
>> विनायक
ज्वालामुखी म्हटलं म्हणजे आम्हाला पूर्वापार आठवतो तो जपानमधला फुजियामा. जपानची राजधानी टोकियोपासून नैऋत्येला किंवा दक्षिण-पश्चिमेला सुमारे 100 कि.मी.वर जगप्रसिद्ध फुजी पर्वत आहे. जपानी भाषेत यामा म्हणजे पर्वत. म्हणून तो फुजियामा. सहज लक्षात ठेवलंत तर याच भाषेत नदीला कावा आणि सूर्याला निहॉन म्हणतात… आणि गायीला उशी! हे एका जपानी मुलाकडून अनेक वर्षांपूर्वी माहीत झालं होतं इतकंच.
…तर साधारण 9 ते 10 हजार फूट उंचीचा फुजी पर्वत धगधगता ज्वालामुखी असं मानलं गेलं. कारण 1707 पर्यंत तो आग आणि राख ओकताना लोकांनी पाहिलाय. शिवाय तो सध्या डॉर्मन्ट (निद्रिस्त) असला तरी कोणत्याही क्षणी जागा होऊ शकतो. जपानच्या छोटय़ाशा भूभागात सुमारे 110 ऑक्टिव्ह आणि गेल्या 10 हजार वर्षांपर्यंत उफाळलेले 120 ज्वालामुखी आहेत. जपानचा समावेश पृथ्वीवरच्या आग ओकणाऱया ज्वालामुखींच्या ‘अग्निकंकणा’त किंवा ‘रिंग ऑफ फायर’मध्ये होतो. सूर्याच्या कंकणाकृती ग्रहणालाही इंग्लिशमध्ये असंच म्हणतात. फक्त ती आकाशातली ‘रिंग ऑफ फायर’ असते.
आपला देश या ‘रिंग ऑफ फायर’मधल्या प्रमुख देशात येत नसला तरी आपल्या अंदमानातल्या ‘बॅरन’ बेटावर ऑक्टिव्ह किंवा उफाळणारा ज्वालामुखी आहे. आपल्या महाराष्ट्रातला सहय़ाद्री हा सुप्त ज्वालामुखी असून साडेसहा कोटी वर्षांपूर्वी त्यातून निघालेल्या तप्त लाव्हारसातूनच दक्षिणेचा खडकाळ पठारी भाग निर्माण झालाय. संपूर्ण पश्चिम घाटातील डोंगरमाला सुप्त अथवा निद्रिस्त ज्वालामुखी समजली जाते. गुजरातमध्ये कच्छमधल्या धीनोधर टेकडय़ा पाच कोटी वर्षांपूर्वी तर हरीयाणातील थोसी टेकडय़ा साडेसात कोटी वर्षांपूर्वी धगधगत्या ज्वालामुखी होत्या. थोडक्यात आपल्या देशाचा अर्धाअधिक भाग सुप्त ज्वालामुखीने व्यापलेला आहे.
सध्या पृथ्वीवर जिथे जिथे जागृत ज्वालामुखी आहेत त्या देशांचा समावेश ‘रिंग ऑफ फायर’मध्ये होतो. इंडोनेशिया, न्यूझीलंड, न्यू गियाना, फिलिपाइन्स, जपान, यूएस (अमेरिका), चिली, ग्वाटेमाला, रशिया, मेक्सिको, अंटार्क्टिका, सॉलोमन बेटे हे मुख्य भाग या अग्निकंकणात येतात. या व्यतिरिक्त बोलिव्हिया, इक्वेडोर, कोस्टा रिका, ऑस्ट्रेलिया या आणि पृथ्वीवर इतर अनेक ठिकाणी ज्वालामुखी उफाळू शकतात अशी ठिकाणं आहेत. ताजा ज्वालामुखीचा उद्रेक 8 एप्रिल 2025 या दिवशी फिलिपाइन्सच्या पॅन्लाझोन पर्वतावर झाला आणि राखेचे ढग (नंतर ढीग) चार कि.मी.पर्यंत पसरले.
