लेख – कोरोनाशी लढण्यासाठी नवरात्रीचा उपयोग करूया!

>> विलास पंढरी

टस्थापना करताना ज्या पदार्थांत देवतांकडून सात्त्विक लहरी आकर्षित करून घेण्याची क्षमता जास्त असते, ते पदार्थ घटात वापरतात. त्यामुळे ईश्वराकडून आकर्षित झालेली शक्ती त्यात साठवली जाऊन ती शस्त्रपूजेच्या वेळी मिळते. म्हणून आज आवश्यक असलेली रोगप्रतिकारक शक्ती या उत्सवातून सगळ्यांनाच मिळणार आहे अशा भक्तीने व श्रद्धेने हा उत्सव साजरा करायला हवा. सध्याच्या कोरोनाच्या संकटाशी लढण्यासाठीही नवरात्रोत्सवातून मिळणाऱया भक्ती आणि शक्तीचा उपयोग करायला हवा.

आनंद, उत्साह, गडबड, तयारी यांचा काळ म्हणजे कुठलाही उत्सव. आता नवरात्रोत्सवाला सुरुवात झाली आहे. सणांमध्ये नवरात्रोत्सवाला वेगळे महत्त्व अशासाठी की, हा उत्सव स्त्री-शक्तीच्या जागराचा आणि तिचा उदो उदो करणारा पवित्र उत्सव. स्त्री सन्मानाच्या या काळात अनेक महिला वेगवेगळे उपक्रम राबवत असतात, त्याचबरोबर काही नियमही घालून घेतात.
प्रचंड ऊर्जा, उत्साह, उमेद देणारा आणि वाइटावर चांगल्याचा विजय असा संदेश देणारा हा नवरात्रीचा उत्सव म्हणजे हिंदुस्थानींच्या महत्त्वाच्या सणांपैकी एक असला तरी गुजरात, महाराष्ट्र, पश्चिम बंगाल आणि दक्षिण हिंदुस्थानातील कर्नाटक, तामिळनाडू आणि आंध्र प्रदेश या राज्यांमध्ये श्रद्धा, भक्ती तसेच अधिक उत्साहपूर्ण वातावरणात साजरा होतो. पूर्ण नऊ दिवस उपवास करणे, एकभुक्त रहाणे, कुमारिका पूजन, अन्नदान, सवाष्णीचा सन्मान, देवीची ओटी भरणे असे विविध उपक्रम या काळात महिलांकडून केले जातात. सध्या सुरू असलेल्या कोरोना साथीच्या पार्श्वभूमीवर मास्क वापरणे, आवश्यक तेंव्हा स्वच्छ हात धुणे, सोशल डिस्टन्सिंग पाळणे, सध्या मंदिरात न जाणे, विनाकारण घराबाहेर न पडणे, कोरोनाची अनाठायी भीती न बाळगणे, लक्षणे आढळल्यास त्वरित तपासणी करून घेणे, रोज योग आणि प्राणायाम करणे आणि महत्त्वाचे म्हणजे या महामारीशी लढण्यासाठी सरकारने दिलेल्या सूचनांचे पालन करणे या नऊ संकल्पांचे पालन करण्याचे भाविकांनी ठरविले पाहिजे.

