मुद्दा – वेळेत निदान आणि वेळेत उपचार हाच पर्याय

>> वैभव मोहन पाटील

जगभरासह हिंदुस्थानात कोरोना विषाणूने थैमान घातले आहे. देशातील कोरोनाबाधितांचा आकडा 50 लाखांपेक्षा जास्त झाला आहे. कोरोनामुक्त रुग्णांची संख्या वाढत असली तरी दैनंदिन रुग्णवाढीच्या तुलनेत बरे होण्याचे प्रमाण दिलासादायक आहे. आतापर्यंत सुमारे 37 लाख रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. तर सुमारे 78 हजार जणांचा कोरोनामुळे बळी गेला आहे. मृत्यूदर हा 1.6 टक्के आहे. बरे होणारे देशातील 60 टक्के रुग्ण महाराष्ट्र, तामिळनाडू, आंध्र प्रदेश, कर्नाटक आणि उत्तर प्रदेश या 5 राज्यांतील आहेत. कोरोनाच्या परिस्थितीवर नियंत्रण मिळविण्यासाठी केंद्र व राज्य सरकारमार्फत सर्वतोपरी प्रयत्न केले जात आहेत. आरोग्य मंत्रालयाने देशातील कोरोना परिस्थितीसंदर्भात एक अहवाल जारी केला असून त्यानुसार कोरोनाबाधितांची प्रकृती सुधारण्याचा वेग हा सर्वाधिक असून मे महिन्यात जवळपास 50 हजार रुग्ण बरे झाले तर सप्टेंबर महिन्यात हीच आकडेवारी 36 लाखांहून अधिक आहे. लोकांच्या मनात कोरोनाबद्दलची भीती कमी झाली तर रुग्ण बरे होण्याच्या प्रमाणात झपाटय़ाने वाढ होऊ शकते. कोरोनाची साथ ही अन्य साथींप्रमाणेच एक आहे हे समजून घेतले पाहिजे. कोरोना साथरोगाच्या सुरुवातीच्या काळात रुग्णांचा पहिला एक लाखाचा टप्पा 64 दिवसांनी गाठला गेला होता. आता जवळपास तेवढी रुग्णसंख्या 24 तासांमध्ये पार केली जात आहे. सध्या महाराष्ट्रात कोरोना रुग्ण बरे होण्याचा दर 77.77 टक्क्यांवर पोहोचला आहे. कोरोना विषाणूवरची लस किंवा औषधीसंबंधीच्या बातम्यांमुळे लोकांच्या मनात संभ्रमावस्था आहे. मास्क व सोशल डिस्टन्सिंगचे नियम पाळणे हा एकमेव मार्ग सध्या या आजारावर उपाय आहे. कोरोना महामारीमुळे संपूर्ण देशाचे अर्थकारणही पूर्णतः बिघडले आहे. कोरोना प्रकोप अजूनही थांबलेला नाही. तेव्हा आपण आपल्या आरोग्याची काळजी घेणे हा एकमेव उत्तम पर्याय जनतेपुढे आहे. कोरोनावर लस अथवा औषध येईल तेव्हा येईल, पण लोकांनी आपल्या आरोग्याची काळजी घ्यायला शिकले पाहिजे. आपल्या परिसरात कोरोनाबाधित असो वा नसो, आपल्याला कोरोनाची लक्षणे असतील वा नसतील तरीही प्रत्येकाने घराबाहेर पडताना मास्क वापरायलाच हवा. सरकार वारंवार विविध माध्यमांतून या सूचना लोकांना देत आहे. मात्र तरीदेखील ग्रामीण भागांत आज अनेक लोक मास्क न लावता फिरताना दिसतात. सर्व व्यवहार सुरळीत सुरू करताना मास्कचा उपयोग, सुरक्षित अंतर, निर्जंतुकीकरणाचा वापर याशिवाय वैयक्तिक, कौटुंबिक तसेच सार्वजनिक आयुष्यात स्वच्छतेचा अवलंब करणे अनिवार्य झाले आहे. आजारपण अंगावर काढण्याचे दिवस आता संपले. त्यामुळे आरोग्याची कोणतीही समस्या असेल तर तातडीने वैद्यकीय उपचार सुरू करणे हितकारक आहे. कोरोना आजाराची जास्त भीती बाळगली तर तो जीवघेणा ठरू शकतो. त्यामुळे वेळेत निदान व वेळेत उपचार हे सूत्र प्रत्येकाने अंगी बाळगले तर कोरोनाला घाबरण्याचे काहीच कारण नाही.

आपली प्रतिक्रिया द्या