हिंदुस्थानची डिजिटल अर्थव्यवस्था

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

>> अभिपर्णा भोसले

130 कोटी लोकसंख्या असलेला देश. सहावे इंद्रिय बनलेला स्मार्टफोन आणि अमर्याद इंटरनेट सुविधा. आपल्यासाठी मोबाईल संवादाचे आणि मनोरंजनाचे साधन असले तरी तंत्रज्ञान-प्रगत देशांसाठी हिंदुस्थान ही खात्रीने फायदेशीर गुंतवणूक करता येईल अशी अर्थव्यवस्था आहे. कोरोनोत्तर जगात चीनमध्ये गुंतवणूक करण्यास हे देश उत्सुक असण्याची शक्यता कमीच आहे. शिवाय चिनी ऍप्सवर बंदी आल्याने हळूहळू चीनची हिंदुस्थानच्या डिजिटल मार्केटमधून गच्छंती होईल असे चित्र आहे. अमेरिकन कंपन्या याच संधीचा फायदा घेऊन हिंदुस्थानात शिरकाव करू पाहत आहेत. याचा हिंदुस्थानच्या अर्थव्यवस्थेस फायदा होणार हे नक्की!

हिंदुस्थानचे डिजिटल भवितव्य

2025 पर्यंत एक ट्रिलियन डॉलर्सची डिजिटल अर्थव्यवस्था उभारणे हे हिंदुस्थानचे लक्ष्य असल्याचे सूतोवाच सरकारने केले आहे.’स्टार्टअप इंडिया’अंतर्गत डिजिटल क्षेत्रात व्हेंचर सुरू करणाऱया कंपन्यांना प्रोत्साहन देण्यासाठी पुढील वर्षभरासाठी टॅक्समध्ये सूट देण्यात यावी. त्यामुळे देशांतर्गत प्रयत्न सुरू राहतील आणि नव्या कल्पनांना मूर्त रूप येण्यासही वाव मिळेल. अशा लोकल व्हेंचर्सचा फायदा मोठय़ा कंपन्यांना होऊ शकतो. हिंदुस्थानच्या डिजिटल प्रगतीत स्वदेशी घटक महत्त्वाची भूमिका बजावतील याबद्दल दुमत नाही. हिंदुस्थानी स्टार्टअप व्हेंचर्ससाठी आणि परकीय गुंतवणूक आकर्षित करून घेण्यासाठी सुसंगत आणि स्थिर धोरण आवश्यक आहे. परकीय कंपन्यांची गुंतवणूक रोजगार निर्मिती आणि आर्थिकदृष्टय़ा फायद्याची ठरण्यासाठी 20 उत्पादन क्षेत्रे निवडणे आणि तितकीच लॉजिस्टिक्स केंद्रे निवडून त्यांवर लक्ष केंद्रित करणे हे सरकारचे काम असेल. 5जी सेवा, मशीन-टू-मशीन डिजिटल रूपांतरण, वायरलेस सेवा आणि इंटरनेट ऑफ थिंग्ज या आजच्या काळास अनुरूप अशा सेवा हिंदुस्थानात निर्माण करणे हे हिंदुस्थानचे डिजिटल ध्येय असले पाहिजे.

हिंदुस्थानातील मोठय़ा शहरांत 5जी सेवा 2023 पर्यंत सुरू होईल अशी शक्यता आहे. चीनमध्ये हीच सेवा 9 कोटी युजर्स आजमितीला वापरत असल्याने चीन डिजिटल विकासात हिंदुस्थानपेक्षा कित्येक पावले पुढे असल्याचे चित्र दिसते. चीनमधील बायडू, अलिबाबा आणि टेंसेंट या तीन प्रमुख कंपन्या अमेरिकेतील गुगल, ऍमेझॉन आणि फेसबुकच्या तोडीच्या समजल्या जातात. ई-कॉमर्स, गेमिंग, क्लाउड कंप्युटिंग आणि सर्च इंजिन्समध्ये चिनी कंपन्यांचा मार्केटमधील प्रसार हा अमेरिकन कंपन्यांपेक्षा जास्त आहे.

