प्रासंगिक – मधुमेहाची समस्या

>> डॉ. व्ही. मोहन

मधुमेह ही आता जागतिक आरोग्य समस्या बनली असून ती इतक्या झपाटय़ाने वाढत आहे की, जागतिक आरोग्य संघटनेने (WHO) मधुमेहाला ‘साथीचा आजार’ असे संबोधायला सुरुवात केली आहे. हिंदुस्थानात 1980 च्या दशकात मधुमेहाच्या रुग्णांमध्ये वाढ होण्यास सुरुवात झाली. पण नेमके सांगायचे तर वर्ष 1991 मध्ये जेव्हा हिंदुस्थानने मुक्त अर्थव्यवस्थेचा स्वीकार केला तेव्हापासून मधुमेहाचे प्रमाण वेगाने वाढू लागले. वेगवान आर्थिक विकास, त्यातून झालेले औद्योगिकीकरण, यांत्रिकीकरण आणि त्यामुळे शारीरिक श्रमामध्ये मोठय़ा पातळीवर झालेली घट ही कारणे त्यामागे होती. याचा अर्थ सुखवस्तू गटात मोडणाऱ्या लोकांची संख्या वाढली आणि त्यांना आता साखर, मीठ व चरबीची रेलचेल असेलेले पदार्थ परवडू लागले. या सगळ्यामुळे डायबेटिस म्हणजे मधुमेह, हायपरटेन्शन म्हणजे अतिताण, हृदयविकार आणि कर्करोगासारख्या असंसर्गजन्य रोगांच्या साथीमध्ये भर पडली. दरवर्षी 14 नोव्हेंबर रोजी जागतिक आरोग्य संघटना (WHO) तसेच आंतरराष्ट्रीय डायबेटिस फेडरेशनकडून (IDF) इन्सुलिनचे जनक डॉ. फ्रेड्रिक बॅन्टिंग यांच्या जन्मदिनानिमित्त जागतिक मधुमेह दिन साजरा केला जातो. दरवर्षी जागतिक मधुमेह दिनासाठी एक सूत्र ठरविले जाते आणि या वर्षीचे सूत्र आहे ‘कुटुंब आणि मधुमेह’. मधुमेहाच्या कुटुंबावर होणाऱ्या परिणामांबद्दल जनजागृती घडवून आणणे आणि मधुमेहाने बाधित व्यक्तींच्या समूहाला पाठबळ देणे हा या सूत्रामागचा उद्देश आहे. घरातील एका व्यक्तीला मधुमेह झाला तर त्याचा परिणाम कुटुंबातील इतर सदस्यांवरही होतो यात शंका नाही. उदाहरणार्थ, त्या व्यक्तीच्या आहाराच्या सवयींमध्ये सुधारणा कराव्या लागतात आणि इतर कुटुंबावरही या बदलांचा प्रभाव पडतो. दिवाळीसारख्या सणासुदीच्या काळात तर ही गोष्ट विशेषत्वाने जाणवते. या काळात संपूर्ण कुटुंब खरेदी, खाणेपिणे आणि गोडधोडाचे वाटप करण्यामध्ये गुंतलेले असते. डॉ. मोहन्स डायबेटिस स्पेशॅलिटीज सेंटर व मद्रास डायबेटिस रिसर्च फाऊंडेशनमध्ये म्हणून काम करताना मला असे आढळून आले आहे की, दिवाळीनंतर रक्तातील साखरेचे वाढलेले प्रमाण घेऊन अनेक रुग्ण परत येतात. हे फक्त दिवाळीनंतरच होते असे नव्हे तर हिंदुस्थानातील प्रत्येक प्रमुख सणानंतर होते. तेव्हा प्रत्येकाने थोडी काळजी घेतलीच पाहिजे.

आपली प्रतिक्रिया द्या