90 वर्षांची चिरतरुण राणी

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

>> आसावरी जोशी

दिमाखदार… रुबाबदार दख्खनची राणी आज 90 वर्षांची होते आहे. त्यानिमित्ताने तिच्या राजेशाही थाटाची चित्तर कथा.

गेली 90 वर्षं मुंबई-पुणे असा 100 मैलांचा प्रवास रोज जवळपास 3500 प्रवाशांना पोटात घेऊन मोठय़ा दिमाखात करते आहे. मुंबई-पुणे आज अक्षरशः अनेक मार्गांनी जोडले गेले आहे. अनेक पदरी महामार्ग, शिवनेरी बससेवा, स्वतःचे वाहन इ.इ. अगदी दख्खनच्या राणीलाही अनेक पर्याय तिच्या पावलावर पाऊल ठेऊन पुणे-मुंबई धावत आहेत. पण तरीही राणीचा दिमाख आजही वयाच्या नव्वदीतही त्याच तोऱयात..रूबाबात टिकून आहे. मी स्वतः राणीच्या सोबतीने एकटीने पुणे-मुंबई अंतर खुपदा पार केल्याने तिच्याशी अनेक आठवणी जोडल्या गेल्या आहेत. दख्खनच्या राणीच्या प्रवाशांची स्वतःची अशी वेगळी ओळख असते जी कायमस्वरुपी राणीच्या दिमाखाशी जोडली गेलेली असते. अस्सल पुणेकर राणीखेरीज मुंबईचा प्रवास करत नाहीत. राणीच्या एसी चेअर कारमध्ये बसून मुंबईकडे रवाना होणे म्हणजे रुबाब आणि न्याहारी म्हणून खास राणीची वैशिष्टय़े असलेल्या पदार्थांचा आस्वाद जागच्या जागी बसून किंवा तिच्या डायनिंग कारमध्ये जाऊन घेणे म्हणजे खऱया अर्थाने पुणे-मुंबई प्रवासाची इतिकर्तव्यता.

तिच्याकडे न्याहारीसाठी असणारे पदार्थही खास तिचेच. बेक्ड बीन्स, व्हेज कटलेट्स (घेऊन येणाऱयांचा उच्चार-कटलेस), ऑम्लेट ब्रेड आणि सगळ्यात टेसदार चीज टोस्ट, असा चीज टोस्ट राणीच्या स्वयंपाक घराखेरीज इतर कुठेही होत नाही. शिवाय चहा-कॉफी, शीतपेये वरचेवर आहेतच. मुंबईत पोचत असतानाच येणाऱया थंडगार कुल्फीचा आस्वाद घ्यायलाच हवा. ही झाली खान-पान सेवा. या चटकदार खाण्यासारखेच राणीचे प्रवासीही विलक्षण खमंग आणि विविधरंगी असतात. प्रत्येकाचा प्रकार वेगळा. पुणे-मुंबई पासधारक नेहमीच स्वसमुहात मग्न. ग्रुपीझम म्हणजे काय याचा प्रत्यय येथे पहायला मिळतो. सगळे सणवार, गाण्याच्या भेंडय़ा, पत्त्यांचे डाव काय पहायला मिळत नाही येथे…एकमेकांसाठी असलेली …एकमेकांना खंबीर पाठींबा देण्याची…सांभाळून घेण्याची वृत्ती. भांडणं दोन्ही एका नाण्याच्या दोन बाजू. माझ्यासारखे कधीतरी महिन्यातून एकदा-दोनदा प्रवास करणारे प्रवासी या समुहप्रेमाकडे खरोखरच असुयेने पाहत पाहायचे. माझ्या दृष्टीने राणीबरोबर प्रवास म्हणजे प्रशस्त खिडकीजवळची जागा…त्या लांब -रुंद खिडकीतून अखंड दिसणारा सह्याद्री डोळ्यात, मनात भरून घेण्याची धडपड…कितीही पाहिले तरी सह्याद्री मनभर भरुन उरतो…खुपसा ऐन पावसाळ्यात ओथंबून खाली तरंगणारे रेशमी, गुबगुबीत ढग..पावसाची थंडीमिश्रीत दुलई अंगभर पांघरलेलं केशरी-निळं आकाश…मनस्वीपणे कोसळणारे दूध प्रपात…किती आणि कसं डोळ्यात साठवून घ्यायचं…

कल्याण एक महत्वाचे जंक्शन. कल्याण ओलांडून निघून जाणारी एकमेव गाडी म्हणजे दख्खनची राणी. रेल्वेला कल्याणच्या हद्दीत धावण्यासाठी नगरपालिकेस कर द्यावा लागे. पण काही वर्षे रेल्वेने हा कर भरला नाही आणि पालिकेने रेल्वेवर दावा दाखल केला. यात नगरपालिकेने राणीचे इंजिन जप्त केले. दुसऱया दिवशी रेल्वेने कर भरला. इंजिन ताब्यात घेतले. आपला हा अपमान राणी कधीही विसरली नाही. त्यामुळे आजतागायत ती कल्याण ओलांडूनच मुंबईच्या दिशेने कुच करते.

पुणे-मुंबई दरम्यान धावणारी ही सर्वोच्च वेगाची गाडी आहे. ही सव्वातीन तासांची घटिका आता पावणेतीन तासावर आजच्या तिच्या जन्मदिवसाच्या मुहूर्तावर येणार आहे.
राणीच्या प्रवासातील अजून एक दिमाखदार क्षण म्हणजे तिच्या आधी निघालेल्या सगळ्या लांब पल्ल्याच्या गाडय़ांना मागे टाकून ती डौलात पुढे निघून जाते.
दख्खनची राणी पुण्याहून थेट लोणावळा, लोणावळ्याहून दादर आणि दादरहून छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस एवढय़ाच मोजक्या ठिकाणी थांबते. ही हिंदुस्थानातील एकमेव गाडी आहे जिला कोळशाचे इंजिन कधीही लावले गेलेले नाही. अगदीच अडचण असल्यास प्रसंगी डिझेल इंजिन जोडले गेले आहे.
महिलांसाठी विशेष डबा आणि पहिली महिला रेल्वेचालक दख्खनच्या राणीने दिली.
ब्रिटीश अधिकाऱयांसाठी ही राणी केवळ शनिवार-रविवारपुरतीच पुणे-मुंबई धावायची. इंग्रज अधिकाऱयांचा घोडय़ांच्या शर्यतीचा शौक ही राणी पूर्ण करायची.
लोकल गाडी…अर्थात ट्रेन…केवळ शहरं गावंच जोडत नाही तर माणसाच्या मनांनाही जोडते. उदाहरण अगदी तुमच्या-माझ्या शहरापुरतं घ्यायचं झालं तर आपली डेक्कन क्वीन…अर्थात दख्खनची राणी!

काही मंडळी वाचन, कानात वाजत असलेली गाणी, अपुरी झोप, आपसातील गप्पा अशा विविध कार्यक्रमांत मग्न. माणसांची ही असंख्य रुपं…रंग पाहत साठवून घेत 1930पासून दख्खनची राणी अव्याहत धावतेय. राणीच्या या प्रदीर्घ प्रवासाला मानाचा मुजरा!!!