हिंदुस्थान-चीन संबंध चांगले असल्याने चिनी कंपन्यांना हिंदुस्थानचे डिजिटल मार्केट काबीज करणे फारसे अवघड गेले नाही. ग्राहकांची मागणी ओळखून सेवा पुरवणाऱया कंपन्यांमध्ये चिनी कंपन्यांचा हातखंडा असल्याने अलिबाबा समूह आणि टेंसेंट होल्डिंग्स यांचा हिंदुस्थानच्या डिजिटल मार्केटवर पगडा होता. वेगवेगळे ऍप्स उपलब्ध करून देऊन इन्स्टंट मेसेजिंग पासून ई-कॉमर्सपर्यंत चिनी कंपन्यांनी आपले प्रस्थ निर्माण केले होते. ज्यावेळी चायनीज ऍप्स बॅन करण्याचा निर्णय घेण्यात आला त्यावेळी बॅन न झालेल्या ऍप्समध्येही चिनी कंपन्यांची मोठी गुंतवणूक असल्याचे समोर आले. ग्राहकांना पूरक सेवा देणारी ऍप्स तयार करणे, गुंतागुंतीचे युजर इंटरफेस टाळून सामान्य साक्षर व्यक्तीस समजेल अशा पद्धतीची प्रणाली विकसित करणे आणि या सेवा हिंदुस्थानी भाषांतून उपलब्ध करून देणे ही हिंदुस्थानी डिजिटल मार्केटमध्ये यशस्वी होण्याची गुरुकिल्ली चिनी कंपन्यांना मिळाली होती आणि ती हस्तगत करणे हे अमेरिकन कंपन्यांपुढचे आव्हान असेल. फेसबुकने हे आव्हान लीलया पेलले असून इतर कंपन्यांना ते जड जाणार नाही अशी आशा बाळगण्यास वाव आहे.

अमेरिकेचा शिरकाव

आजपर्यंत अमेरिकन कंपन्यांनी हिंदुस्थानातील तंत्रज्ञान क्षेत्रात मोठय़ा प्रमाणावर गुंतवणूक केली नाही यामागे बरीच कारणे आहेत. यात स्मार्टफोन्सचा वापर एक दशकापूर्वी सुरू झाला असला तरी इंटरनेट सुविधा महाग असल्याने सेवांना विशेष मागणी नव्हती हे प्रमुख कारण आहे. चार वर्षांपूर्वी जिओच्या रूपात अमर्याद व्हॉइस कॉल्स आणि स्वस्त इंटरनेट सेवा मिळू लागली. इतर टेलिकॉम कंपन्यांना स्पर्धेत टिकून राहण्यासाठी का होईना, पण आपल्या सेवा स्वस्त करणे बंधनकारक झाले. स्मार्टफोन्सची विक्रमी उलाढाल ही यानंतर सुरू झाली. जिओ प्लॅटफॉर्मने फेसबुकला दहा टक्क्यांपर्यंत भागीदारी देऊन आपल्या व्हेंचरमध्ये सहभागी करून घेतले. परिणामी, गुगलसारख्या कंपन्यांना आपले हिंदुस्थानातील टेलिकॉम भागीदार शोधणे बंधनकारक झाले.

अल्फाबेट इंकचे सीईओ असलेल्या सुंदर पिचई यांनी हिंदुस्थानात गुगलचे युनिट्स सुरू करण्यासाठी दहा बिलियन डॉलर्सची गुंतवणूक करणार असल्याची नुकतीच घोषणा केली. ही गुंतवणूक नवीन यंत्रणा आणि पायाभूत सुविधांसाठी करण्यात येणार असून ती पुढील पाच ते सात वर्षांत टप्प्याटप्प्याने केली जाईल. गुगलच्या हिंदुस्थानातील एकूण गुंतवणुकीतील 4.5 बिलियन डॉलर्सची गुंतवणूक ही एकटय़ा जिओ प्लॅटफॉर्ममध्ये केली जाणार आहे. रिलायन्स उद्योगसमूहाच्या डिजिटल सेवा देणाऱया जिओमध्ये गुगलची भागीदारी ही 7.7 टक्के इतकी असणार आहे. गुगल जिओच्या मदतीने स्वस्त दरातील स्मार्टफोनचे उत्पादन सुरू करणार आहे. ज्यांच्याकडे स्मार्टफोन नाही त्यांना तो परवडेल अशा दरात उपलब्ध करून देण्याची संयुक्त जबाबदारी गुगल आणि जिओची असेल, अशीही घोषणा पिचई यांनी केली.