टोंगा ज्वालामुखी 15 जानेवारी 2022 रोजी उफाळला आणि त्यामुळे भूगर्भात झालेल्या मोठय़ा विस्पह्टांनी सारा परिसर हादरला. त्यातच याचा परिणाम होऊन या भागात प्रलयंकारी त्सुनामीने थैमान घातले. 50 कि.मी.पर्यंत उडालेल्या गॅस आणि राखेने वातावरण कमालीचं प्रदूषित केलं. या भूपंपाचा कर्कश आवाजाच्या ध्वनीलहरी पृथ्वीभर पोहोचल्या. टोंगा हा देश म्हणजे फिजीजवळच्या समुद्रातील सुमारे 170 बेटांची मालच आहे. तिथे तुपौ नावाचा राजा आहे.
‘रिंग ऑफ फायर’ अनेक प्लेट टॅक्टॉनिकवर पसरली आहे. युरेशियन, पॅसिफिक आणि अमेरिकन प्लेटवर असलेला हा भूकंपप्रवण भूभाग सुमारे 4000 चौ.कि.मी.चा आहे. या अग्निपंकणात छोटेमोठे असे 700 ते 900 ज्वालामुखी असून काही ज्वालामुखी लाव्हा, धूर, गॅस ओकताना आजही पाहायला मिळतात. पॅसिफिक महासागरातील किलाउआ नावाचा ज्वालामुखी, जगातला सर्वात जागृत ज्वालामुखी असून 1983 पासून तो सतत आग, राख ओकत असल्याने गेल्या वर्षी 24 डिसेंबरला त्याने 1200 मीटर उंचीपर्यंतच्या अग्निज्वाळा फेकल्या! या किलाउआ किंवा किलौआ बेटावरच्या ज्वालामुखीने गेल्या हजार वर्षांत बेटाचा 90 टक्के भाग व्यापलाय.
सिसिलीच्या उत्तरेकडे ग्रीकांनी ज्याला भूमध्य सागराचे ‘दीपगृह’ असंच म्हटलंय तो ज्वालामुखी गेली 2400 वर्षे जवळ जवळ सतत आग ओकत असतो. जगातला सर्वात मोठा निद्रिस्त ज्वालामुखी 2013 मध्ये संशोधकांना सापडला. ह्युस्टन विद्यापीठाच्या या संशोधकांनी सुमारे 700 कि.मी. रंदीचा तामू मासिफ हा पृथ्वीवरचा सर्वात दूरवर लाव्हा पसरवलेला मृत किंवा निद्रिस्त ज्वालामुखी असून मंगळ ग्रहावरच्या ज्वालामुखीजन्य आणि संपूर्ण ग्रहमालेत सर्वात उंच पर्वत असलेल्या माउंैट ऑलिम्पसच्या पायथ्याच्या 75 टक्के विस्तार या मासिफ (सुस्त) ज्वालामुखीचा आहे.
आपण भूपृष्ठावरचे सारे निवासी आणि महासागरसुद्धा प्रचंड जाडीच्या ‘प्लेट टेक्टॉनिक’वर वसलो आहोत. त्याखाली असलेला उकळता अश्मलोह रस अनेकदा या प्लेटच्या भेगांमधून किंवा प्लेटचा चपटा भाग फोडून बाहेर पडतो. त्यामुळे या प्लेट हलतात. त्यांचं सूक्ष्म हलणं रोजच पृथ्वीवर हजारो नगण्य भूकंप घडवत असत. मात्र हे हेलकावणे रिश्टर स्केलवर दोनच्या पुढे गेले तर भूकंप जाणवतो. त्यापेक्षा जास्त रिश्टर स्केलचे भूकंप विनाश घडवू शकतात. अलीकडेच नेपाळ, उत्तर हिंदुस्थान आणि नुकताच ग्रीसजवळ मोठा भूपंप झाला. सारं सजीव जग असं ज्वालामुखीच्या तोंडावर वसलं आहे असेही वेगळय़ा अर्थाने म्हणता येईल. भूकंप, त्सुनामी, महावादळे, धूर, वणवा या नैसर्गिक आपत्ती टाळता येत नाहीत. त्यांचा केवळ अंदाज घेऊन उपाययोजना करावी लागते. एरवी शांतपणे थोडा धूर, राख ओकणारे अनेक ज्वालामुखी ‘टुरिस्ट स्पॉट’सुद्धा झालेत. पण त्यांनी उग्र रूप धारण केले तर मात्र भीषण आपत्ती ओढवते.