नवरात्र हा ऋतू परिवर्तनाचा काळ असतो. यामुळे आपल्यात नवीन शक्ती, नवा उत्साह, उमेद निर्माण होत असते. बृहत् संहितेनुसार सूर्य तसेच इतर ग्रहांमध्ये होणाऱया परिवर्तनाचा प्रभाव मनुष्याच्या आरोग्यावर आणि व्यवहारांवर होत असतो. सृष्टीतील परिवर्तन हा शक्तीचाच खेळ आहे. संयम, उपासना, यज्ञ केल्याने शरीरात रोगप्रतिकारक शक्ती वाढते. स्मरणशक्ती चांगली होऊन बौद्धिक विकास होतो. म्हणून नवरात्र हा शारीरिक व आत्मिक शुद्धतेचा काळ आहे असे मानले जाते. घटस्थापना करताना ज्या पदार्थांत देवतांकडून सात्त्विक लहरी आकर्षित करून घेण्याची क्षमता जास्त असते, ते पदार्थ घटात वापरतात. त्यामुळे ईश्वराकडून आकर्षित झालेली शक्ती त्यात साठवली जाऊन ती शस्त्रपूजेच्या वेळी मिळते. म्हणून आज आवश्यक असलेली रोगप्रतिकारक शक्ती या उत्सवातून सगळ्यांनाच मिळणार आहे अशा भक्तीने व श्रद्धेने हा उत्सव साजरा करायला हवा.

घरगुती शारदीय उत्सव हा महाराष्ट्र व पश्चिम बंगालमधील मोठा उत्सव असून त्याला सार्वजनिक स्वरूप विशेषतः महाराष्ट्रात गेल्या पंधरा-वीस वर्षांत आले आहे. स्थापनेच्या दिवशी मोठय़ा मिरवणुका काढण्याची पद्धत रूढ झाली आहे. अर्थात इतर अनेक उत्सावांप्रमाणेच कोरोनाच्या साथीमुळे सार्वजनिकरीत्या साजऱया होणाऱया या उत्सवावरही सरकारने बंधने टाकली आहेत आणि ती आवश्यकही आहेत.

दीप हे तेजाचे प्रतीक आहे व नवरात्रात वायूमंडल शक्तितत्त्वात्मक तेजाने भारीत असल्याने सतत तेवत असलेल्या दीपाच्या ज्योतीकडे तेजतत्त्वात्मक लहरी आकृष्ट होतात. अखंड दीपप्रज्वलनाने या लहरींचे वास्तूत सातत्याने संक्रमण होते; म्हणून दीप अखंड तेवत ठेवण्याला नवरात्रात महत्त्व आहे.

सर्व देवांच्या ठिकाणी असलेल्या शक्तींचे दैवतीकरण होऊन त्या शक्तीरूप मूर्तीला देवी असे नाव मिळाले आणि शाक्त संप्रदायी लोकांनी तिला सर्वश्रेष्ठ देवता, आदिमाया किंवा जगदंबा म्हणून गौरविले. देवीची उग्र व सौम्य अशी दोन रूपे पाहायला मिळतात. उमा, गौरी, पार्वती, जगदंबा, भवानी ही देवीच्या सौम्य रूपाची नावे असून दुर्गा, काली, चंडी, भैरवी, चामुंडा ही देवीची उग्र रूपे आहेत.

1. शैलपुत्री, 2. ब्रह्मचारिणी 3. चन्द्रघंटा 4. कूष्मांडी (किंवा कुष्मांडी) 5. स्कंदमाता 6. कात्यायनी 7. कालरात्री 8. महागौरी 9. सिद्धिदात्री अशी देवीची नऊ रूपे आहेत.

