लेख – वेब न्यूज -एटी ऍण्ड टीविरुद्ध तक्रार

427

>> स्पायडरमॅन

सध्याच्या तंत्रज्ञानाच्या काळात, आपण मोबाईलपासून ते केबलपर्यंत अनेक सेवांचा ऑनलाइन वापर करत असतो. त्यामुळे या व्यवहारात काही अडचणी आल्यास संबंधित सेवादात्याच्या ग्राहक तक्रार निवारण केंद्राशी संपर्क साधणे, आपल्या अडचणींचे कथन करून त्या सोडवून घेणे हेदेखील आपल्याला करत बसावे लागते. या सगळ्यात जर ग्राहकांची सगळ्यात मोठी तक्रार असेल तर ती म्हणजे त्यांनी ज्या सेवेसाठी सबस्क्राइब केलेले नाही, म्हणजेच जी सेवा मागितलेलीच नाही ती आपोआप त्यांच्या खात्याला जोडली जाणे आणि विनाकारण आर्थिक स्वरूपात त्याचा भुर्दंड बसणे ही असते. सेवादात्या कंपन्यांकडून केला जाणारा हा एक प्रकारचा गुन्हा आणि फसवणूकच असते. पण विचार करा, एखादी नावाजलेली कंपनी आपल्या ग्राहक निवारण केंद्रातील कर्मचाऱ्यांनाच हाताशी धरून ग्राहकांची फसवणूक करत असेल तर? एटी ऍण्ड टीसारख्या दिग्गज कंपनीवर अमेरिकेत यासंदर्भात नुकताच आरोप लावण्यात आला असून त्यासंदर्भात खटलादेखील दाखल करण्यात आला आहे.

न्यूयॉर्कच्या यूएस डिस्ट्रिक्ट कोर्ट सदर्न डिस्ट्रिक्टमध्ये हा खटला दाखल करण्यात आला आहे. एटी ऍण्ड टीने आपल्या इतर सेवांच्या ग्राहकांना कुठलीही पूर्वकल्पना न देता त्यांच्या ‘डायरेक्ट टीव्ही’ या सेवेला जोडले आणि डायरेक्ट टीव्हीच्या ग्राहकांच्यात वाढ होत असल्याचा खोटा आभास निर्माण केल्याचा यात आरोप करण्यात आला आहे. कंपनीने टाइम वॉर्नर या दुसऱ्या कंपनीमध्ये विलीन होण्यापूर्वी हा प्रकार केला असल्याचे समोर येत आहे. टाइम वॉर्नर विलीनीकरणाआधी ज्याने एटी ऍण्ड टी स्टॉक खरेदी केला आहे त्याच्या वतीने हा खटला दाखल करण्यात आला आहे. या फसवणुकीत सामील होण्यासाठी एटी ऍण्ड टीने आपल्या सेवा कर्मचाऱ्यांनादेखील प्रोत्साहन दिले आणि विक्री विभागातील जवळपास सर्वांनाच या फसवणुकीबद्दल संपूर्ण माहिती होती असा दावा एटी ऍण्ड टीच्या एका माजी कर्मचाऱ्यातर्फे या खटल्यात करण्यात आला आहे. मात्र हा दावा निराधार असून कंपनी पूर्ण ताकदीने याविरुद्ध लढेल असे एटी ऍण्ड टीतर्फे सांगण्यात आले आहे.

आपली प्रतिक्रिया द्या