ठसा : आधुनिक दिल्लीच्या शिल्पकार

562

15 वर्षांची शीला कपूर नावाची मुलगी एकदा पंडित नेहरू दिसतात तरी कसे हे पाहायला तीन मूर्ती लेन पंतप्रधानांच्या निवासस्थानी 10 किलोमीटरचा पायी प्रवास करून गेली. तास दोन तास प्रवेशद्वाराजवळ ताटकळत उभे राहिल्यावर कुठे ताफ्यासह बाहेर जाणाऱया पंडितजींचे दर्शन तिला घडले. हीच 15 वर्षांची मुलगी पुढे दिल्लीची सत्ता 15 वर्षे निर्विवादपणे गाजवेल असा विचार नक्कीच कोणी त्यावेळी केला नसेल. मात्र याच शीला कपूर लग्नानंतर शीला दीक्षित झाल्या आणि देशाची राजधानी दिल्लीच्या ‘विकास महिला’ बनल्या. सेंट स्टीफन्स महाविद्यालयात शिकत असताना तेथेच शिकणारे आणि पुढे सनदी अधिकारी झालेले विनोद दीक्षित यांच्याशी त्यांनी प्रेमविवाह केला. शीला दीक्षित यांच्या कुटुंबातून या विवाहाला खूप विरोध होता, पण तरीही शीला कपूर या शीला दीक्षित झाल्याच. अर्थात त्या काळी तालेवार काँग्रेस नेते असलेल्या उमाशंकर दीक्षित यांच्या कुटुंबात सून म्हणून रुळायला त्यांना वेळ लागला. कारण शीला दीक्षित या आधुनिक विचारसरणीच्या तसेच नास्तिक होत्या. त्याचवेळी सासर म्हणजे मात्र खानदानी ब्राह्मण कुटुंब. त्यामुळे शीला दीक्षित यांना तेथे रमण्यासाठी खूप वेळ द्यावा लागला. डोक्यावरून पदर घेण्याची परंपरा त्या कुटुंबात होती. त्यामुळे मला 16 व्या शतकात वावरत असल्याचा भास व्हायचा, असे परखड मत त्यांनी एका मुलाखतीत नोंदवले होते. शीला दीक्षित स्पष्टवक्त्या होत्या. त्यांचे सासरे उमाशंकर आणि इंदिरा गांधी यांचे घनिष्ठ संबंध होते. इंदिराजींच्या मंत्रिमंडळात उमाशंकर दीक्षित मंत्रीदेखील होते. अर्थात, स्वतः शीला दीक्षित या राजकारणात आल्या त्या सासरे उमाशंकर यांच्यामुळे नव्हे तर खुद्द इंदिराजींमुळे. 1984 मध्ये संयुक्त राष्ट्रांच्या महिलाविषयक आयोगाकडे पाठविलेल्या प्रतिनिधी मंडळात त्यांचा समावेश करण्यात आला होता. पुढे त्याच वर्षी उत्तर प्रदेशातील कन्नोज मतदारसंघातून त्या खासदार म्हणून निवडून आल्या आणि राजीव गांधी मंत्रिमंडळात संसदीय कामकाज मंत्री बनल्या. नंतर त्या दिल्लीच्या राजकारणात सक्रिय झाल्या. 1998 च्या सुमारास भाजपचे मदनलाल खुराणा दिल्लीचे मुख्यमंत्री होते. त्यांनी दिल्ली मेट्रोचा प्रस्ताव तत्कालीन पंतप्रधान पी. व्ही. नरसिंह रावांकडे पाठवला. रावांनी क्षणाचाही उसंत न लावता तो मंजूर केला. खुराणांनी मग ई. श्रीधरन नावाच्या सक्षम अधिकाऱयाकडे मेट्रोची धुरा दिली. मात्र त्याचवेळी भाजपचे सरकार दिल्लीतून गेले आणि शीला दीक्षितांची मुख्यमंत्रीपदी वर्णी लागली. त्याचा पुरेपूर वापर त्यांनी दिल्लीचा चेहरामोहरा बदलविण्यासाठी केला. 1998 ते 2013 पर्यंतचा शीला दीक्षितांचा सलग कार्यकाळ हा खऱया अर्थाने दिल्लीच्या ट्रान्सफॉर्मेशनचा होता. खुराणांनी नेमले म्हणून त्यांनी ई. श्रीधरन यांना हटवले तर नाहीच उलट फ्रीहॅण्ड दिला. दिल्लीकरांची ब्ल्यू लाईनच्या खासगी वाहतुकीच्या नरकयातनेतून सुटका करण्याचे खरे श्रेय शीला दीक्षितांनाच द्यावे लागेल. त्याचबरोबर राष्ट्रकुल स्पर्धांच्या निमित्ताने दिल्लीतील पायाभूत सुविधांमध्ये त्यांनी घडवलेले आमूलाग्र बदल हे डोळ्यांचे पारणे फेडणारे ठरले. स्वभावाने सहृदयी असलेल्या शीला यांनी अटलबिहारी वाजपेयी पंतप्रधान झाल्यानंतर त्यांचाही विश्वास त्यांनी तितकाच संपादन केला जितका विश्वास त्यांच्यावर इंदिरा, राजीव आणि सोनिया गांधींचा होता. राजकारणासारख्या दलदलीत त्यांनी एका मध्यमवर्गीय स्त्रीची प्रतिमा जाणीवपूर्वक जपली. दिल्लीकरांचा सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेत कोंडलेला श्वास मेट्रोच्या माध्यमातून मोकळा केला. त्यामुळे सबंध दिल्लीत त्या शीला आण्टी नावानेच ओळखल्या गेल्या. दिल्ली विधानसभा निवडणुकीची तयारी सुरू असताना शीला दीक्षितांचे अचानक जाणे अगोदरच गोंधळलेल्या काँगेससाठी मोठी हानी आहे.

आपली प्रतिक्रिया द्या