प्रासंगिक – डॉ. भा. रा. अंधारे

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

नागपूरकर भोसले हे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या वंशातील आहेत. त्याच घराण्यातील रघुजीराजे पहिले हे छत्रपती शिवाजी महाराजांचे समकालीन आहेत. त्यांना वऱहाडातील पातूरला जहागीर देण्यात आली. त्याकाळी पूर्व विदर्भ, मध्य प्रदेश, छत्तीसगड या भागात गोंडाचे राज्य होते. गोंड राजांना मुसलमान सत्ताधाऱयांशी नेहमी संघर्ष करावा लागत होता. यात पहिल्या रघुजीराजांनी गोंड राजांना मदत केली. अखेर गोंड राजांकडून सत्ताही काबीज केली. पहिला रघुजी भोसले हा पराक्रमी होता. त्याने भोसल्यांची सत्ता थेट ओडिशा व पश्चिम बंगालपर्यंत नेली होती. केवळ तलवारीच्या भरवशावर पहिल्या रघुजींनी शक्तिमान मुसलमान राज्यकर्त्यांना पराभूत केले होते. हा देदीप्यमान इतिहास फारसा महाराष्ट्राला माहीत नाही.

छत्रपती शिवाजी महाराज यांच्या कामगिरीपुढे पहिल्या रघुजींच्या पराक्रमाचे पोवाडे फारसे गायिले गेले नाहीत. हा इतिहास व पहिल्या रघुजीचा पराक्रम लोकांसमोर आणण्याचे काम डॉ. भा. रा. अंधारे यांनी अत्यंत कष्टाने व अचूकपणे केले आहे. त्यामुळे त्यांना नागपूरकर भोसल्यांचा इतिहासकार म्हटले तरी वावगे ठरणार नाही.
डॉ. अंधारे हे मूळचे मध्य प्रदेशातील आहेत. त्यांचा जन्म वाराशिवनी या गावात झाला. त्यानंतर ते महाविद्यालयीन शिक्षणासाठी नागपुरात आले व नागपुरातील मॉरिस कॉलेजमध्ये त्यांनी इतिहास या विषयातून सुवर्ण पदकासह पदवी प्राप्त केली. मॉरिस कॉलेजमध्ये प्राध्यापक म्हणून रुजू झाले. त्यांनी पीएच. डी. ही बुंदेलखंडातील राजवटीवर केली आहे. बुंदेलखंडातील मराठी राजवट हा त्यांच्या प्रबंधाचा विषय होता, परंतु पुढे त्यांनी नागपूरकर भोसल्यांचा इतिहास समोर आणण्याचे काम अत्यंत निष्ठेने केले. संशोधन शिंपले या पुस्तकांच्या मालिकेत त्यांनी नागपूरकर भोसल्यांचा इतिहास समोर आणला. त्यात पहिल्या रघुजीचे चरित्र, पहिल्या रघुजीचे सुपुत्र जानोजी, त्यानंतर दुसरे रघुजी यांच्या काळातील इतिहास नागपूरकरांसमोर आणला. तोपर्यंत नागपूरकर भोसल्यांच्या इतिहासावर फारसे पुणी काही लेखन केले नव्हते. विदर्भ व नागपूरच्या इतिहासावर यापूर्वी दे. गो. लांडगे व या. मा. काळे यांनी लेखन केले होते, परंतु डॉ. अंधारे यांनी नागपूरकर भोसल्यांच्या प्रत्येक काळाचे अत्यंत सखोल विश्लेषण केले आहे.

शिवाजी महाराजांच्या अलौकिक व्यक्तिमत्त्वाची दखल बहुसंख्य इतिहासकारांनी घेतली, परंतु पहिल्या रघुजीचा पराक्रमही काकणभरही कमी नव्हता. तलवारीच्या भरवशावर त्यांनी पूर्व विदर्भासह छतरपूर, जगदलपूर, अगदी ओडिशापर्यंत त्यांनी सत्ता संपादन केली. बहुतेक मुसलमान सत्ताधाऱयांशी त्यांना सामना करावा लागला. ओडिशातील जगन्नाथ पुरीच्या मंदिराचे पुनरुज्जीवन भोसल्यांनी केले आहे. हा सर्व इतिहास धुंडाळणे सोपे काम नव्हते. संयुक्त महाराष्ट्राच्या निर्मितीनंतर नागपुरात असलेले ऐतिहासिक दस्ताऐवज मध्य प्रदेश सरकारने ताब्यात घेतले होते. ते सर्व दस्तऐवज आता जबलपूरमध्ये आहेत. या दस्ताऐवजांचा आधार घेत डॉ. अंधारे यांनी नागपूरकर भोसल्यांच्या इतिहासातील विविध घटनांचा व सत्ताधाऱयांचा इतिहास जनतेसमोर आणला आहे. हे काम आयुष्यभर निष्ठsने केले. यात नव्या इतिहासकारांना प्रोत्साहन देण्याचा, त्यांना ग्रंथ उपलब्ध करून देण्याचा त्यांचा सातत्याने प्रयत्न राहिला होता. त्यांच्या या प्रोत्साहनामुळे नागपूरकर भोसले व नागपूरच्या इतिहासावर अनेक तरुण संशोधकांनी प्रबंध व पुस्तके लिहिली आहेत. त्यांचे ग्रंथालय हे त्यांच्यासाठी नेहमीच खुले राहत होते. अध्यापन करण्याचा त्यांचा पेशा राहिल्याने ते विद्यार्थ्यांमध्येही लोकप्रिय होते. इतिहासाचे लेखन करीत असताना त्यांना इतिहासाची साधने व वस्तू जमा करण्याचा छंद होता. त्यांचे घर म्हणजे एक संग्रहालय आहे. यात अनेक दुर्मिळ कागदपत्रे त्यांनी सांभाळून ठेवली आहेत. लोकमान्य टिळकांनी वापरलेले उपरणेसुद्धा त्यांच्या या संग्रहालयात उपलब्ध आहे. इतिहासातील अनेक करारांच्या मूळ प्रती, कुंडल्या, लग्नपत्रिकांचा खजिना त्यांच्या संग्रहालयात आहे. यासाठी त्यांनी हिंदुस्थानभर भ्रमण करून अत्यंत निष्ठेने इतिहासाची ही दौलत जमा केली आहे. आयुष्याच्या अखेरपर्यंत केवळ नागपूरकर भोसल्यांच्या इतिहासावर संशोधन करणाऱया या संशोधकाच्या निधनाने इतिहास संशोधनातील बुरूज कोसळला आहे.

– सुरेश भुसारी