
>> नवनाथ दांडेकर
पॉवरलिफ्टिंग हाच आपला श्वास आणि ध्यास मानून सुमारे 30 वर्षे महाराष्ट्राला अनेक राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय पदके मिळवून देणारे जिगरबाज क्रीडापटू व नामांकित प्रशिक्षक म्हणून सिंधुदुर्गचे सुपुत्र दिलीप सखाराम नार्वेकर मुंबई पोर्ट ट्रस्टमधून 39 वर्षांच्या निष्कलंक सेवेनंतर निवृत्त झाले आहेत. आपल्या षष्टय़ब्दीपूर्तीचा काळ पूर्ण करताना त्यांनी स्वतः राज्य आणि राष्ट्रीय स्तरावर महाराष्ट्रासाठी पॉवरलिफ्टिंग पदकांची लयलूट केलीच, पण स्वतः मोठे होताना राज्याला अनेक हरहुन्नरी आणि प्रतिभावंत पॉवरलिफ्टर मिळवून दिले. दुर्दैवाने त्यांचे हे यश पाहायला त्यांच्या अर्धांगिनी सौ. दीपाली नार्वेकर आज हयात नाहीत. आपले यश पाहायला आपली सहधर्मचारिणी या जगात नाही हेच मोठे शल्य हृदयात बाळगून ते अविरत 40 वर्षे आपल्या खेळाची सेवा करीत आहेत. आपल्या या कारकीर्दीत त्यांनी जिल्हास्तरीय स्पर्धेत 40, राज्यस्तरीय स्पर्धांत 35 आणि राष्ट्रीय स्पर्धांत 13 पदकांची लयलूट केली. शिवाय छत्तीसगढ येथे 2009ला पार पडलेल्या आशियाई पॉवरलिफ्टिंग स्पर्धेत हिंदुस्थानला उपविजेतेपदासह रौप्य पदक मिळवून दिले आहे.
आपली जन्मभूमी असलेल्या सिंधुदुर्गातून आंतरराष्ट्रीय ख्यातीचे पॉवरलिफ्टर घडवण्यासाठी प्रशिक्षक म्हणून प्रतिवर्षी नार्वेकर 15 दिवसांचे पॉवरलिफ्टिंग प्रशिक्षण शिबिर गेली 30 वर्षे आयोजित करीत आहेत. खानोली गावच्या या सुपुत्राने आपल्या अफाट कर्तृत्वाने मुंबई महाराष्ट्रासह मुंबई पोर्ट ट्रस्टचाही झेंडा सातासमुद्रापार फडकवण्याचा पराक्रम केला आहे. सिंधुदुर्गात पॉवरलिफ्टर घडविण्याच्या कामात नार्वेकर यांना वेंगुर्ल्याचे उद्योजक व सिंधुदुर्ग जिल्हा पॉवरलिफ्टिंग संघटनेचे अध्यक्ष पुष्पराज कोले यांचे भक्कम सहकार्य लाभत आहे. कोकणातील खेळाडूंच्या राहण्याचा, जेवणाचा, खेळाचे साहित्य आणि प्रवासाचा खर्च जिल्हा संघटना नार्वेकर व कोले यांच्या माध्यमातून करीत आहे. आपल्याप्रमाणेच सिंधुदुर्गातील युवकांनी राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर यश मिळवावे हे आशियाई मास्टर उपविजेते दिलीप नार्वेकर यांचे स्वप्न राहिलेले आहे. त्यासाठीच पत्नीच्या वियोगाचे मोठे दुःख पचवून नार्वेकर वयाची साठी उलटल्यावरही पॉवरलिफ्टिंग खेळाच्या विकासासाठी झटत आहेत. जे.जे. रुग्णालयात स्टाफ नर्स म्हणून सेवा करणाऱया त्यांच्या पत्नी दीपाली नार्वेकर यांचे 2004 मध्ये अल्पशा आजाराने निधन झाले. पत्नी वियोगाचा हा मोठा आघात पचवत नार्वेकर यांनी पॉवरलिफ्टिंग खेळात नवे खेळाडू घडवण्याचे कार्य आजतागायत अविरतपणे सुरू ठेवले आहे. त्यांच्या या नेत्रदीपक वाटचालीत त्यांना मुंबई पोर्ट ट्रस्ट स्पोर्टस् क्लबचे मानद महासचिव शिवछत्रपती पुरस्कार विजेते संजय माधव, पॉवरलिफ्टिंग महर्षी मधुकर दरेकर, दादोजी कोंडदेव पुरस्कारप्राप्त प्रशिक्षक दिलीप केळुस्कर आणि हिंदुस्थानचे पॉवरलिफ्टिंग पितामह दिवंगत सुब्रतो दत्ता यांचे बहुमूल्य मार्गदर्शन लाभले आहे. मुंबई पोर्ट ट्रस्ट आणि या गुरुजींचे ऋण आपण जन्मभर फेडू शकणार नाही असे नार्वेकर प्रामाणिकपणे कबूल करतात.
सेवानिवृत्तीनंतरही प्रतिवर्षी 20 दिवस सिंधुदुर्गात राहून कोकणातील युवा पॉवरलिफ्टर्सना मार्गदर्शन करण्याचा नार्वेकर यांचा निर्धार आहे. त्यांच्या या कामात त्यांना मंत्रालय स्पोर्टस् क्लबचे आंतरराष्ट्रीय पॉवरलिफ्टर सतीश पाताडे, राष्ट्रीय शरीरसौष्ठवपटू प्रकाश कोयंडे, रमाकांत दळवी यांचे उत्स्फूर्त सहकार्य लाभत आहे. निवृत्तीनंतरही आपल्या खेळासाठी आयुष्य वाहणाऱया या सेवाभावी क्रीडापटूला आयुष्याची शंभरी पूर्ण करता येवो आणि त्यांच्या प्रशिक्षणाखाली राज्याला आणि देशाला नामवंत पॉवरलिफ्टर्स मिळोत अशा शुभेच्छा त्यांच्या शिष्यगणांनी त्यांच्या निवृत्तिपर सन्मान सोहळ्यात दिल्या आहेत.





























































