नृत्यसाधनेचा आदर्श!

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

>> स्वप्नाली अभंग

देशविदेशात आपली कला सादर केलेल्या सुचेता भिडे चापेकर यांनी आपली कलेतील साधना, अभ्यास, प्रयोगशील वृत्ती यांचा नवा आदर्श पुढच्या पिढीसमोर ठेवला आहे. चार दशकांहून अधिक काळ अखंडपणे कलेची साधना करणाऱ्या भिडे यांनी आपली कला ही स्वतःपुरती न ठेवता पुढच्या पिढीकडेही आपल्या कलेचा वारसा सोपविला आहे.

भरतनाटय़म या नृत्य प्रकारातलं एक अग्रगण्य नाव म्हणजे सुचेता भिडे चापेकर. भरतनाटय़म हा नृत्य प्रकार आपल्या अनोख्या शैलीत महाराष्ट्रातल्या तमाम रसिक प्रेक्षकांपर्यत पोहोचवणाऱया सुचेता भिडे चापेकर यांना यंदाचा मानाचा ‘मास्टर दीनानाथ’ पुरस्कार जाहीर झाला आहे. वयाच्या पाचव्या वर्षापासून भिडे यांनी भरतनाटय़म शिकायला सुरुवात केली. त्यांची नृत्यातली गती आणि आवड पाहून त्यांच्या वडिलांनी त्यांना नृत्य शिकण्यासाठी प्रोत्साहन दिलं. तेव्हापासून सुरू केलेली ही नृत्याची साधना सुचेता भिडे यांनी वयाची सत्तरी पार केल्यानंतरही सुरू ठेवली आहे.

देशभर विविध ठिकाणी नृत्याचे कार्यक्रम करत असताना त्यांच्या लक्षात आलं की, भाषिक अडचणींमुळे भरतनाटय़मसारख्या सुंदर कलेपासून प्रेक्षक दूर आहेत. तामीळ, तेलुगू, कर्नाटक संगीत कानांना छान वाटत असलं तरी इतर भाषिक प्रेक्षकांपर्यंत त्याचा आत्मा पोहोचत नाही. एखाद्या रचनेचा आत्माच जर प्रेक्षकांपर्यंत पोहोचला नाही तर ते नृत्य, कला प्रभावी ठरत नाही. म्हणूनच प्रेक्षकांना या कलेचा आस्वाद घेता यावा, त्यांच्यातील हा भाषिक अडसर दूर होऊन ती कला त्यांच्यापर्यंत पोहोचवी या हेतूने त्यातला आशय, मूल्य कायम ठेवून त्यांनी स्वतःची ‘नृत्यगंगा’ ही अनोखी नृत्यशैली तयार केली आणि ती प्रचंड लोकप्रिय झाली. भरतनाटय़मचे मूळ सौंदर्य कायम राखत हिंदुस्थानी संगीतात हिंदी, मराठी रचना त्यांनी सादर केल्या. त्याला रसिकांचा भरघोस प्रतिसाद लाभला. या प्रयोगासाठी त्यांनी तंजावूरच्या मराठी राजांच्या रचनांचा खोल अभ्यास केला.

शहाजीराजे, सर्फरोजीराजे यांच्या अनेक मराठी, हिंदी आणि संस्कृत रचनांचं सादरीकरण त्यांनी केलं. अर्थात हे करणं काही तितकं सोपं नाही. एका विशिष्ट प्रदेशाची परंपरा, विशिष्ट संगीत आणि त्या अनुषंगाने येणारी विशिष्ट देहबोली त्याच्याशी जोडली गेलेली असते आणि इतर भाषेत त्याचा बाज कायम ठेवून ते सादर करणं फार कठीण असतं असं भिडे म्हणतात. ‘नृत्यगंगा’ही केवळ एक कार्यक्रम आणि चार रचनांपुरती मर्यादित नाही. अभिनयाचे अनेक अंग त्यात दिसतील. नाटय़गीत, ठुमरी असे अनेक प्रयोग त्यांनी त्यात केले. यासाठी आवश्यक असणारा अभ्यास, साधना सुचेता यांनी केली. अन्न, वस्त्र, निवारा यानंतर माणसाची कुठली गरज असेल तर ती कलेची आहे. कलेशिवाय माणूस जगूच शकत नाही. नृत्य ही तर परिपूर्ण अशी कला आहे, ज्यात संगीत आहे, देहबोली आहे, हावभाव आहेत असं त्या म्हणतात. देशविदेशात आपली कला सादर केलेल्या सुचेता भिडे चापेकर यांनी आपली कलेतील साधना, अभ्यास, प्रयोगशील वृत्ती यांचा नवा आदर्श पुढच्या पिढीसमोर ठेवला आहे.

चार दशकांहून अधिक काळ अखंडपणे कलेची साधना करणाऱया भिडे यांनी आपली कला ही स्वतःपुरती न ठेवता पुढच्या पिढीकडेही आपल्या कलेचा वारसा सोपविला आहे. अनेक शिष्यांना त्यांनी घडवलं. ‘आनंदासाठी कला, कलेसाठी कला आणि जीवनासाठी कला’ हे ब्रीद घेऊन त्यांनी कलावर्धिनी चॅरिटेबल संस्थेची स्थापना केली. ‘नृत्यगंगा’ महाराष्ट्रात तळागाळापर्यंत पोहोचावी म्हणून त्यांनी प्रयत्न केले. त्यांच्या शिष्याही तितक्याच समर्थपणे ‘नृत्यगंगा’ महाराष्ट्राच्या कानाकोपऱयात पोहोचवत आहेत. ‘‘कुठलाही पुरस्कार हा त्या कलाकारासाठी उत्साह वाढवणारा असतो, परंतु एका कलावंत कुटुंबाकडून मिळणाऱया या पुरस्काराचं विशेष महत्त्व आहे. संगीत क्षेत्रातल्या दिग्गज अशा मंगेशकर कुटुंबाने नृत्यातली ही अभिजात कला ओळखली आणि तिचा गौरव केला म्हणूनही मंगेशकर कुटुंबाचं विशेष कौतुक वाटतंय’’ असं त्या म्हणतात. वयाची सत्तरी पार केल्यानंतरही सुचेता भिडे यांचा उत्साह कायम आहे. अजूनही त्या सोलो फरफॉर्मन्स तितक्याच समर्थपणे करतात. ‘‘रोजचा रियाज केला नाही तर माझं अंग दुखतं आणि हाच माझ्यासाठी माझा फिटनेस आहे’’ असं त्या म्हणतात. ‘‘आजच्या मुलांच्या शिकण्याचा, आत्मसात करण्याचा वेग खूप आहे आणि त्यांच्याकडे बुद्धिमत्ताही प्रचंड आहे. त्यामुळेच गुरूंचीही जबाबदारी तितकीच वाढली आहे.

पैसे घेऊन केवळ नृत्यातलं तंत्र शिकवणं म्हणजे कला नाही, तर कलेसाठी लागणारी साधना तितकीच महत्त्वाची आहे आणि ती गुरूंनीच शिष्याकडून करून घेतली पाहिजे’’ असंही त्या आवर्जून सांगतात. सुचेता भिडे चापेकर यांच्यासाठी नृत्य हेच जीवन, भरतनाटय़म हाच श्वास आणि या कलेचा प्रसार हेच ध्येय असल्याची खात्री त्यांना भेटल्यावर पटते.

[email protected]