लेख – वेब न्यूज – वैद्यकीय मदतीच्या नावाने फसवणूक

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

>> स्पायडरमॅन

कोरोनाच्या दुसऱया लाटेने देशभरातच हाहाकार माजवलेला आहे. रुग्णांची वाढती संख्या आणि मृत्यूचे वाढते प्रमाणदेखील चिंताजनक आहे. सरकारी यंत्रणेबरोबरच वैद्यकीय यंत्रणादेखील जीव तोडून या कोरोनाविरुद्धच्या लढाईत झुंजत आहे. मात्र अचानक वाढलेली रुग्णांची संख्या, जनतेत अजूनही असलेली बेफिकिरी आणि नियम पायदळी तुडवण्याची वृत्ती त्यामुळे या दोन्ही यंत्रणांवर प्रचंड ताण येतो आहे.

विशिष्ट औषधे, ऑक्सिजन आणि रुग्णांसाठी बेड मिळवण्यासाठी नातेवाईकांचीदेखील प्रचंड फरफट होताना दिसत आहे. या अशा संकट काळातच, लोकांच्या अडचणींचा गैरफायदा घेऊन त्यांची फसवणूक करत स्वतःचे खिसे भरणाऱया अनेक टोळ्या सक्रिय झाल्या आहेत. बरेच लोक मदतीसाठी सोशल मीडियाचा आधार घेत आहेत. फेसबुक, व्हॉट्सअॅप, ट्विटर अशा माध्यमातून आपल्या आप्तांसाठी बेड, इंजेक्शन अथवा प्लाझ्माची विनवणी करत आहेत. अशा लोकांना टार्गेट करून हे कोरोना ठग त्यांच्याशी संपर्क साधत आहेत आणि तातडीने वैद्यकीय मदत मिळवून देण्याचे अमिष दाखवून अडचणीत सापडलेल्या लोकांची आर्थिक फसवणूक करत आहेत.

बेड मिळवून देण्यासाठी, ऑक्सिजन सिलेंडर तातडीने उपलब्ध करून देण्यासाठी म्हणून लोकांकडून हे ठग पैसे उकळतात आणि त्यानंतर मोबाईल बंद करून नाहीसे होतात. गृह मंत्रालयाच्या अखत्यारीत असलेल्या सायबर गुन्हे शाखेच्या ‘सायबर दोस्त’ शाखेने यासंदर्भात नागरिकांना सावधगिरीची सूचना दिली आहे. त्याचबरोबर काही टोळ्या तर प्रसिद्ध सामाजिक संस्था अथवा एनजीओचे अधिकारी असल्याची बतावणी करून रुग्णांना आणि त्यांच्या नातेवाईकांना टोप्या घालत आहेत. महाराष्ट्र पोलिसांच्या सायबर सेलनेदेखील नागरिकांना सावधगिरीच्या काही सूचना दिल्या आहेत. त्यात सोशल मीडियावर मदत मागताना शक्यतो खाजगी माहिती, आधार नंबर अथवा संपर्क क्रमांक शेअर न करण्यासंदर्भात सूचना दिल्या आहेत. ऑनलाईन औषधे आणि इंजेक्शन उपलब्ध करून देण्याच्या नावाखाली सर्वात जास्ती आर्थिक फसवणूक होण्याचा धोका असून अधिकृत औषध विक्रेत्यांकडेच औषधे खरेदी करण्याचा सल्लादेखील दिला आहे.