नवरात्रीतील नऊ दिवसांच्या काळात दुर्गादेवी तेजतत्त्वाच्या आधारे आपल्या नऊ प्रमुख शस्त्रांसहित ब्रह्मांडात विहार करते, असा समज आहे. आदिशक्तीचे हे दरदिवशी नव्या रूपासहित भ्रमण करणे म्हणजेच दरदिवशी चढत्या क्रमाने सप्तपाताळांतून पृथ्वीवर येणाऱया त्रासदायक लहरींचे समूळ उच्चाटन करणे, अशी समजूत आहे. हे नऊ दिवस ब्रह्मांडात वाईट शक्तींनी प्रक्षेपित केलेल्या त्रासदायक लहरी तसेच आदिशक्तीच्या मारक व चैतन्यमय लहरींचे युद्ध चालू असते. या वेळी ब्रह्मांडातील वातावरण तप्त झालेले असते व दुर्गादेवीच्या शस्त्रांतून तेजाची झळाळी अतिवेगाने सूक्ष्म शक्तींवर हल्ला करत असते, अशी कल्पना आहे. याचे प्रतीक म्हणून घट व त्यातील नंदादीप यांना प्रतीकात्मक रूपात पुजले जाते. घटात दीपाच्या उष्णतेमुळे निर्माण झालेले वातावरण हे ब्रह्मांडात नऊ दिवस अहोरात्र सुरू असलेल्या युद्धातून निर्माण झालेल्या तप्त वायुमंडलाशी साधर्म्य दर्शवते, तर दीप हा आदिशक्तीच्या शस्त्रास्त्रांतून निर्माण होणाऱया तेजाचे प्रतीक म्हणून कार्य करतो. घरात घटपूजन केल्याने वास्तूमध्येही दुर्गादेवीचे चैतन्य कार्यरत होऊन वास्तूमधील त्रासदायक लहरींचे निर्दालन करते, अशी यामागची धार्मिक श्रद्धा आहे. मार्कंडेय पुराणातील देवी महात्म्यात सांगितले आहे की, शरद ऋतूतील वार्षिक महापूजेत देवीमहात्म्य भक्तिपूर्वक ऐकल्यास सर्व बंधनांपासून व्यक्ती मुक्त होते आणि धनधान्याने परिपूर्ण होते.

जोगवा मागणे हा एक प्रकारचा देवीची उपासना करण्याचा प्रकार आहे. देवीचा कुलधर्म म्हणूनही जोगवा मागितला जातो. मंगळवारी, शुक्रवारी, पौर्णिमेला किंवा नवरात्रात जोगवा मागितला जातो. परडीमध्ये देवी ठेवून किमान पाच घरी जाऊन मूठभर तांदूळ किंवा पीठ मागणे याला जोगवा मागणे असे म्हणतात. हे उपासक गळ्यात कवडय़ांची माळ घालतात. अहंकाराचे विसर्जन करावे असा यामागचा हेतू असावा असे वाटते. एकनाथ महाराजांनी या जोगव्यावर एक सुंदर भारुड रचले आहे.

अनादी निर्गुण प्रगटली भवानी
मोह महिषासुर मर्दना लागुनी
त्रिविध तापांची कराया झाडणी
भक्तांलागुनी पावसी निर्वाणी।।
आईचा जोगवा जोगवा मागेन
द्वैत सारुनी माळ मी घालीन
हाती बोधाचा झेंडा घेईन
भेदरहित वारिसी जाईन।।
नवविधा भक्तीच्या करीन नवरात्रा
करुनी पोटी मागेन ज्ञानपुत्रा
धरीन सद्भाव अंतरीच्या मित्रा
दंभ सासऱया सांडीन कुपात्रा।।

या भारुडात जोगवा मागण्याच्या विधीचे स्वरूप आणि तो मागण्यामागचे हेतू अप्रत्यक्षपणे व्यक्त झाले आहेत.

नवरात्रीतल्या पाचव्या दिवसाला ललिता पंचमी (महालय), आठव्या दिवसाला महाअष्टमी (दुर्गाष्टमी) आणि नवव्या दिवसाला महानवमी म्हणतात.

देवी भागवतात देवीची देशात 108 शक्तिपीठे असल्याचा उल्लेख आहे. त्यांपैकी महाराष्ट्रात साडेतीन पीठे आहेत. महाराष्ट्राची कुलस्वामिनी तुळजापूर येथील आई तुळजाभवानी, कोल्हापूरची महालक्ष्मी आणि माहुरची रेणुका हे प्रत्येकी एक आणि नाशिक जिह्यातील सप्तशृंगीचे अर्धे पीठ आहे. याव्यतिरिक्त अर्धे पीठ असल्याचा कोणताही उल्लेख त्यात सापडत नाही.

आपली प्रतिक्रिया द्या