ठसा – डॉ. शशिकांत बऱ्हाहाणपूरकर

1404

>> प्रशांत गौतम

विद्यार्थीप्रिय प्राध्यापक अशी ओळख लाभलेले आणि नाट्यशास्त्र विभागाच्या जडणघडणीत महत्त्वाचा सहभाग असलेले ज्येष्ठ रंगकर्मी डॉ. शशिकांत बऱ्हाणपूरकर यांचे झालेले अकाली निधन रंगकर्मींसाठी धक्कादायकच आहे. दर्जेदार नाटय़निर्मिती आणि कलावंतांना व्यासपीठ देणारे, नवीन रंगकर्मींना मार्गदर्शन करणारे विद्यापीठ अशी ओळख विद्यापीठातील काही प्राध्यापकांनी करून दिली, त्यात शशिकांत बऱ्हाणपूरकर यांचेही नाव महत्त्वाचे समजले जाते. त्याचे उदाहरण आजच्या आघाडीचा अभिनेता मकरंद अनासपुरे, मंगेश देसाई यांचे देता येईल. दोन्ही कलावंतांच्या जडण-घडणीत त्यांचा मोठा सहभाग राहिला आहे. अंबाजोगाई येथील योगेश्वरी महाविद्यालयात पदवीपर्यंत शिक्षण झालेल्या बऱहाणपूरकर यांनी प्राणीशास्त्र्ा विषयात पीएच.डी. संपादन केली. त्यानंतर अमेरिकेतील मँचेस्टर विद्यापीठात नाट्यशास्त्र विषयातही पीएच.डी. प्राप्त केली. प्राणीशास्त्र्ा आणि नाट्यशास्त्र या विषयांत पीएच.डी. प्राप्त केलेले बऱ्हाणपूरकर डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या नाट्यशास्त्र विभागात प्राध्यापक म्हणून कार्यरत राहिले. खरेतर बऱ्हाणपूरकर हे मुळात रंगकर्मी होते, त्यांनी आपले आयुष्य रंगभूमीसाठी समर्पित केले, एवढेच नव्हे तर त्यांनी मराठवाडय़ाच्या रंगभूमीसाठी या प्रदेशातून येणाऱया नवीन रंगकर्मींसाठी ते विशेष प्रयत्नशील असायचे. ग्रामीण भागातील कलावंतांविषयी त्यांना विशेष आस्था होती. नाटकाची संहिता, दिग्दर्शनाच्या दृष्टिकोनातून कशी पहावी याचे उत्तम मार्गदर्शन ते आपल्या विद्यार्थ्यांना करीत असत. नाटय़संहितेमधील खुबी ते नाटय़ कलावंत विद्यार्थ्यांना नेमकेपणाने दाखवून देत असत. डॉ. बऱ्हाणपूरकर हे केवळ रंगकर्मी आणि दिग्दर्शकच नव्हते, तर त्यांना सामाजिक विषयाची आवड होती, पाणी प्रश्नातील मेख नेमकी कुठे असते हे जाणून घेण्यासाठी ते संबंधित विषयात जाणकारांशी चर्चा करीत असत. विद्यापीठाच्या नाट्यशास्त्र विभागात अनेक महत्त्वाचे उपक्रम राबवून विद्यापीठाचा नावलौकिक देशभर वाढवला. त्यासाठी तब्बल साडेतीन दशके एवढा काळ योगदान दिले. ‘नाट्यशास्त्र , सिनेमा आणि पत्रकारिता’ या विषयांची सांगड घालणारा एखादा अभ्यासक्रम विद्यापीठात असला पाहिजे, अशी त्यांची इच्छा होती. पारंपरिक चौकटी मोडून दिग्दर्शन करणारे ते असल्याने आगामी काळात नवीन काही निर्मिती होऊ शकली असती, पण ते आता होणे नाही.

डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या नाट्यशास्त्र विभागाला डॉ. कमलाकर सोनटक्के, डॉ. लक्ष्मण देशपांडे, डॉ. कुमार देशमुख, डॉ. रुस्तुम अचलखांब यांच्यासारखे विभागप्रमुख म्हणून लाभले. डॉ. शशिकांत बऱहाणपूरकर यांनी आपल्या विभागप्रमुख पदाच्या कार्यकाळात विभागाला उंचीवर नेऊन वैविध्यपूर्ण उपक्रम राबवले. मराठवाडय़ात अस्सल लोककलावंतांची खाण आहे. त्यांना मोठे व्यासपीठ मिळायला हवे, असे बऱहाणपूरकर यांना नेहमी वाटायचे. ही कल्पना त्यांनी प्रत्यक्षात आणलीही. मराठवाडा लोकोत्सव सुरू करून अस्सल लोककलावंतांना त्यांनी हक्काचे व्यासपीठ निर्माण करून दिले हे त्यांचे भरीव योगदान कुणालाही विसरता येणार नाही. शशिकांत बऱहाणपूरकर हे जागतिक रंगभूमीचे अभ्यासक होते, मात्र उपेक्षित, वंचित बहुजन रंगकर्मीच्या ते सदैव पाठीशी असत. त्यांच्या अकाली जाण्यामुळे नाट्यशास्त्र विभाग उंचीवर नेणारा शिल्पकार काळाच्या पडद्याआड गेला आहे. नव्या रंगकर्मींना हक्काचे व्यासपीठ देणारा खंबीर पाठीराखा हरपला आहे.

आपली प्रतिक्रिया द्या