
>> हविशेष बेडेकर
अवघ्या 88 दिवसांवर येऊन ठेपलेली आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेची सर्वोच्च मानांकित टी-20 विश्वचषक स्पर्धा येत्या ऑक्टोबरमध्ये ऑस्ट्रेलियात होणार आहे. यासाठी देशांतर्गत द्विपक्षीय सामने होत असून आपल्या शक्तिप्रदर्शनातून प्रबळ दावेदारी सिद्ध करण्यासाठी सर्वच संघ कसून तयारीला लागले आहेत. गतविजेत्या ऑस्ट्रेलिया संघाने श्रीलंकेला धूळ चारत अष्टपैलू खेळ दाखवला. हिंदुस्थानने इंग्लंडविरुद्ध त्यांच्याच धर्तीवर मालिका जिंकून आपली भक्कम बाजू बळकट करण्याकडे लक्ष दिले.
हिंदुस्थान कायमच विश्वचषक स्पर्धेत प्रबळ दावेदार राहिला आहे, परंतु यंदा ही स्पर्धा हिंदुस्थानसाठी तीन प्रमुख कारणांमुळे लक्षवेधी ठरणार आहे. सलामीवीर विस्फोटक फलंदाज व आयपीएलमध्ये मुंबई इंडियन्सकरिता आपल्या नेतृत्व शैलीने चारहून अधिक चषके पटकावणारा नवनिर्वाचित कर्णधार रोहित शर्मा, रवी शास्त्री यांच्या सफल कारकीर्दीनंतर युवा खेळाडूंचा मार्गदर्शक The Wall आता प्रशिक्षक म्हणून राहुल द्रविड आणि 2016-19 दरम्यान क्रिकेट जगतात आपल्या अजब-अफलातून खेळीने वेगळे स्थान निर्माण केलेला, परंतु गेल्या दोन वर्षांपासून सूर गमावलेला दबंग फलंदाज विराट कोहली, याच पार्श्वभूमीवर हिंदुस्थानी संघाची तयारी, ऑस्ट्रेलियातील वर्चस्व (बलाबल) आणि प्रासंगिक संभाव्य संघ काय असू शकतो याची उत्सुकता सगळ्यांना आहे.
संघाची तयारी
आज हिंदुस्थानात आयपीएलमुळे प्रतिभावान खेळाडूंची उत्तम फळी निर्माण झाली असून प्रशिक्षक व निवड समितीला भरपूर पर्याय उपलब्ध आहेत. दीपक हुड्डा व ऋतुराज गायकवाडसारखे उत्तम फलंदाज, आवेश खान, अर्शदीप सिंह व उमरान मलीक हा वेगवान गोलंदाज तसेच पुनरागमन करणारा दिनेश कार्तिक आघाडीवर आहेत.
खऱ्या अर्थाने इंग्लंड दौऱ्यापासून अंतिम संघ निवडीची प्रक्रिया सुरू होत आहे. इंग्लंडप्रमाणेच ऑस्ट्रेलिया उपखंडात एकंदरीत वातावरण व खेळपट्टी कमीअधिक प्रमाणात सारखी असल्यामुळे या परिस्थितीत कोण उत्तम कामगिरी करतो याकडे निवड समितीचे लक्ष असेल. इंग्लंडविरुद्ध टी 20 मालिकेत हार्दिक पंडय़ा, रवींद्र जाडेजा आणि दिनेश कार्तिक हे अष्टपैलू समीकरण अचूक ठरले. रिषभ पंतला सलामीला संधी देऊन मधल्या फळीचे रुंदीकरण करण्याचा प्रयत्न काहीसा सफल ठरला, परंतु यामध्ये सगळ्यात लक्षवेधी ठरला तो म्हणजे जादुगार भुवनेश्वर कुमार. गेल्या सत्रात अंतिम 11 मध्ये आपले स्थान मिळवण्यात डळमळीत असलेल्या भुवनेश्वर कुमारने आपल्या जादुई मनगटातून नियंत्रित इनस्विंग व आऊटस्विंगच्या बळावर इंग्लंडच्या बटलर, रॉयसारख्या विस्फोटक फलंदाजांना स्वस्तात परतवून लावले. ऑस्ट्रेलियातील हिरवी खेळपट्टी भुवनेश्वर कुमारला चांगलीच पोषक ठरू शकते.
कर्णधार रोहित शर्मा
टी-20 जलदगती क्रिकेट प्रकार असल्यामुळे कर्णधार कायम जागृत असणे आवश्यक आहे. इथे सहसा चुकीला माफी नाहीच. रोहित शर्मा अतिशय हुशार, चपळ व चलाख असून जिगरबाज निर्णय घेण्याची क्षमता राखतो. प्रतिस्पर्धी संघाची कमकुवत बाजू न शोधता आपल्या संघाच्या जमेच्या बाजूवर मुंबई इंडियन्सकरिता अनेक सामने रोहितने जिंकून दिले आहेत. 2019 मध्ये चेन्नईविरोधात अंतिम सामन्यात अटीतटीच्या वेळी संयम राखून खडतर परिस्थितीत संघाला विजय मिळवून दिला आहे. परिणामी रोहित शर्मा येणाऱ्या विश्वचषक स्पर्धेत लक्षवेधी ठरू शकतो.
विराट कोहली (सूर निरागस हो)
विराट कोहलीला कुठल्याही परिचयाची गरज नाही, परंतु सध्याच्या काळात तो जितका तळपतो तेवढी त्याची बॅट तळपत नाही. आयपीएल 2022 मध्ये बहुतांश सामन्यांत विराटला नशिबाची साथ लाभली नाही आणि जेव्हा सूर गवसला तेव्हा गोलंदाजाचा सगळ्यात उत्तम बॉल विराटच्या बॅटला शिवून गेला. कर्णधारपद सोडल्यानंतर विराट एका वेगळ्या आक्रमक भूमिकेत दिसेल असे वाटले, परंतु तसे काही घडले नाही. कव्हर ड्राईव्हची बादशाहत असलेल्या विराटला तोच आखूड टप्प्याचा बाहेर जाणारा बॉल डोकेदुखी ठरला आहे. 2020 पासून कोहलीने गेल्या 24 डावांत सरासरी 42 ने 675 धावा केल्या आहेत, जे त्याच्या एकूण कारकीर्दीच्या विपरीत आहे. अंतर्गत स्पर्धा बघता श्रेयस अय्यर, संजू सॅमसन, शिखर धवनसारखे फलंदाज संघाबाहेर असताना विराट कोहलीची जागा निर्णायक असून प्रशिक्षक द्रविड काय निर्णय घेणार हे लक्षवेधी असेल.
29 जुलैपासून विश्वचषकाचे दोन वेळा (2012 व 2016) मानकरी असलेल्या वेस्ट इंडीज संघाबरोबर पाच टी-20 सामने खेळणार आहे. वेस्ट इंडीजमधील खेळपट्टी ऑस्ट्रेलियाच्या ऍडलेड तसेच सिडनी ग्राऊंडप्रमाणे फिरकीला साथ देणाऱ्या असल्यामुळे चहलबरोबर अश्विन, बिश्नोई, कुलदीप यादव यातून पर्याय म्हणून निवड करता येईल. त्याचबरोबर दुखापतीतून परतलेल्या लोकेश राहुल आणि बुमराहच्या अनुपस्थितीत वेगवान गोलंदाज अवेश खान, हर्षल पटेल, अर्शदीप सिंह यांच्या कामगिरीकडे लक्ष असेल.






























































