लेख – संरक्षण सज्जता आणि आवश्यक बदल

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

>> जयेश राणे,  [email protected] 

जागतिक सुरक्षा परिस्थितीतून नवीन आव्हाने उभी राहत आहेत. त्यांना सामोरे जाण्यासाठी आपण नेहमीच तयार असले पाहिजे, देशाच्या संरक्षण सज्जतेला बळकटी देण्यासाठी हवाई युद्धातील नवीन ट्रेंडचे विश्लेषण करण्याची आणि शिकण्याची गरज आहे. त्या दृष्टीने तातडीने आवश्यक ती कृती झाली पाहिजे. कारण परिस्थिती कोणासाठी थांबत नसते, तर आपल्यालाच त्यानुसार बदलावे लागते. देशाच्या सीमांचे रक्षण करणाऱ्या सैनिकांचे हात बळकट करण्यासाठी संरक्षण सज्जतेसंदर्भात कालानुरूप बदल केला पाहिजेत.

दहशतवाद्यांचा समूळ बीमोड करण्यासाठी इस्रायलचे गाझा पट्टीवरील हल्ले जागतिक स्तरावर चर्चेचा विषय झाला आहे. इस्रायलच्या हवाई हल्ल्यांत गाझा क्षेत्र कसे भाजून निघत आहे, ते सर्वच पाहत आहेत. हमासचा कायमचा बंदोबस्त करण्यासाठी इस्रायलच्या वायुसेनेची विमाने हमासच्या ठिकाणांना लक्ष्य करत आहेत. सतत हवाई हल्ले करून हमासच्या कसे नाकीनऊ आणता येतील असेच त्यांचे नियोजन दिसते. हमासला संपवण्यासाठी इस्रायलने कंबर कसली आहे. इस्रायल आणि पॅलेस्टाईन येथील वातावरण नैसर्गिकरीत्या सामान्य आहे. म्हणजे कुठे बर्फ पडत आहे, वातावरणात धुके आहे असे चित्र नाही. वरील सर्व घटनाक्रम सांगण्याचे कारण म्हणजे भारताने इस्रायलकडून युद्धनीती शिकावी. विशेषतः भारतीय वायुसेनेने.

भारतीय सैन्यात अग्निवीर म्हणून कर्तव्य बजावणाऱ्या महाराष्ट्राच्या बुलढाणा जिह्यातील ( पिंपळगाव सराई ) सुपुत्र अक्षय गवते ( वय 22 वर्षे ) यांचे मध्यंतरी निधन झाले. सियाचीन  जगातील सर्वात उंच ठिकाणी असलेले क्षेत्र आहे. 23 हजार फूट उंचीवर येथे भारतीय सैन्य तैनात असते. येथील तापमान उणे 55 अंशांपर्यंत खाली येते. खाद्य पुरवठा करण्यासाठी हवाई मार्गावरच निर्भर राहावे लागते.

अवघ्या 22 वर्षीय युवकाचे कर्तव्य बजावत असताना निधन झाले ही घटना विचार करायला लावणारी आहे. विशेष म्हणजे सीमेवर कार्यरत असताना अक्षय गवते हुतात्मा झाले. ऑक्टोबर महिन्यातच अमृतपालसिंग या पंजाबच्या अग्निवीर सैनिकाचे निधन झाले. त्यांनी स्वतःवरच गोळी झाडून घेतली असे सैन्याने म्हटले आहे. त्यामुळे सैन्याच्या धोरणानुसार त्यांना मानवंदना दिली नाही, असेही सैन्याने म्हटले आहे. कर्तव्य बजावत असताना हुतात्मा झालेले गवते हे पहिले अग्निवीर आहेत. सैन्याच्या वतीने त्यांना मानवंदना दिली गेली तसेच शासकीय इतमामात अंत्यसंस्कार झाले. युनिट 69 मैदानी रेजिमेंटमध्ये ‘टेलिफोन ऑपरेटर’ म्हणून सियाचीन ग्लेशियर भागात अक्षय गवते कर्तव्यावर होते. सैन्यात 9 महिने 21 दिवस सेवा दिली.

या घटनेच्या पार्श्वभूमीवर सियाचीनसारख्या बिकट वातावरण असलेल्या प्रदेशात शत्रूवर लक्ष ठेवण्यासाठी कोणत्या नवनवीन पद्धतींचा अवलंब करता येईल याचा गांभीर्याने विचार व्हावा. तरुण, सळसळते रक्त आहे आणि नव्याने नियुक्त झालेल्यांची येथे पोस्टिंग करणे लष्कराच्या कार्यपद्धतीचा चालत आलेला भाग म्हणून याकडे बघणे पालटले पाहिजे असे वाटते.

बर्फाच्छादित प्रदेशात वातावरणात सतत पालट होत असतात. कधी सुसाट वाहणारे बोचरे वारे, तर कधी होणारी बर्फवृष्टी. अशा रक्त गोठवणाऱ्या उणे अंशातील तीव्र थंड वातावरणात पायी चालत गस्त घालणे कठीण आव्हानच होय. वर्षानुवर्षे सैनिक ते स्वीकारत आहेत आणि शत्रूची घुसखोरी होण्यापासून सीमा क्षेत्राचे रक्षण करत आहेत. यास्तवच भारतातील 142 कोटी जनता निवांतपणे दैनंदिन व्यवहार – नोकरी – शिक्षण – पर्यटन करू शकत आहे. त्यामागे सैनिकांचा पुष्कळ मोठा त्याग आहे, जो शब्दांतही व्यक्त करता येणे अशक्य आहे.