अमेरिकन गुंतवणुकीचे प्रासंगिक महत्त्व –

कोरोनामुळे जागतिकीकरणाला सगळय़ात मोठा धक्का बसला. काही देशांनी हिंदुस्थानींना नोकरीवरून कमी करून हिंदुस्थानात परत पाठवण्यासाठी नियमावलीही आणली. त्यांना हिंदुस्थानी अर्थव्यवस्थेत जागा निर्माण करून देणे हे सरकारसमोरील आव्हान आहे. इतर राष्ट्रांप्रमाणे हिंदुस्थानातील रोजगाराच्या संधी कमी होऊ शकत असल्याची टांगती तलवार तरुण पिढीवर आहेच. त्यात या घोषणेमुळे थोडाफार दिलासा मिळाला आहे असे म्हणता येईल. प्रामुख्याने टेलिकॉम आणि आयटी क्षेत्रातील पदवीधारकांना नवीन संधी मिळतील आणि त्या अनुषंगाने नवीन इंडस्ट्री परिसरात इतरही रोजगार निर्माण होतील.

अमेरिकेचा हिंदुस्थानी डिजिटल सेवेतील प्रवेश हा केवळ स्मार्टफोन्स आणि ई-कॉमर्सपुरताच मर्यादित राहील असे वाटत नाही. मूलभूत सुविधांवरही त्याचा मोठा प्रभाव पडेल. उदाहरणार्थ, बँकिंग प्रणालीमध्ये माहितीचा साठा करणे आणि एका क्लिकवर ग्राहकासंबंधीची सर्व माहिती उपलब्ध असणे यात आपण मागे आहोत. यात सुधारणा करण्यासाठी प्रणाली विकसित करण्यात अमेरिकन कंपन्यांची मदत घेता येऊ शकते. गुगलने ’गुगल पे’ हे ऍप लाँच केले आणि हिंदुस्थानच्या पेमेंट्स प्रणालीमध्ये एक प्रयोग करून पाहिला. हे ऍप पिचई यांचे ब्रेनचाईल्ड आहे. यात एकमेकांचे मोबाईल नंबर किंवा केवळ यूपीआय कोड माहिती असतील तरी एका खात्यावरून दुसऱया खात्यात पैसे ट्रान्सफर केले जाऊ शकतात. हे मॉडेल प्रगतावस्थेत असून अमेरिकन सरकारनेही त्याचे अनुकरण करावे, असे आवाहन पिचई यांनी केले आहे.

कोरोना काळात अर्थव्यवस्थेचे झालेले नुकसान भरून काढण्यासाठी अमेरिकेची गुंतवणूक हा सुखद धक्का आहे. माहिती तंत्रज्ञान क्षेत्र हे अर्थव्यवस्थेच्या सेवा क्षेत्रातील सगळय़ांत जास्त आउटपुट देणारे क्षेत्र असून हिंदुस्थानातील सध्याची शिक्षणव्यवस्थाही या क्षेत्रास पूरक आहे. हिंदुस्थानच्या डिजिटल अर्थव्यवस्थेतील संभाव्य प्रगतीबद्दल प्रचंड विश्वास असल्याने गुगलने गुंतवणुकीचा निर्णय घेतल्याचे पिचई यांनी सांगितले. गुगल आणि ऍमेझॉनसारख्या कंपन्या ग्राहक आणि पुरवठा व्यवस्था यांचे व्यवस्थापन करण्यात अग्रेसर असून अशी कौशल्ये हिंदुस्थानी अर्थव्यवस्थेस डिजिटल काळासाठी अधिक सुसज्ज करतील यात शंका नाही.