चैतन्याचे प्रकाश पर्व

>> डॉ. चंद्रकांत शंकर कुलकर्णी

गरीब-श्रीमंत, स्त्राr-पुरुष, लहान-थोर, शत्रू-मित्र, उच्च-नीच, जात-पात हे भेद आनंदामध्ये नसतात. आनंद या सर्व भेदांपलीकडे आहे. आनंदाला पर्याय केवळ आनंदच असतो,

दिवाळी हा तर आनंदोत्सव असतो. या आनंदोत्सवात सर्व भेदभाव विसरले जातात. सामाजिक, कौटुंबिक व व्यक्तिगत पातळीवरही या आनंदाच्या कक्षा संकुचित होत नाहीत. दुरावलेली मने एकत्र येतात, शत्रू मित्र होतात. सर्वांच्या मनात केवळ एकच उर्मी दाटलेली असते. आनंदाची!

आंब्याची तोरणे, दारातील सुबक मनमोहक रांगोळ्या, आकाशात झेपावू पाहणारे, वेगवेगळ्या आकारातील रंगीबेरंगी प्रकाशाचा आविष्कार करणारे आकाशदीप. आकाशातील नक्षत्रांची स्पर्धा करू पाहणाऱया दिव्यांची आरास, घरीदारी झालेली रंगांची उधळण हा केवळ आनंदाचा आविष्कारच नव्हे काय?

चैतन्याचा, आनंदाचा प्रकाशकुंज, प्रत्येक हिंदुस्थानीयांच्या हातामध्ये ठेवणारे प्रकाशपर्व म्हणजे दिवाळी. संपूर्ण हिंदुस्थानी मन ज्या क्षणाची आतुरतेने वाट पाहात असते, तो क्षण म्हणजे दिवाळी. दिवाळीच्या या चैतन्यमयी पदन्यासामुळे संपूर्ण देश उजळून निघतो. परंपरागत हिंदुस्थानी मानसिकतेने दिवाळी सणाला पौराणिक संदर्भविश्वात अलगद नेऊन बसविले आहे. श्रीकृष्णाने नरकासुरावर विजय मिळवला तो आनंदाचा क्षण म्हणजेच दिवाळी. चौदा वर्षांचा वनवास संपवून प्रभू रामचंद्र अयोध्येत परतले त्या वेळी अयोध्या दिव्यांनी उजळून गेली होती, तो दिवस म्हणजे दिवाळी. समुद्रमंथनातून लक्ष्मी आणि धन्वंतरीची उत्पत्ती झाली म्हणून दिवाळीला सुखसमृद्धीचे प्रतीक म्हणून लक्ष्मीपूजन करावे तसेच आरोग्यासाठी उपयुक्त अशा औषधांचा योजक म्हणून धन्वंतरीची पूजा, अशी समाजधारणा. त्याला अनुसरून दिवाळी दिवशी इतके दिवे उजळले जातात की, अमावस्येची रात्र पौर्णिमेच्या रात्रीत कधी रूपांतरीत होते ते कळतही नाही.

आख्यायिकेबरोबर दिवाळीला संतांच्या विचारशलाकांचाही स्पर्श झाला आहे. त्यामुळेच संत ज्ञानदेव ‘ज्ञानाची दिवाळी’ अशी अनोखी कल्पना मांडतात. दीप लावून दिवाळी करण्याबरोबरच ज्ञानी होऊन ज्ञानाचा प्रकाश सर्वत्र पेरत जाणे, ही खरी दिवाळी असे ज्ञानदेवांना वाटते. अशी ज्ञानाची दिवाळी श्रोत्यांना प्राप्त झाली की, सर्वांना श्रवणसुखाचा सोहळा अनुभवता येईल. सर्वत्र आनंदाचा अमृतानुभव येईल, असे ज्ञानदेवांना वाटते म्हणून ते लिहितात,

‘सुर्ये अधिष्ठाrली प्राची!
जगारानीव हे प्रकाशाची!
तैसी वाच्या श्रोतया ज्ञानाची!
दिवाळी करी!!

शहरी झगमगाटाइतकीच खेडय़ातील दिवाळी उत्साहाने ओथंबून येते. खेडेगावातील दिवाळीचे चैतन्य शेतशिवारापासून घरादारांत हिंदकळत येते. घर, अंगण, गोठा यात दिवाळी प्रसन्नपणे नांदते. सोयाबीन, भात पिकांची मळणी होऊन खळ्यावरची लक्ष्मी दिवाळीदिवशी घरात वस्तीला आलेली असते. गुरे-ढोरे लख्ख धुवून रानफुलांच्या माळा त्यांच्या गळ्यात घालून शेतकऱयांच्या या दौलतीला मनोभावे ओवाळले जाते आणि घरादाराला बांधलेली रानफुलांची, सोयाबीनच्या शेंगांची तोरणं थंड बोचऱया वाऱयात आनंदाने खिदळून उठतात.

शेणामातीने सावरलेल्या, हळदी-कुंकवाच्या बोटांनी गंधलेल्या अंगणातील तुळशीकट्टा उत्साहात भर घालतो. तुळशीच्या मंजिऱयांसोबत डुलणारं गृहिणीचं तुळसगाणं तर अप्रतिमच ठरतं.

‘अगं अगं तुळशीबाळ, तुला अमृताचे अळी,
रामानं लावली, लक्ष्मणाने आणली
सीताबाईने प्रतिपाळ केला
तुळशी आई माझा नमस्कार तुला
शंभोशिवहरा करीन तुझी सेवा
मोत्याच्या राशी बारशी दिवशी
हातात बेलाचे पान
मला लागलं शिवाचं ध्यान
अगं अगं तुळशी मी एक आळशी
तुला घालीन पाण्याची कळशी

द्याच

तू म्हणशील केंव्हा केंव्हा
तर मला जमेल तेंव्हा
साठ होऊ दे पितरांची पापे जाऊदे जन्माची

हा संवाद दिवाळीचा आनंद वृद्धिंगत करतो.
बदलत्या काळाबरोबर दिवाळीला सजगतेचे भान देणे गरजेचे आहे. ध्वनी व हवेचे प्रदूषण करणारे फटाके उडवणं सोडलं पाहिजे. गेल्या काही वर्षांपासून प्लॅस्टिक मुक्ततेबाबत जनजागरण चालूच आहे.

‘दिवाळी पहाट’सारखे गायनाचे कार्यक्रम, निसर्ग पर्यटन असे उपक्रम होत आहेतच. दिवाळीचे हे बदलते स्वरूप कृतज्ञता, सभ्यता, मनाची संपन्नता या सद्गुणांचे भरण-पोषण करणारे असेल तर या बदलांचे स्वागत निश्चितच करावे लागेल. संत ज्ञानदेवांच्या भावविश्वातील ‘ज्ञानाची दिवाळी’ साकारत असेल, तर हे नव्या बदलाचे ज्ञानाचे दिवे जपून ठेवणे समाजहिताचे ठरेल.

आपली प्रतिक्रिया द्या