लेख – दिवाळीतील शब्दोत्सव

>> प्रा. वैजनाथ महाजन

मराठीत वैविध्यपूर्ण दिवाळी अंकांची ही परंपरा आता शतकोत्तर काळाची वाटचाल सुरू करत असून मराठी साहित्य सशक्त बनविण्यास ती निश्चितच मदत करत आहे. म्हणून महाराष्ट्र संस्कृतीची म्हणून जी खास वैशिष्टय़े नमूद केली जातात, त्यात मराठी दिवाळी अंकांचा शब्दोत्सव हे वैशिष्टय़ आपल्या मनावर कायमचे अधोरेखित झालेले आहे.

‘काशीनाथ रघुनाथ मित्र’ या नावाच्या बंगाली सारस्वताने मराठीत मासिक ‘मनोरंजन’ सुरू केले व त्याच्या बरोबरीनेच रामभाऊ तटणीस यांनी आपले ‘विविध ज्ञानविस्तार’ हे मासिक सुरू केले. कालांतराने या दोघांच्याही मनात दिवाळीच्या निमित्ताने आपण आपल्या मासिकांचे जर वजनदार असे विशेषांक प्रकाशित केले तर ते आपल्या वाचकांना निश्चितच आवडतील व या कल्पनेला मूर्त स्वरूप प्राप्त झाले आणि मराठी साहित्य विश्वात दिवाळी अंकांची आगळीवेगळी परंपरा सुरू झाली. आजही ती त्याच जोमात आणि उत्साहात सुरू आहे. या वर्षी सर्व क्षेत्रावर आणि सर्वदूर कोरोनाचे सावट असूनही मराठी दिवाळी अंकांनी आपली परंपरा कायम राखली ही निश्चितच साहित्यप्रेमी मराठी रसिकांना सुखावणारी बाब आहे. सामान्यतः दिवाळीच्या निमित्ताने मुलांनाही सुट्टय़ा असतात. अशावेळी त्यांच्या हातात देण्याकरिता घरी एक-दोन दिवाळी अंक तरी घेतले पाहिजेत अशी मराठी माणसाची मानसिक जडणघडण आहे. आजकाल वाचन होत नाही अशा प्रकारची सार्वत्रिक ओरड दिसून येते, पण त्यात फारसा तथ्यांश नाही. कारण प्रतिवर्षी किमान पाचशे ते पाचशे पन्नास इतके दिवाळी अंक प्रसिद्ध होत असतात आणि विविध कारणांनी त्यांचा खपही होत असतो. गेल्या काही वर्षांत एखादा विषय निवडून त्यावरच संपूर्ण दिवाळी अंक बेतण्याची अत्यंत स्तुत्य अशी कल्पना निघालेली आहे. असे दिवाळी अंक त्या क्षेत्रातील सर्वांनाच मार्गदर्शक म्हणून उपयुक्त होत असतात व त्यानिमित्ताने त्यांचे वर्षभर वाचनही होत असते. या अशा विषयांना वाहिलेल्या दिवाळी अंकांतून शिक्षण, कला व शेती अशा विविध विषयांना गती मिळत असते आणि त्यातील नवल विशेषही सामान्य वाचकांपर्यंत पोहोचत असतात. असे चांगले आणि वाचकांचे लक्ष वेधून घेणारे दिवाळी अंक सजविण्याकरिता जवळपास सहा महिने अगोदर दिवाळी अंकाचे कामकाज सुरू करणारे संपादकही आपणांस भेटत असतात. त्याबरोबरच अनेक दैनिके आपले स्वतंत्र दिवाळी अंक प्रकाशित करून या क्षेत्रावर आपलाही ठसा उमटवत असतात. अशा अनेक दैनिकांच्या दिवाळी अंकांनी अत्यंत मोलाची अशी सांस्कृतिक जबाबदारी वेळोवेळी पार पाडलेली आहे. मराठीशिवाय अन्य हिंदुस्थानी भाषांत असे एखाद्या सणाच्या निमित्ताने विशेषांक प्रसिद्ध होत असल्याचे फारसे दिसत नाही. बंगालमध्ये दूर्गापूजेच्या निमित्ताने काही मोजके अंक प्रसिद्ध होतात, तर केरळमध्ये ओणम या सणाच्या निमित्ताने काही अंक आवर्जून प्रसिद्ध केले जातात, पण त्यांची संख्या मराठी दिवाळी अंकांच्या तुलनेत जवळपास नगण्यच म्हटली पाहिजे. मराठी दिवाळी अंकात त्या-त्या काळातील प्रथितयश लेखक आणि नवोदित लेखक असे मोठय़ा हिरिरीने सहभागी होत असतात आणि त्या-त्या दिवाळी अंकाचे गुणवत्तेचे सांस्कृतिक कार्य बिनबोभाटपणे पार पाडत असतात. याकरिता लेखकांना दिवाळी अंकाच्या संपादकाकडून पुरेसा वेळही दिला जातो आणि त्यांच्याकडून चांगले लिहूनही घेतले जाते. मराठीत वैविध्यपूर्ण दिवाळी अंकांची ही परंपरा आता शतकोत्तर काळाची वाटचाल सुरू करत असून मराठी साहित्य सशक्त बनविण्यास ती निश्चितच मदत करत आहे. म्हणून महाराष्ट्र संस्कृतीची म्हणून जी खास वैशिष्टय़े नमूद केली जातात, त्यात मराठी दिवाळी अंकांचा शब्दोत्सव हे वैशिष्टय़ आपल्या मनावर कायमचे अधोरेखित झालेले आहे.

आपली प्रतिक्रिया द्या