लेख – नाशिकमध्ये रखडलेल्या विकासाला गती!

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

>> बाबासाहेब गायकवाड

नाशिक महापालिकेतील भाजपच्या पाच वर्षांच्या सत्ता काळात रखडलेल्या विकासाला महापालिकेचे विद्यमान आयुक्त रमेश पवार यांच्या कार्यकाळात गती मिळाली आहे. बिकट झालेली महापालिकेची आर्थिक स्थितीही सुधारत आहे. नको तिथे होणाऱ्या उधळपट्टीला लगाम घातल्याने महापालिकेचे दायित्व कमी झाले आहे.

नाशिक  महापालिका निवडणूक प्रचारात तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विकासासाठी नाशिक दत्तक घेतल्याची घोषणा केली. यावर विश्वास ठेवून जनतेने भाजपला एकहाती सत्ता दिली. पाच वर्षांत फडणवीसांनी नाशिककडे ढुंकूनही पाहिले नाही. भ्रष्टाचार व निक्रियतेमुळे शहराचा विकास खुंटला. कोरोना काळात नाशिककरांना त्रास सहन करावा लागला. मनमानी कारभार, अतोनात उधळपट्टीने महापालिकेची आर्थिक स्थिती ढासळली. साडेतीनशे कोटींच्या मुदत ठेवी मोडीत काढल्या गेल्या. महापालिकेचे दायित्व 2800 कोटींवर पोहोचले. हाती घेतलेली कामे होणेही कठीण झाले. मात्र नाशिक महापालिकेच्या आयुक्तपदाची सूत्रे हाती घेताच आयुक्त रमेश पवार यांनी प्रशासकीय शिस्त लावली. आवश्यक कामांना प्राधान्य आणि अनावश्यक कामांना कात्री लावण्याचे धोरण स्वीकारले. सकाळी सहा वाजेपासून ठिकठिकाणी भेटी सुरू केल्या. यामुळे लेटलतीफांना दणका बसला. कार्यालयातच डब्बा आणून दुपारी अर्धा तास जेवणासाठी निश्चित केला. यामुळे अधिकारी, कर्मचाऱ्यांची वामकुक्षी बंद झाली. मुख्यालयातील उपहारगृह लवकरच सुरू करण्यात येणार आहे. सकाळी सफाई कामगार गैरहजर आढळल्यास त्या भागातील पर्यवेक्षकावर कारवाई करण्याचे फर्मान काढले. फाईली, तक्रारींचा निपटारा त्वरित होत आहे. यामुळे प्रशासकीय कामाला शिस्त आणि गतिमानता आली. पाच-सहा वर्षांपूर्वी मंजूर होऊनही सुरू न झालेली कामे रद्द केली. दोन उड्डाण पूल, रस्ते आदी कामे रद्द करून आठशे कोटींचे दायित्व कमी केले. आणखी पाचशे कोटींचे दायित्व कमी करण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. स्थायी समितीऐवजी प्रशासनाच्याच अर्थसंकल्पाची अंमलबजावणी सुरू केल्याने मोठी आर्थिक बचत होणार आहे. शहरातील आठशे मोबाईल टॉवर, होर्डिंग यातून वर्षाला तीस कोटी रुपये उत्पन्न मिळविण्याचे नियोजन केले. दहा-बारा वर्षांपासून करच आकारला गेला नसलेल्या मालमत्तांना कर आकारून सुमारे 75 कोटींचे उत्पन्न दोन महिन्यांत वाढविले. पाणीपट्टी वसुलीसाठी वॉटर ऍप कार्यान्वित केले. तीनशे स्क्वेअर मीटरच्या आतील बांधकामांना परवानग्या देणे, फी स्वीकारणे ऑनलाइन केले. उत्पन्नाचे स्रोत वाढवून व सक्षम करून आर्थिक डोलारा सांभाळण्यावर भर दिला जात आहे. नाशिक रोड येथील हिंदुहृदयसम्राट, शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे रुग्णालयाचा बाह्य रुग्ण विभाग आठ दिवसांपूर्वी सुरू झाला. साडेचारशे खाटांचे हे रुग्णालय पूर्ण क्षमतेने लवकरच सुरू होईल. गंगापूर रोड येथील शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे संग्रहालयाचे रखडलेले काम सुरू झाले आहे.

पांडवलेण्याच्या पायथ्याशी असलेले चित्रपट महर्षी दादासाहेब फाळके स्मारक अडीच वर्षांपासून बंद असल्याने त्याची दुरवस्था झाली होती. शिवसेना नेते, खासदार संजय राऊत यांनी 15 एप्रिल रोजी आयुक्तांसह या स्मारकाची पाहणी केली. या स्मारकाला पुनर्वैभव प्राप्त करून द्या, अशी सूचना त्यांनी केली. आयुक्त पवार यांनी तातडीने कार्यवाही केली, उद्यान, संगीत कारंजा, धबधबा यांचे काम केले. दोनच महिन्यांत 16 जून रोजी हे स्मारक पर्यटकांसाठी खुले केले. हैदराबादच्या रामोजी फिल्म सिटीच्या धर्तीवर या स्मारकाचा पुनर्विकास केला जाणार आहे. गोदावरीचे प्रदूषण थांबविण्यासाठी उपाययोजना केल्या जात आहेत. सांडपाणी नदीत जाणार नाही यासाठी स्वतंत्र प्रकल्पच आयुक्तांनी हाती घेतला आहे. नमामी गोदा प्रकल्पासाठी सल्लागार नेमण्याची निविदा काढण्यात आली आहे. शहरातील 132 चौक तसेच रस्ते दुभाजकांचे सुशोभीकरण करण्याचे काम सुरू आहे. प्रत्येक विभागीय अधिकाऱ्याला संबंधित विभागात तीन रस्ते विकसित करण्याचे प्रस्ताव तयार करण्याच्या सूचना दिल्या आहेत. शहरातील महापालिकेच्या शाळांचे स्मार्ट स्कूलमध्ये रूपांतर करण्यात येणार आहे. यामुळे विद्यार्थ्यांना आधुनिक व दर्जेदार शिक्षण मिळेल. महापालिकेतील नोकर भरतीचा मार्गही मोकळा होत आहे. आपण ज्या संस्थेत, शहरात काम करतो त्याचे हित साधणे हे आपले कर्तव्य आहे. हा दृष्टिकोन ठेवून काम केले तर काय होते, याचा प्रत्यय आयुक्त पवार यांच्या कामांतून नाशिककरांना येत आहे.