
>> प्रसाद ताम्हनकर
मागच्या लेखात आपण उत्तर कोरियाच्या हॅकर्सनी बांगलादेश बँकेच्या परकीय चलनावर कसा डल्ला मारला त्याची थरारक कथा आपण पाहिली. या धाडसी सायबर दरोड्यानंतर या चलाख गुन्हेगारांचा माग काढणे आणि मुख्य म्हणजे हा दरोडा कसा घातला गेला याचा तपास लावणे हे चौकशी अधिकाऱयांपुढचे सगळ्यात मोठे आव्हान होते!
‘एफबीआय’च्या सांगण्यानुसार या सगळ्या प्रकरणात उत्तर कोरिया हा देश प्रमुख संशयित असून जगभर पसरलेल्या काही उत्तर कोरियन हॅकर्सना एकत्र करून हा दरोडा टाकण्यात आला. या हॅकर्सच्या ग्रुपला उत्तर कोरिया प्रशासनाची मदत मिळत होती. सायबर सिक्युरिटीच्या क्षेत्रात या उत्तर कोरियन हॅकर्सच्या ग्रुपला ‘लाझरस (Lazarus)’ म्हणून ओळखले जाते.
या सगळ्या प्रकरणाची सुरुवात कशी झाली याचा शोध घेताना तपास अधिकाऱयांना अनेक आश्चर्यकारक गोष्टी आढळल्या. 2015 साली बांगलादेश बँकेच्या काही कर्मचाऱयांना एक अत्यंत साध्या प्रकारात मोडणारा ई-मेल प्राप्त झाला. रोज येणाऱया सामान्य ई-मेल्ससारखाच, तो एक नोकरीची मागणी करणारा ई-मेल होता. ‘रसेलआलम’ नावाच्या व्यक्तीकडून तो ई-मेल पाठवण्यात आला होता. पुढच्या चौकशीत ‘रसेलआलम’ नावाची कोणी व्यक्ती अस्तित्वात नसून ‘लाझरस’ ग्रुपने आपल्या मोहिमेसाठी या टोपण नावाचा वापर करून जाळे फेकले असल्याचे उघड झाले. मात्र त्या वेळी या जाळ्यात बँकेचा एक कर्मचारी मात्र अडकला आणि त्याने या ई-मेलवर विश्वास ठेवला. या ई-मेलमध्ये ‘रसेलआलम’ने एका वेबसाईटवरून आपला cv आणि नोकरीची मागणी करणारे ‘कव्हर लेटर’ डाऊनलोड करण्याची विनंती केली होती. या विनंतीनुसार बँक कर्मचाऱयाने रसेल आलमचा cv आपल्या बँकेच्या संगणकावरती डाऊनलोड केला आणि घात झाला! त्या cvमध्ये लपवलेल्या व्हायरसने बँकेच्या संगणकात प्रवेश केला.
एकदा एका संगणकात प्रवेश केल्यावर मग या व्हायरसने एका संगणकातून दुसऱया संगणकात, दुसऱया संगणकातून तिसऱयात अशा उड्या मारत बँकेच्या मेन डिजिटल लॉकरच्या सर्व्हरमध्ये प्रवेश मिळवला. आश्चर्याची गोष्ट म्हणजे एकदा फिशिंग ई-मेलद्वारे बँकेच्या संगणक प्रणालीमध्ये प्रवेश केल्यानंतर जवळजवळ वर्षभराने हॅकर्सनी या धाडशी दरोड्याची अंमलबजावणी केली. वर्षभरात कधी ना कधी बँकेच्या कुठल्या तरी संगणकात आपला शोध लागेल आणि आपण पकडले जाऊ याची भीती हॅकर्सना नव्हती का? त्यांनी हा धोका का पत्करला असावा? त्यांनी हा धोका पत्करला, कारण पुढचे वर्षभर अत्यंत सुनियोजित असे बेत आखून, हॅकर्सनी हा सर्व डिजिटल पैसा सुरक्षितपणे बाहेर काढण्याचा मार्ग या काळात तयार केला होता.
4 फेब्रुवारी 2016 रोजी रात्री बरोबर 8.30 वाजता हॅकर्सनी आपल्या कामाला सुरुवात केली आणि बांगलादेशच्या परकीय चलनाच्या खात्यामधून कोटय़वधी डॉलर्स दुसरीकडे ट्रान्सफर व्हायला सुरुवात झाली. जवळजवळ 95 करोड डॉलर्स ट्रान्सफर करण्यात हॅकर्सना यश मिळाले. बांगलादेशचे संपूर्ण परकीय चलन खाते रिकामे झाले होते असे म्हणायला हरकत नाही. आठवड्याच्या शेवटी जेव्हा या धाडशी दरोड्याचा सुगावा लागला. तोवर हॅकर्सही बरेच लांब गेले होते आणि बांगलादेशचा बराचसा पैसादेखील. चोरी झालेला पैसा नक्की परत मिळेल अशी खात्री वाटत असल्याने गव्हर्नरनेदेखील या चोरीसंदर्भात सरकारला काही कळवले नाही. पण पैशाचा माग घ्यायला सुरुवात झाली आणि एक मोठा हिस्सा फिलिपिन्सला पोचल्याचे उघड झाले. बँकेच्या अधिकाऱयांनी या पैशाच्या परतीची मागणी करताच फिलिपिन्सच्या बँक अधिकाऱयांनी कायद्याचा दाखला देत न्यायालयाच्या आदेशाची मागणी केली. मग मात्र बांगलादेश सरकारपर्यंत ही गोष्ट पोहचली आणि बांगलादेशाने अधिकृतपणे या चोरीला गेलेल्या रकमेवर दावा सांगितला आणि न्यायालयात केस दाखल केली. ही केस दाखल झाली आणि बराच काळ लपून असलेला हा धाडशी सायबर दरोडा जगाच्या समोर आला, ज्याने संपूर्ण सायबर विश्वालाच थक्क केले.


























































