…तरच थांबेल काैटुंबिक हिंसा

>> डॉ. ऋतू सारस्वत

समाजातील 62 टक्के महिला स्वतःच असे मानतात की, पतीकडून होणारी मारहाण समर्थनीय आहे. एखादी व्यक्ती स्वतःवर झालेली हिंसा योग्य कशी काय ठरवू शकते? वस्तुतः ही पिढय़ान्पिढय़ा हस्तांतरित होणारी एक मनोभावना आहे. बालपणीच स्त्रीच्या मनात तिचे रोपण बेमालूमपणे केले जाते. घराच्या तथाकथित मानमर्यादेचे पालन करणे हे एकटय़ा स्त्रीचे कर्तव्य आहे, असे बिंबविले जाते.

कोरोनाच्या संकटाने जगभरातील अर्थव्यवस्थांचे बारा वाजविले

आहेतच; परंतु या संकटकाळाने आपल्या पितृसत्ताक समाजाचे आतापर्यंत सुप्तावस्थेत राहिलेले काळेकुट्ट वास्तवदेखील ठळकपणे समोर आणले आहे. विकासाचे सर्व मोठमोठे दावे या वास्तवापाशी येताच विरून जातात. जगभरातील महिला आजही शारीरिक हिंसा सहन करतात हेच ते भयावह वास्तव. जगभरातील महिलांमध्ये जपानमधील महिला याबाबतीत सर्वाधिक सुरक्षित मानल्या जातात, परंतु आता तिथेही दरमहा घरगुती हिंसाचाराची 15 हजार प्रकरणे वाढली आहेत. आपल्या तथाकथित सभ्य समाजाने घेतलेला स्त्री-पुरुष समानतेचा मुखवटा कोरोनाच्या संकटाने ओरबाडून काढला आहे. वर्प फ्रॉम होम संस्पृती सुरू झाल्यामुळे एरवी एकमेकांपासून बराच काळ दूर राहणारे पती-पत्नी दिवसभर एकत्र राहू लागले. परिणामी तणाव आणि भांडणांमध्ये वाढ झाली.

काैटुंबिक तणाव वाढण्याची कारणे काहीही असोत, जगभरात झालेली तमाम सर्वेक्षणे असे सांगतात की, अर्ध्याहून अधिक भांडणांचे रूपांतर हिंसाचारात होते. ही हिंसा केवळ शरीरालाच जखमा देते असे नाही, तर ज्या साहसाच्या बळावर माणूस स्वतःला माणूस म्हणून स्वीकारतो आणि मानवासारखा सन्मान मिळण्याची अपेक्षा करतो, ते साहस या हिंसेमुळे माणूस हरवून बसतो. जपानमध्ये वाढलेल्या घरगुती हिंसेच्या प्रकरणांमधून असे स्पष्ट झाले आहे की, परिस्थिती असामान्य असेल तर पुरुषत्वाची भावना सर्व सीमा तोडून टाकते. वस्तुतः महिलांवर पुरुषांकडून होणारी हिंसा ही एक व्यवस्थात्मक समस्या आहे. या व्यवस्थेत पुरुषांना लहान वयातच आक्रमक आणि प्रभावशाली व्यवहार करण्यास प्रवृत्त केले जाते. पुरुषत्वाची, मर्दानगीची ही विषारी भावना युवकांच्या मनात लहान वयापासूनच कशी पेरली जाते याची चर्चा संयुक्त राष्ट्र लोकसंख्या कोशानेही केली आहे. मुलांना लहानपणापासूनच अशा सामाजिक व्यवस्थेची सवय लावली जाते, जिथे पुरुष ताकदवान आणि नियंत्रकाच्या भूमिकेत असतो. मुली आणि महिलांवर प्रभुत्व गाजवणे हेच पौरुष आहे असा विश्वास त्याच्या मनात रुजवला जातो.

समाजात प्रभुत्वाची भावना सहजपणे निर्माण होण्यामागे एक कारण आहे. ते म्हणजे अत्याचार करणारा हक्क समजून अत्याचार करतो आणि सहन करणारा ते सहन करतो. एवढेच नव्हे, तर कालांतराने पीडित व्यक्ती हा अत्याचार वैध मानू लागते आणि त्याविरुद्ध कधीच आवाज उठवत नाही. महिलांचे आरोग्य आणि लैंगिक संवेदना या मुद्दय़ावर काम करणाऱया पॉप्युलेशन फाऊंडेशन ऑफ इंडिया या स्वयंसेवी संस्थेने दिलेल्या माहितीनुसार, 62 टक्के महिला स्वतःच असे मानतात की, पतीकडून त्यांना होणारी मारहाण समर्थनीय आहे. इथे महत्त्वाचा प्रश्न असा उपस्थित होतो की, एखादी व्यक्ती स्वतःवर झालेली हिंसा योग्य कशी काय ठरवू शकते? वस्तुतः ही पिढय़ान्पिढय़ा हस्तांतरित होणारी एक मनोभावना आहे. बालपणीच स्त्रीच्या मनात तिचे रोपण बेमालूमपणे केले जाते. घराच्या तथाकथित मानमर्यादेचे पालन करणे हे एकटय़ा स्त्रीचे कर्तव्य आहे असे बिंबविले जाते. हे कर्तव्य बजावताना तिला कितीही त्रास झाला तरी तिने तो निमूटपणे सहन करावा, असे सांगितले जाते. दुसरी गोष्ट म्हणजे पुरुष हे स्वभावतःच शीघ्रकोपी असतात. तो घरातील कर्ता असतो आणि त्यामुळे क्रोधातून झालेली हिंसा समर्थनीयच आहे, असे स्त्रीला सांगितले जाते.

अशा सामाजिक आणि सांस्पृतिक परिस्थितीत कोणत्याही महिलेला तिच्यावर होणाऱया घरगुती हिंसाचाराबाबत कायद्याची मदत घेताना प्रचंड अडथळे येतात. कारण तिला ठाऊक असते की, आपण कायद्याची मदत घेतली तर आपल्याला आपली नाती कायम ठेवणे दुरापास्त होईल. स्त्री सशक्तीकरणाचे कितीही दावे केले जात असले तरी वैवाहिक संबंध संपुष्टात आल्यानंतर एकटय़ा स्त्रीलाच मानसिक त्रास आणि समाजाकडून अवहेलना सहन करावी लागते हे वास्तव नाकारता येणार नाही. अशा परिस्थितीत काैटुंबिक हिंसाचाराची समस्या सोडविणे सोपे नाही. काैटुंबिक हिंसाचार रोखण्याच्या प्रक्रियेत संपूर्ण समाजाने सहभाग नोंदविणे अपेक्षित आहे. त्याचप्रमाणे पुरुषत्वाची विकृत व्याख्या सुधारण्याची गरज आहे. काैटुंबिक हिंसाचाराच्या दुष्परिणामांबाबत संपूर्ण समाजाला जागरुक केले गेले नाही तर पुढील पिढय़ांना मानसिकदृष्टय़ा विकृतीचा मुकाबला करावा लागेल.

आपली प्रतिक्रिया द्या