सैन्यात भरती होऊन राष्ट्रसेवा करता यावी हा निःस्वार्थ उद्देश डोळ्यांसमोर ठेवून त्या दिशेने कैक तरुण – तरुणी वाटचाल करत असतात. शारीरिक तंदुरुस्तीपासून ते लेखी परीक्षेत उत्तीर्ण होण्यासाठी आवश्यक सिद्धता करणे येथूनच सैनिकांच्या खडतर प्रवासास आरंभ होतो. सरकारी नोकरीत रुजू होण्यासाठी लेखी परीक्षा, वैद्यकीय चाचण्या होत असतात. मात्र त्यात कुठेही शारीरिक मेहनतीचे सूत्र नसते. ज्या गोष्टी नोकरीवर आवश्यक आहेत त्यानुसार परीक्षांचे आयोजन असते. असे असले तरी सैनिक परीक्षा उत्तीर्ण होऊन सेवारत राहणे येरागबाळ्याचे काम नाही. त्यासाठी मनाची खंबीरता आणि सतत कठीण प्रसंगांना तोंड देत त्यातून मार्ग काढत वाटचाल करत राहण्याची मानसिकता केवळ सैनिकांतच असू शकते.

सियाचीन येथील वातावरण लहरी असते. भारतीय लष्कराने या प्रदेशात झालेल्या हिमस्खलनात कैक अधिकारी – सैनिक गमावले आहेत. मात्र शत्रूवर लक्ष ठेवणे अनिवार्य असल्याने भारत या खडतर क्षेत्रात सैन्य तैनात करत असतो. असे असले तरी वायुदलाच्या सहाय्याने या प्रदेशावर कसे लक्ष ठेवता येईल तसेच यासह अवकाशात असलेल्या भारतीय उपग्रहांचेही कसे सहाय्य घेता येईल याचा अभ्यास भारतीय लष्कराने केला असावा. कितीही म्हटले तरी पायी चालत गस्त घालण्यात मर्यादा आहेत. बर्फाळ भागात एक – एक पाऊल उचलताना कठीण जाते. वायुसेनेला मर्यादा येत असल्यास ड्रोनचे सहाय्य घेऊन गस्त घालणे कितपत उचित ठरू शकते याचाही विचार झाला पाहिजे. रशिया – युक्रेन युद्धात युक्रेन या देशाने दावा केला आहे की, आम्ही ड्रोनच्या सहाय्याने रशियाच्या काही भागांवर आक्रमणे केली आहेत. अझरबैजान आणि या देशातील युद्धात अझरबैजान या देशाने ड्रोनद्वारे हल्ले करून शत्रूला पराभूत केले आहे. ड्रोनचे महत्त्व पुढे वाढत जाईल यात शंका नाही. मनुष्यरहित यंत्र असल्याने मनुष्यबळ हानी होत नाही आणि हल्ले करून शत्रूची ठिकाणे नेस्तनाबूत करण्याचे नामी कार्य ड्रोन करते.

कोणत्याही देशासाठी सैनिक ही त्यांची अमूल्य संपत्ती असते. युद्धकाळ असो वा नसो, त्यांना गमवावे लागणे हानीकारक असते. त्या जागी पुन्हा दुसरा सैनिक नियुक्त केला जातो. असे असले तरी सैनिकांच्या गस्तीविषयीच्या मार्गदर्शक तत्त्वांत तंत्रज्ञानाचा कसा उपयोग करता येईल याकडे लक्ष द्यावे लागेल. खराब वातावरणाचा शरीरावर नकारात्मक परिणाम होणे आणि त्यात जीव गमवावा लागणे यावर सैनिकांचे प्राणरक्षण या सूत्राला प्राधान्य देत तोडगा हवाच. प्रशिक्षण देऊन जरी सैनिकांना उणे तापमानाच्या ठिकाणी नियुक्त केले जात असले तरी सैनिक हासुद्धा माणूसच आहे, हे लक्षात घेता प्रत्येकाची शारीरिक क्षमता भिन्न असते हे विसरून कसे चालेल? ड्रोनची संख्या आणि गस्ती घालण्याच्या त्यांच्या फेऱ्या यांत वाढ करता येईल का, असेही पाहता येईल.  माणसाला कठीण जागी प्रत्यक्ष पोचण्यात मर्यादा येतात. मात्र ड्रोनचे तसे नाही. ड्रोन अल्पावधीतच कुठेही पोचू शकते.

जागतिक सुरक्षा परिस्थितीतून नवीन आव्हाने उभी राहत आहेत. त्यांना सामोरे जाण्यासाठी आपण नेहमीच तयार असले पाहिजे, देशाच्या संरक्षण सज्जतेला बळकटी देण्यासाठी हवाई युद्धातील नवीन ट्रेंडचे विश्लेषण करण्याची आणि शिकण्याची गरज आहे. त्या दृष्टीने तातडीने आवश्यक ती कृती झाली पाहिजे. कारण परिस्थिती कोणासाठी थांबत नसते, तर आपल्यालाच त्यानुसार बदलावे लागते. देशाच्या सीमांचे रक्षण करणाऱ्या सैनिकांचे हात बळकट करण्यासाठी संरक्षण सज्जतेसंदर्भात कालानुरूप बदल केला पाहिजेत.