
>> प्रा. सुभाष आठवले
कोरोना विषाणूने ग्रस्त झालेल्या आणि सुट्टय़ा घ्याव्या लागलेल्या शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱयांचा सदर कालावधी कुठलीही रजा न मानता नियमित करावा. शासनाने तसा निर्णय घ्यावा. संपूर्ण देशाचेच यंदाचे शैक्षणिक सत्र हे सर्वच तऱहेने न भूतो न भविष्यती असे ठरले आहे. मार्च महिन्यापासून केंद्र तसेच राज्य शासनाने कोरोना विषाणूंमुळे होणारे संक्रमण हा जागतिक साथीचा रोग म्हणून घोषित केला आहे. या विषाणूचे संक्रमण आणि प्रादुर्भाव रोखण्यासाठी शासनाने वेळोवेळी अनेक निर्णय घेतले. यामध्ये सातत्यपूर्ण शिक्षण क्षेत्राचा विशेष उल्लेख केला गेला आहे. शिक्षकांना त्यांच्या सर्व जबाबदाऱया पार पाडणे व वरिष्ठांनी बोलल्यानंतर तत्काळ कार्यालयात हजर होण्याचे निर्देश दिले गेले. सोबतच अनेक शिक्षकांच्या कोरोना विषाणूविरोधात लढण्यासाठी व उपाययोजनांची प्रभावी अंमलबजावणी करण्यासाठी सेवा घेण्यात आल्या.
शासनाच्या या लढय़ात शिक्षकांनी सर्वतोपरी साथ देत आपले नियमित कार्यदेखील तितक्याच धडाडीने पार पाडले आहे, परंतु दुर्दैवाने अनेक शिक्षकांना कोरोना विषाणूच्या संसर्गाची बाधा होऊन उपचारांसाठी दवाखान्यामध्ये दाखल व्हावे लागले. त्याचप्रमाणे काहींना कोरोना बधितांच्या संपर्कात आल्यामुळे किंवा आजाराची लक्षणे आढळल्यामुळे इन्स्टिटय़ूशनल तसेच होम क्वारंटाइन करण्याच्या सूचना दिल्या गेल्या. कोविड आजाराशी प्रदीर्घ लढा देऊन या विळख्यातून सुटल्यानंतर बाहेर आलेल्या शिक्षकांना संसर्ग रोखण्यासाठी तसेच स्वास्थ्य संवर्धनासाठी काही दिवस घरी राहण्याचा वैद्यकीय सल्ला देण्यात आला. हा सर्व कालावधी अत्यंत दुर्दैवी, जीवघेणा आणि त्रासदायक स्वरूपाचा होता.
अशा सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱयांच्या संबंधित कालावधीची गणना कशी करावी यासंदर्भात प्रशासकीय पातळीवर जरा संभ्रमाची परिस्थिती राज्यभर आढळत आहे. शिक्षकांसाठी मर्यादित असलेल्या वैद्यकीय रजा यावेळी खर्ची घातल्या जात असून तशा प्रकारची मान्यता अनेक महाविद्यालयांमध्ये देण्यात येत आहे. काही ठिकाणी किरकोळ रजा म्हणून गणली जात आहे.
अशी हजारो प्रकरणे राज्यभरातून समोर येत आहेत. ही बाब गंभीर स्वरूप धारण करीत आहे. विविध ठिकाणी वेगवेगळे निर्णय घेतले जाऊन शिक्षकांच्या या रजांसंदर्भात वेगवेगळे निकष लावण्यात येत आहेत व तशा स्वरूपाच्या नोंदी घेतल्या जात आहेत. अखिल भारतीय राष्ट्रीय शैक्षणिक महासंघाकडे यासंदर्भात अनेक शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱयांनी संपर्क साधला असून यावर शासनाकडे दाद मागून उचित निर्देश जारी करण्यासाठी आवश्यक ते प्रयत्न करावेत अशी विनंती केली आहे. हा विषय गंभीर आणि शिक्षकांच्या जिव्हाळ्याचा आहे. त्यामुळे शासनाने विनाविलंब यासंदर्भात उचित निर्देश संबंधित विभागास द्यावेत. तसेच महाविद्यालय स्तरावर त्या सूचना लवकरात लवकर पोहोचतील असेही पाहावे.
- संबंधित शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱयांच्या अनुपस्थितीचा कालावधी हा नियमित स्वरूपाचा समजण्यात यावा. त्याची गणना रजाकाळात करू नये. सोबतच आपत्ती व्यवस्थापन कायद्याच्या तरतुदीनुसार कोविड 19 आजारामधील गोपनीयतेच्या संदर्भातील सूचनांच्या अनुषंगाने कर्मचाऱयांकडून कुठलाही रजेचा अर्ज न घेता हा कालावधी नियमित समजून अशा प्रकारच्या अनुषंगिक नोंदी घेण्यात याव्यात.
































































