लेख – कोरोना संकट; स्वच्छ हेतूंची गरज

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

>> योगेश मिश्र

सध्याचा कोरोना संकटाचा काळ एकत्रितपणे उभे राहण्याचा आहे. त्यात सरकारला यश येताना दिसत नाही. कोरोनाकाळात हैराण, हताश आणि निराश जनता आणि हा कालखंडच इतिहास कुणाचे कसे मूल्यमापन करेल हे ठरविणार आहे. हा केवळ वर्तमानाचा प्रश्न नाही. हा प्रश्न आपला भूतकाळ आणि भविष्यकाळाशीही जोडलेला आहे. त्यामुळे केवळ धोरणांच्या सहाय्याने नव्हे, तर स्वच्छ भावनेने हा प्रश्न हाताळला पाहिजे. केवळ मेंदूचा नव्हे, तर हृदयाशी संबंधित हा प्रश्न आहे.

मागील वर्षी देशाने कोरोना महामारीवर यशस्वीरीत्या नियंत्रण मिळवले होते, परंतु दुसऱया लाटेचा सामना करताना चुका केल्या. सरकारने राज्यांशी चर्चा न करताच लसीकरणाचे धोरण बदलले. याचा परिणाम असा झाला की, आतापर्यंत केवळ 2 टक्के लोकसंख्येचेच लसीकरण होऊ शकले आहे. राज्यांशी विचारविनिमय न करताच अचानक धोरण बदलण्यात आले. त्यामुळे लसीच्या पुरवठय़ावर परिणाम झाला, व्यापक स्वरूपात गोंधळ निर्माण झाला. लसींचा असा एक बाजार तयार झाला, ज्यात राज्ये आणि रुग्णालयाच्या यंत्रणा एकमेकांसमोर प्रतिस्पर्धी म्हणून उभ्या ठाकल्या.

मार्च महिन्यात दुसऱया लाटेमुळे कोरोनाची रुग्णसंख्या वाढण्यापूर्वीच केंद्रीय आरोग्यमंत्री डॉ. हर्ष वर्धन यांनी हिंदुस्थानात महामारीचा अंत झाल्याची घोषणा करून टाकली. हिंदुस्थानात हर्ड इम्युनिटी तयार झाली आहे, असे आकडय़ांच्या मॉडेलवरून चुकीचे सांगितले गेले. वस्तुस्थिती अशी होती की, ‘आयसीएमआर’ म्हणजे ‘इंडियन कौन्सिल ऑफ मेडिकल रिसर्च’ने केलेल्या सर्वेक्षणानुसार केवळ 21 टक्के लोकसंख्येमध्ये कोरोना विषाणूच्या विरोधात अँटीबॉडीज तयार झाल्या होत्या. दुसऱया लाटेदरम्यान सरकारने मोठय़ा चुका करून देशाला एका मोठय़ा संकटाच्या दिशेने ढकलले. म्हणूनच ‘आयसीएमआर’च्या महामारी विज्ञान विभागाचे प्रमुख डॉ. ललित कांत यांनी ‘लान्सेट’मध्ये प्रसिद्ध झालेल्या संपादकीयाविषयी सहमती व्यक्त केली आहे. ‘लान्सेट’ने ‘इन्स्टिटय़ूट फॉर हेल्थ मॅट्रिक्स ऍण्ड इव्होल्यूशन’च्या अंदाजाचा हवाला देऊन म्हटले आहे की, 1 ऑगस्टपर्यंत हिंदुस्थानात कोरोनामुळे होणाऱया मृत्यूंची संख्या दहा लाखांपर्यंत पोहोचू शकेल.

सद्यस्थितीत मोदी सरकारने विषाणूच्या जिनोम सिक्वेन्सिंगचा म्हणजे जनुकीय साखळीच्या शोधाचा विस्तार केला पाहिजे. म्हणजे नवीन व्हेरिएंट ओळखून त्यांच्यावर नियंत्रण आणता येणे शक्य होईल. सरकारने राष्ट्रीय लॉकडाऊन लावण्याचा विचार केला पाहिजे. तसे केल्याखेरीज सरकार कोरोनाच्या संसर्गाला लगाम घालू शकणार नाही. लसींचा पुरवठा आणि वितरण याची यंत्रणा निर्दोष करायला हवी. अशी वितरण प्रणाली तयार करायला हवी, जेणेकरून ग्रामीण भागात आणि गरीब लोकांनाही लसीची ढाल प्रदान करता येऊ शकेल. त्या लोकांकडे चिकित्सा आणि उपचारांसाठी कोणत्याच सुविधा उपलब्ध नाहीत.

तिकडे ऑस्ट्रेलियातील माध्यमांनी कोरोनाच्या प्रसारासाठी चीनलाच जबाबदार धरले आहे. ‘द वीकेण्ड ऑस्ट्रेलियन’ने एका सनसनाटी वृत्तांताद्वारे असा दावा केला आहे की, कोरोना विषाणू हा अचानक आलेला विषाणू नाही. चीन 2015 पासूनच त्याची तयारी करण्यात गुंतला होता. चीनच्या लष्कराने सहा वर्षांपूर्वीच कोविड-19 विषाणू हे जैविक हत्यार म्हणून वापरण्याचा कट रचला होता. हिंदुस्थानातील इस्रायलचे राजदूत रॉन माल्का यांनीही चीनकडे बोट दाखवत हा विषाणू अत्यंत संशयास्पद असल्याचे म्हटले आहे. चीनमधील एका संशोधन दस्तावेजाच्या आधारावर सनसनाटी रहस्यभेद करण्यात आला आहे. अहवालानुसार चीन सहा वर्षांपूर्वीपासूनच सार्स विषाणूच्या मदतीने जैविक अस्त्र्ा बनविण्याच्या प्रयत्नात होता.

