चिंता नको, दक्षता हवी

>> वैभव मोहन पाटील

कोरोनाचा कहर आता बऱयाच अंशी आटोक्यात आला आहे. दररोजची महाराष्ट्रभरातील रुग्ण संख्या साधारणतः 4 ते 5 हजारांच्या घरात आहे. रुग्ण बरे होण्याचे प्रमाण 90 टक्क्यांच्या वर गेलेले असून आजवर 17 लाख पॉझिटिव्ह रुग्णांपैकी साडेपंधरा लाख रुग्ण बरे होऊन घरी परतलेले आहेत. कोरोनामुळे होणाऱया मृत्यूंचे प्रमाणदेखील कमी झालेले असून मृत्यूदर सध्या 2.6 इतका आहे. रुग्ण नसल्यामुळे कोविड केअर सेंटर्स हळूहळू कमी करण्यात येत आहेत. या आजाराची लसदेखील लवकरच उपलब्ध होणार आहे. त्यामुळे येत्या काही दिवसांत कोरोना साथ नाहीशी होण्याच्या मार्गावर आहे असे म्हटल्यास ते वावगे ठरणार नाही. मात्र असे असले तरी गाफील राहून अजिबात चालणार नाही. सणासुदीचे दिवस सुरू आहेत तसेच सरकारने सर्वच व्यवहार अनलॉक करताना दैनंदिन व्यवहार व सार्वजनिक प्रवासाची सर्वच साधने मुक्त केलेली असल्यामुळे गर्दीचे प्रमाण मुख्यतः मुंबई, पुण्यासारख्या शहरांमध्ये वाढत आहे. यामुळे संसर्गाचा धोकादेखील वाढलेला आहे. तसेच जगातील काही देशांमध्ये या साथीची दुसरी लाटदेखील उद्भवल्याचे समोर येत आहे. त्यामुळे कोरोना एकदा येऊन गेला की पुन्हा परतणार नाही या भ्रमात राहून चालणार नाही. आज कोरोनाने आपल्याला शिकवलेली सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे व्यक्तिगत स्वच्छता व दक्षता. ही गोष्ट आपण जर कायमची अंगी बाळगली तर कोणत्याही प्रकारचा संसर्ग व त्यातून उद्भवणारे आजार आपल्याला जडणार नाहीत हे सर्वांनी लक्षात घेतले पाहिजे. त्यामुळे मास्क, सामाजिक अंतर व स्वच्छतेचे नियम सदासर्वदा पाळणे आवश्यकच आहे. हवेद्वारे, अन्नावाटे, पाण्यावाटे होणाऱया संसर्गाचा धोका पाहता प्रवासात मास्क, स्वच्छ व ताजे अन्न तसेच उकळलेले पाणी सेवन करणे हितावह आहे. प्रवासात, गर्दीत विशेष कटाक्षाने दक्षता घ्यावी लागेल. सौम्य लक्षणे असलेल्या व लक्षणे लपवणाऱया पॉझिटिव्ह व्यक्ती धोकादायक असून प्रवासात अशा व्यक्तींचे सानिध्य टाळणे आव्हानात्मक आहे. त्यामुळे प्रवासात विशेष काळजी घेणेच इष्ट आहे. परदेशी लोकांपेक्षा हिंदुस्थानींची प्रतिकारशक्ती अधिक असल्यामुळेच इथे या आजारातून बरे होण्याचे प्रमाण सर्वाधिक असून मृत्युदर कमी आहे. त्यामुळे कोरोनाची चिंता करण्याचे अजिबात कारण नाही, मात्र प्रतिबंधात्मक दक्षता हवीच.

आपली प्रतिक्रिया द्या