लेख – मुद्दा – कोरोनामुक्त गाव स्पर्धा

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

>> प्रदीप शंकर मोरे

अलीकडेच मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी जनतेशी संवाद साधताना कोरोनाचा प्रादुर्भाव रोखणाऱया गावांचा आणि गाव कोविडमुक्त करणाऱया पोपटराव पवार, ऋतुराज देशमुख आणि कोमल करपे या महाराष्ट्रातील तीन सरपंचांचे जाहीर कौतुक केले होते. त्यांच्या कोरोनामुक्तीच्या यशाने प्रेरित होऊन राज्यभरात कोरोनामुक्तीच्या प्रयत्नांना अधिक चालना देण्यासाठी राज्य सरकारने कोरोनामुक्त गाव स्पर्धा आयोजित केली आहे.

राज्यातील सहापैकी प्रत्येक महसुली विभागात चांगली कामगिरी करणाऱया पहिल्या तीन ग्रामपंचायतींना अनुक्रमे 50 लाख रुपये, 25 लाख रुपये व 15 लाख रुपये याप्रमाणे एकूण 18 पुरस्कार दिले जाणार असून त्यासाठी शासनाने 5 कोटी 40 लाख रुपयांची तरतूद केली आहे. कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव रोखण्यासाठी राज्य सरकारने राज्यात ‘माझे कुटुंब माझी जबाबदारी’, ‘मी जबाबदार’ अशी वेगवेगळी अभियाने राबवली आणि कोरोनाला मोठय़ा प्रमाणात रोखण्यात यश मिळविले. मात्र शहरी भागातील कोरोना आटोक्यात येत असताना कोरोनाच्या दुसऱया लाटेत ग्रामीण भागात कोरोनाचा फैलाव वाढत आहे.

या पार्श्वभूमीवर ग्रामीण भागातील कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी कोरोनामुक्त गाव स्पर्धेचे केलेले आयोजन स्वागतार्ह आहे. संत गाडगेबाबा ग्राम स्वच्छता अभियान यशस्वीपणे राबविणारा महाराष्ट्र या स्पर्धेच्या निमित्ताने कोरोनाचे कडवे आव्हान निश्चितपणे परतावून लावेल यात तीळमात्र शंका नाही.