अमेरिकेचे माजी अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी त्यांच्या कार्यकाळात अनेकदा या विषाणूला ‘चिनी विषाणू’ असे संबोधले होते. हा विषाणू चीनच्या प्रयोगशाळेत तयार झाला आहे, असे त्यांनी वारंवार म्हटलेही होते. अनेक देशांच्या अर्थव्यवस्था या विषाणूने उद्ध्वस्त केल्या असेही त्यांचे म्हणणे होते आणि अमेरिकी गुप्तचर संस्थांकडे या साऱयाचे पुरावे असल्याचा दावाही ट्रम्प यांनी केला होता. वेळ आल्यावर हे पुरावे जगासमोर मांडण्यात येतील असे त्यांनी म्हटले होते. ट्रम्प यांच्या व्यतिरिक्त जगातील अनेक देशांनी कोरोना विषाणूच्या संदर्भात सातत्याने चीनला घेरले आहे. चीनच्या भूमिकेवर सवाल उपस्थित केले आहेत. अमेरिका आणि ऑस्ट्रेलियानंतर आता इस्रायलनेही नाव न घेता या विषाणूच्या फैलावासंदर्भात चीनकडेच अप्रत्यक्षरीत्या बोट दाखविले आहे. हिंदुस्थानातील इस्रायलचे राजदूत रॉन माल्का यांनी म्हटले आहे की, कोरोना विषाणू अत्यंत संशयास्पद आहे आणि वेगवेगळ्या रूपात वारंवार येऊन तो आपल्याला आश्चर्यचकित करतो आहे.

मधल्या काळात कोरोनामुळे सर्वाधिक हाहाकार हिंदुस्थान आणि ब्राझीलमध्ये उडाल्याचे पाहायला मिळाले. हिंदुस्थानात गेल्या आठवडय़ापर्यंत दररोज तीन लाखांपेक्षा अधिक नवीन रुग्ण आढळत होते. मृत्यूंची संख्याही सातत्याने वाढत आहे. केवळ 24 तासांच्या कालावधीत जगभरात या विषाणूने 7.83 लाख लोकांना रुग्ण बनविले तर 13,022 लोकांचा मृत्यू झाला. हा धोकादायक विषाणू आतापर्यंत जगातील 15.83 कोटी लोकांना आजारी करण्यास कारणीभूत ठरला असून त्यामुळे आतापर्यंत सुमारे 33 लाखांहून अधिक लोकांनी जीव गमावला आहे. अर्थात काही देशांमधून सकारात्मक बातम्या येत आहेत. इस्रायल आणि स्पेनमध्ये मास्क आणि सोशल डिस्टन्सिंगचा नियम रद्द करण्यात आला आहे. अशा वेळी हिंदुस्थानात उमेद निर्माण होणे स्वाभाविक आहे. आपण तर देशाला विश्वगुरू म्हणून पाहू इच्छिणाऱया सरकारच्या अधिपत्याखाली आहोत. नोटाबंदीसारख्या निर्णयाच्या वेळी जनतेने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना डोळे झाकून पाठिंबा दिला होता. त्यामुळे आपला नेता संकटाच्या या घडीला डोळे बंद करून आपल्याला साथ देईल अशी उमेद लोकांमध्ये असणे अस्वाभाविक नाही. जनतेवर कोणत्याही प्रकारचा बोजा न लादता सरकार साथ देईल असे लोकांना वाटते. कारण कोरोना विषाणू खेडय़ापाडय़ात पोहोचला आहे. त्यासाठी जनता नव्हे, तर सरकार जबाबदार आहे. सरकारकडे जी संसाधने असतील त्यांसह सरकारने काम सुरू करायला हवे. देशातील बहुतांश राज्यांमध्ये भाजपची सरकारे आहेत. देशातील सर्वांत मोठय़ा राज्यातही भाजपचेच सरकार आहे, परंतु ही सरकारे चुकीची आकडेवारी आणि चुकीची वक्तव्ये करून लोकांना खोटाखोटा दिलासा देत होती, ही दुर्दैवाची बाब आहे. सध्याचा कोरोना संकटाचा काळ एकत्रितपणे उभे राहण्याचा आहे. त्यात सरकारला यश येताना दिसत नाही. कोरोनाकाळात हैराण, हताश आणि निराश जनता आणि हा कालखंडच इतिहास कुणाचे कसे मूल्यमापन करेल हे ठरविणार आहे. हा केवळ वर्तमानाचा प्रश्न नाही. हा प्रश्न आपला भूतकाळ आणि भविष्यकाळाशीही जोडलेला आहे. त्यामुळे केवळ धोरणांच्या सहाय्याने नव्हे, तर स्वच्छ भावनेने हा प्रश्न हाताळला पाहिजे. केवळ मेंदूचा नव्हे, तर हृदयाशी संबंधित हा प्रश्न आहे.