
>> दीपक गुंडये
काही महिन्यांपूर्वी लोअर परळ व परळ परिसरातील वेगळ्या वाचनालय उपक्रमाच्या उद्घाटनाविषयीच्या बातम्या वाचनात आल्या होत्या. त्यातील एक वाचनालय हे लोअर परळमधील मीनाताई ठाकरे उद्यानात आहे तर दुसरे परळ एसटी स्थानकानजीक असलेल्या उड्डाणपुलाखाली आहे. मीनाताई ठाकरे उद्यानात सकाळच्या फेऱ्या मारण्यासाठी अधूनमधून जाणे होते. त्या वेळी तेथील वाचनालय दृष्टीस पडते. उद्यानाच्या एका कोपऱ्यात पुस्तकांनी भरलेले कपाट उद्यानाच्या भिंतीवर लावले आहे. ‘लायब्ररी फॉर ऑल’ असे नाव असलेल्या या वाचनालयाचा उद्देश म्हणजे उद्यानात फेरफटका मारायला येणाऱ्यानी मानसिक विरंगुळ्यासाठी कपाटातील कोणतेही पुस्तक घ्यावे, ते चाळावे, वाचावे व वाचून झाल्यानंतर परत कपाटात ठेवावे. सुरुवातीला फक्त इंग्रजी पुस्तके असायची. पण आता मराठी व हिंदी पुस्तकेही वाचनासाठी उपलब्ध आहेत.
तर दुसरे ‘ग्रीन माइल वाचनालय’ परळ येथील उड्डाणपुलाखाली आहे. एका बाजूला मनोरंजन मैदान आहे, तर दुसऱ्या बाजूला हे वाचनालय आहे. या वाचनालयाच्या उद्घाटनप्रसंगी त्याचा उद्देश असा सांगण्यात आला होता की, आजूबाजूने जात असलेल्या वाहनांच्या कोलाहलात इथे पुस्तक वाचत बसलात तरी तो कोलाहल जाणवणार नाही. प्रायोगिक तत्त्वावर हे वाचनालय सुरू करण्यात आले आहे. यानंतर मुंबईत इतर काही ठिकाणी अशीच वाचनालये सुरू करण्याचा पालिकेचा मानस असल्याचे कळते.
जागतिक पुस्तक दिनी या दोन वाचनालयाला भेट दिली. ‘लायब्ररी फॉर ऑल’ वाचनालयातील पुस्तकांत भर पडल्याचे जाणवले. ‘ग्रीन माईल वाचनालय’ हे वाचनालय आज शोधून काढले. तिथे गेल्यानंतर कळले की तिथे असलेल्या कप्प्यात पुस्तकेच नाहीत. तिथल्या रखवालदाराला त्याबद्दल कसलीच माहिती नव्हती. पुस्तके वाचण्यासाठी आसनांची व्यवस्था छान असली तरी वाचनासाठी पुस्तके मात्र नाहीत. त्यामुळे एका छान उपक्रमाचा उद्देश कुठेतरी हरवल्यासारखा वाटला.
‘वाचाल तर वाचाल’ असे आपण म्हणतो खरे, पण वाचनालयाच्या अशा नवनव्या उपक्रमांत वाचकांनी सक्रीय सहभाग नोंदवणे तितकेच गरजेचे आहे. तरच नवनव्या कल्पनांसह वाचनालयांची संख्या वाढू शकते!






























































