ठसा : डॉ. कमळाकर पंडित

51


>> सामना प्रतिनिधी 

दवाखान्याची पायरी चढणे म्हणजे खिसा रिकामा करणे असे सध्याचे समीकरण असले तरी आजही काही डॉक्टर ‘रुग्णसेवा ही ईश्वरसेवा’ मानून अत्यल्प शुल्क आकारत आहेत. प्रसंगी निःशुल्क उपचार करीत आहेत. वसई परिसरात अनेक दशके वैद्यक व्यवसाय करणारे डॉ. कमळाकर गजानन पंडित अशाच मोजक्या डॉक्टरांपैकी एक होते. खूप तरुण वयात मधुमेहाने गाठले असतानाही शिस्त, निग्रह आणि संयम या त्रिसूत्रीच्या बळावर डॉक्टरांनी नव्वदी पार केली. कधी रुग्णसेवेत खंड येऊ दिला नाही. फी माफक म्हणावी की निःशुल्क एवढी कमी घेत असून प्रसंगी स्वतः पदरमोड सोसून ते रुग्णसेवा करीत राहिले. तोच वारसा त्यांचे कुटुंबीय पुढे चालवीत आहेत. जगात देव आहे की नाही माहीत नाही, परंतु काही माणसं मात्र देवासारखी असतात. कमळाकर पंडित त्यापैकी एक होते. अनेक रुग्णांचा आजार डॉक्टरांना भेटले की बरा व्हायचा. खरेतर ज्या काळात डॉक्टरांनी प्रॅक्टिस सुरू केली त्या काळात वसई तालुक्यातला वासळई परिसर म्हणजे एक छोटे खेडेगाव होते. अशा ठिकाणी त्या काळात मोठे डॉक्टर प्रॅक्टिस करीत नसत. मात्र डॉ. कमळाकर पंडित यांनी खेडेगावातच प्रॅक्टिस करायचे ठरवले होते. त्यानुसार गेली 45 वर्षे भुईगाव, निर्मळ परिसरात ते रुग्णांची सेवा करीत राहिले. डॉक्टर पंडित यांचा जन्म 2 ऑक्टोबर 1929 रोजी वसई येथील एका धन्वंतरी कुटुंबात झाला. त्यांचे वडील आणि मोठे भाऊसुद्धा डॉक्टर होते. त्यांनीसुद्धा गोरगरीबांची सेवा केली. सध्या पंडित कुटुंबातील 11 व्यक्ती डॉक्टर आहेत. वेगवेगळय़ा ठिकाणी ते लोकांची सेवा करीत आहेत. डॉ. पंडित अचूक नाडीपरीक्षा करायचे. ते रुग्णाला त्याच्या आजारपणाविषयी स्पष्ट कल्पना देत. आजाराचे स्वरूप, त्यावरील उपचार, रुग्णाने कोणती काळजी घ्यावी, कोणते पथ्य पाळावे हे ते नीट समजावून सांगत. रुग्णांची ते अतिशय आस्थेने विचारपूस करीत असत. त्यानंतर औषध देत. गोरगरीबांकडून त्यांनी कधी पैशांची अपेक्षा केली नाही. रुग्ण कल्याण हाच डॉक्टरांचा ध्यास आणि श्वास होता. पैसे नाहीत म्हणून त्यांनी कधी उपचार थांबवले नाहीत. उलट पदरमोड करून अनेकदा रुग्णांना बाहेरचे औषध आणायला त्यांनी पैसे दिले. अखेरपर्यंत त्यांनी हे व्रत पाळले.

आपली प्रतिक्रिया द्या