
>> निळकंठ कुलकर्णी
आनंदस्वरूप, अदैत्य, विज्ञानमय, सर्वत्र वास करणाऱ्या अशा भगवान विष्णुस मी भक्तीपूर्वक वंदन करितो, जो सर्वांच्या हृदयात निवास करून सर्वांची शुभ व अशुभ कर्मे तटस्थेने पाहतो त्या सर्वांचा साक्षीदार विष्णु यास मी नमस्कार करितो, हे भगवान जगातील सर्व लोकांचा उद्धार करतात.
आकाशात भरून आलेल्या काळ्या ढगांप्रमाणे कृष्णवर्ण असणारे व तीनही लोकांवर स्वामित्व ठेवणारे असे जे विष्णू. त्या विष्णूला एकवेळ श्रद्धापूर्वक केलेला नमस्कार अत्यंत पापी मनुष्यालादेखील उद्धारणारा असतो. भूमीवर दण्डवत घातल्याप्रमाणे जो मनुष्य भगवानास वंदन करितो त्यास परमगति प्राप्त होते. असे भाग्य हजारो यज्ञ करणाऱ्याससुद्धा प्राप्त होत नाही. उठता बसता कोणत्याही स्थितीत जो एकदाच ‘नमो नारायण’ असा मंत्र म्हणून नारायणास शरण जातो त्याचे कल्याण होते. ‘नारायण’ हा शब्द एकदा जरी उच्चारला तरी मनुष्याची वाणी आज्ञाधारक होते. अर्थात नारायणाच्या भक्तीत रमून जाते असा या शब्दाचा अदभुत चमत्कार आहे.
भगवान विष्णूंची महत्ता अवर्णनीय आहे. व्यासादी सर्व मुनिगण त्यांची स्तुती करता करता थकून गेले व शेवटी निवृत्त झाले. स्वप्नातदेखील जर सहजतेने भगवानाचे नाम उच्चारले गेले, तर त्या व्यक्तीच्या पापांची रास नाश पावते, इतके भगवदनामाचे महत्व आहे. मग जो मनःपूर्वक त्याचे स्मरण कीर्तन करील तर त्याचे महत्व वर्णन करायलाच नको. त्यास कधीच यमलोकी जावे लागत नाही, अशा परमंगलदायी भगवान विष्णुस वारंवार नमस्कार असो.
ज्याप्रमाणे सूर्याचा उदय होताच किंवा अग्नीचा प्रकाश पडताच अंधार नष्ट होतो, त्याचप्रमाणे भगवान हरीचे पुण्यस्मरण केल्याने पापांच्या राशीचा क्षणात नाश होतो. भगवान हरीचे नामस्मरण करताना ज्यास कशाची जाणीव राहात नाही त्यास कधीही मृत्यु नसतो. तो अजेय असतो, भगवद्गनामाचे कीर्तन संसाररुपी सर्पदंशाचा नाश करणारे औषध मनुष्य ‘कृष्ण’ नामाचा जप करिता करिता मोक्षगती प्राप्त करतो.
सत्य युगात ध्यान केल्याने,त्रेतायुगात मंत्राचा जप केल्याने किंवा द्वापार युगात भगवानाची पूजा अर्चा केल्याने जे फल प्राप्त होते. तवंग फल कलियुगातसुद्धा भगवान केशवाच्या मंगलमय नावाचे स्मरण अथवा कीर्तन केल्याने प्राप्त होते. ज्याच्या तोंडी सतत हरिनामाचा जप चालू असतो, तो या संसाररुपी सागराला तारून विष्णुलोकी गमन करतो. विज्ञानयुगात सहस्त्रावधि दुष्कृत्यांनी ग्रासलेला परंतु शुद्ध किंवा मोक्षाची इच्छा धरणारा मानव भगवद्गनामच्या प्रभावाने मोक्षगती प्राप्त करितो.
भगवान नारायणाच्या स्तुतीत तथा गुणसंकीर्तन करण्यात जो मनुष्य अहर्निश मग्न असतो त्यास परत या संसारात यावे लागत नाही.


























































