याली-खुशाली पत्राद्वारे कळविली जात असे. त्यात आस्था होती, जिव्हाळा होता. वाट पाहण्याची फुरसत होती.
अभिजात मराठी साहित्यात तर पत्रलेखनाला अनन्यसाधारण महत्त्व आहे. सुनिताताईंनी पु. ल, जी. ए आणि माधव आचवल यांना लिहिलेली पत्रे आजही आवडीने वाचली जातात. पत्र स्वरूपात कथा, कादंबऱया लिहिल्या गेल्यात. त्यानिमित्ताने साहित्यिकांना मिळालेली वाचकांची पत्रे म्हणजे उत्तम प्रतिसादाची पोहोच पावती असे. खरे तर पत्रे, खलिता संवादांतूनच अनेक वाचनीय ग्रंथ हे दस्ताऐवज रूपात आजमितीस उपलब्ध आहेत. काल्लोघात पत्र मागे पडले असले तरी आजही माणसाच्या मनात ते अजूनही रुंजी घालतंय. मग कोणत्याही स्वरूपात असो लिहिलं जातंय. याची प्रचीती तपस्या नेवे आणि अमेय रानडे या लेखकद्वयीने लिहिलेले ‘पत्रावळ’ पुस्तक वाचून आली.
अमेय रानडे आणि तपस्या नेवे दोघेही ग्रंथपाल. अमेय रानडे उत्तम सूत्रसंचालक, दूरदर्शन वृत्तनिवेदक आणि तपस्या नेवे रंगकर्मी, उत्तम अभिनेत्री आणि निवेदक. दोघेही मनस्वी कलावंत. प्रस्तुत पुस्तकात उभयतांची खासगी, औपचारिक पत्रे दोन स्वतंत्र विभागांत वाचायला मिळतात. सदर पत्रातून साधलेला संवाद म्हणजे दोन जीवाभावाच्या व्यक्तींचं मनोगत आहे. एखादी क्षुल्लक गोष्ट असो वा मोठी घटना ती अगदी पोटतीडकीने आपल्या जवळच्या व्यक्तीला सांगावीशी वाटते. ती या लेखकद्वयीनी कागदावर उमटवली असून निखळ मैत्रीचा हृद्य संवादसेतू पत्रातून उभारला आहे.
अमेयने लिहिलेल्या सुरुवातीच्या पहिल्या विभागात 11 पत्रांमधून सूत्रसंचालक, वृत्तनिवेदक म्हणून घडत गेलेल्या ख्यातकीर्त कारकीर्दीची ओळख होते. राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय पातळीवर केलेल्या निवेदन कार्यक्रमातून आलेले अनुभव, त्यानिमित्ताने भेटलेल्या महनीय व्यक्तींची ओळख, तेथील सांस्कृतिक, भौगोलिक, राजकीय ऐतिहासिक स्थितीचे संदर्भही पत्रांमधून वाचायला मिळतात. मॉरिशस शहरात जे अनुभवलं त्याचा सुखद विलोभनीय आणि अविस्मरणीय वृत्तांत तसेच मॉरिशसची ‘पाचूचे बेट’ असलेली ओळख पत्रातून छान वर्णिली आहे. सुप्रसिद्ध उद्योजक रतन टाटा यांच्या निधनाच्या बातमीने झालेली अमेयच्या मनाची अस्वस्थता ‘सूर्यास्त’ पत्रातून वाचताना त्यांनी 750 रुपयापांसून केलेली नोकरी ते उद्योजक म्हणून उभं केलेलं टाटा समूहाचे साम्राज्य आदी जागवलेल्या हृद्य आठवणीतून त्यांचं हळवं व्यक्तित्व समोर येतं. डोंबिवलीचे ग्रंथोपासक सुनील मुंदडा, ज्यांनी प्रस्तुत पुस्तक लिहिण्याची प्रेरणा लेखकद्वयीला दिली आणि त्यांनीच स्वामीराज प्रकाशनातर्फे पुस्तकदेखील प्रकाशित केले. एक अवलिया, अष्टावधानी व्यक्तित्व रजनीश राणे यांची सांस्कृतिक, साहित्यिक क्षेत्राबाबत असलेली आस्था आणि झपाटलेपण याचा धावता आढावा पत्रातून छान घेतला आहे.
दुसऱया विभागातील 13 पत्रांमधून तपस्या नेवे हिने एक रंगकर्मी, अभिनेत्री म्हणून चोखाळलेली छंदवाट आणि बालनाटय़, एकांकिका स्पर्धा, ते व्यावसायिक नाटक त्यांचे दौरे, त्याचे किस्से, तसेच नाटकात रिप्लेसमेंट कलाकार हा कळीचा मुद्दा असतो. मात्र वाटय़ाला आलेल्या नामांकित नाटय़संस्थांच्या नाटकातील रिप्लेसमेंट भूमिकाही कलेवरील निष्ठा म्हणून निभावल्यात. याचे संदर्भ ‘तिसरी घंटा’ पत्रातून मिळतात. तसेच वैयक्तिक जीवनातील चढ-उतारांची हळवी अक्षरं वाचकाच्या मनावर उमटवली आहेत. आयुष्यात मिळालेला जोडीदारही नाटकात रिप्लेसमेंट करणाराच मिळाला. मात्र संसारसुख लाभले नाही. पती-पत्नी संबंधांतील ताण्या-बाण्याचे भयानक रूप ‘आज फिर जीनेकी तमन्ना है’ पत्रातून व्यथित करणारे आहे. जीवन पुढे पुढे चालत राहते. जीवनातील नाटय़प्रयोग कधीच थांबत नाहीत याची प्रचीती देणारी पत्रे भावविवश करणारी आहेत. तपस्या नेवेला जीवनात अनेक खडतर प्रसंगाना तोंड द्यावे लागले. आर्थिक विवंचनेतून सावरता सावरता ‘आई होती म्हणून’ पत्रातल्या एका प्रसंगात पोटचा मुलगा आराघ्य जेव्हा म्हणतो, “अशी आई नको मला” तेव्हा तिचा दुःखाचा झालेला कडेलोट वाचकाला सुन्न करतो. डोळ्यांच्या कडा ओलावतात.
80 पानांच्या या छोटेखानी पुस्तकातील पत्रे सहजसोप्या आणि ओघवत्या भाषाशैलीत लिहिली असल्याने पटकन वाचून होतात. खरे तर ही पत्रावळ नसून नातेसंबंधातली, भावभावनांची गुंफलेली अक्षरमाळ आहे. पत्र लिहिताना साधारणता शीर्षक दिले जात नाही. मात्र या पत्रांना शीर्षक दिल्याने ती पत्रलेख स्वरूपात वाचकांसमोर येतात. कडुगोड अनुभव देणारी पत्रे प्रासंगिक आहेत. तपस्या नेवे आणि अमेय रानडे या लेखकद्वयीचं हे पहिलेच पुस्तक असून ते चांगले ललित लेखन करू शकतात असा विश्वास निर्माण करणारी त्यांची पत्रे खचितच वाचनीय झाली आहेत. अर्थात वाचकांनी ही पत्रे मुळातून वाचायला हवीत.
पत्रावळ
लेखक ः तपस्या नेवे, अमेय रानडे
प्रकाशक ः स्वामीराज प्रकाशन
पृष्ठे ः 80 ह मूल्य ः 150/- रु.