लेख – देशाच्या सुरक्षेसाठी ड्रोन तंत्रज्ञानाचा वापर

165

>> ब्रिगेडियर हेमंत महाजन

पाकिस्तानने काही आठवडय़ांपूर्वी पंजाब प्रांतामध्ये ड्रोनच्या मदतीने 5 एके 47 रायफल्स आणि स्फोटके पाठवली होती. त्यामुळे देशामध्ये चिंतेचे वातावरण निर्माण झाले. मात्र आपल्याही लष्कराला ड्रोनचा चांगला वापर करता येतो, ज्यामुळे देशाची सुरक्षा अधिक सक्षम होऊ शकते. सध्या हिंदुस्थानी लष्कर ड्रोनचा वापर अतिउंचीवर तैनात असलेल्या हिंदुस्थानी सैन्याला त्यांची शस्त्रे, दारूगोळा आणि रसद पाठवण्यासाठी उपयोग करण्याच्या प्रयत्नात आहे.

आज हिंदुस्थानमध्ये पाच ते सहा लाख ड्रोन असावीत. त्यांचा वापर

आता सरकारी परवानगी घेऊन आणि परवाना घेऊनच करता येईल. अशा ड्रोनचा वापर सियाचीन ग्लेशियर आणि अनेक डोंगराळ भागांमध्ये सैन्य तैनात आहे तिथे करता येईल. या भागात सामान वाहण्यासाठी रस्ते तयार करणे अत्यंत खर्चिक आहे, तिथे सामान वाहून नेण्याकरिता ड्रोनचा वापर करता येईल. सियाचीनसारख्या 15 हजार फूट उंच जागी सैन्य सैनिकांच्या पाठीवर सामान वाहून नेते किंवा त्यांना म्यूल किंवा घोडय़ाच्या पाठीवर सामान लादून पाठवले जाते. अर्थातच हे सर्व अतिशय कठीण व खर्चिक आहे. कारण 18 ते 20 हजार फूट उंचीवर माणूस पाठीवर लादून फारच कमी सामान वाहू शकतो. म्हणूनच अशा भागामध्ये आपण ड्रोनचा वापर एक म्यूल ड्रोन म्हणजे सैनिकांकरिता सामान वाहून नेणारे वाहन म्हणून करू शकतो.

डोंगराळ भागामध्ये मोठी धावपट्टी तयार करणे पुरेशी सपाट जमीन नसल्यामुळे शक्य नसते. त्यामुळे छोटय़ा धावपट्टीवरून उड्डाण करावे लागते. मात्र सामान घेऊन जाण्यासाठी त्यांचा पल्ला 10-15 किलोमीटर एवढा असला पाहिजे. त्यांची 25 ते 250 किलो या वजनाचे सामान घेऊन जाण्याची क्षमता असली पाहिजे. अशा ड्रोनवर हिंदुस्थानी सैन्याचे संशोधन सुरू आहे. अशा प्रकारची ड्रोन मजबूतही असावी लागतील. कारण त्या भागामध्ये हवामान थंड असते, ढगाळ असते, बर्फ पडतो, पाऊस पडतो आणि इतर नैसर्गिक आपत्तींनाही तोंड द्यावे लागते. त्यामुळे खराब वातावरणाला तोंड देण्याची ड्रोन्सची क्षमता असली पाहिजे. या भागामध्ये असलेले तापमान हे उणे 25 अंश सेल्सियस असते. त्यामुळे या ड्रोनची एवढय़ा नीचांकी तापमानात उड्डाण करण्याची क्षमता पाहिजे. या ड्रोनमध्ये आयआरएनएसएस नावाची हिंदुस्थानात विकसित झालेली जीपीएस पद्धती वापरली जाईल. ज्यामुळे युद्धकाळात सुरक्षेचा धोका जो परदेशातील पद्धतींकडून होऊ शकतो, तो नसेल.

हिंदुस्थान आणि अमेरिका यांच्यामध्ये अलीकडेच झालेल्या कराराप्रमाणे सगळ्या लष्कराच्या उपयोगाच्या ड्रोन्सविषयी एकत्रित संशोधन करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. अमेरिका ही तंत्रज्ञानाची महाशक्ती आहे. त्यांना या विषयावर अधिक संशोधन करून या तंत्रज्ञानाचा वापर देशाच्या सुरक्षिततेसाठी करायचा आहे. त्यामुळेच वेगवेगळ्या प्रकारच्या ड्रोन्सची निर्मिती, संशोधन आणि आरेखन करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. हिंदुस्थान- अमेरिका टेक्नॉलॉजी को-ऑपरेशन म्हणजे तंत्रज्ञानामध्ये सहकार्य या क्षेत्रामध्ये हे काम होणार आहे. एकत्रित संशोधन झाले तर ड्रोन्सचा वापर लष्करासाठी लवकर करता येईल.

ड्रोन्सचा वापर हिंदुस्थान-चीन सीमेवरही करू शकतो. कारण हिंदुस्थान-चीन सीमा प्रचंड विस्तारलेली आहे. रस्ते नसल्याने तिथे सैन्य किंवा आयटीबीपी तैनात करण्यासाठी पुरेशा चौक्या तयार नाहीत. अशा प्रकारच्या चौक्या तयार होईपर्यंत या लडाख, कारगीलच्या कठीण भागामध्ये ड्रोनच्या मदतीने आपल्याला चिनी आक्रमक कारवाईवर लक्ष ठेवता येईल. त्याशिवाय बांगलादेश सीमेवर जी घुसखोरी अजूनही सुरू आहे, तिथेही ड्रोन्सचा वापर करून नजर ठेवता येईल. नक्षलवादी भागात दंडकारण्याच्या अंतर्गत भागात नक्षलवाद्यांचे प्रशिक्षण तळ असतात, त्यांच्यावर लक्ष ठेवून टेहळणी करून त्यांची नेमकी माहिती काढण्याचा प्रयत्न आपण करत आहोत, पण त्यात पाहिजे तेवढे यश मिळालेले नाही. भविष्यात अशा शत्रूंवर लक्ष ठेवण्यासाठी आणि त्यांच्या विरोधात ड्रोन्सचा वापर करता येईल. म्हणजेच ड्रोनचा वापर करून आपण आपली अंतर्गत सुरक्षाच नव्हे, तर बाह्य सुरक्षासुद्धा मजबूत करू शकतो.

अजून एक महत्त्वाचा पैलू म्हणजे 7 हजार 600 किलोमीटर प्रचंड पसरलेली समुद्री सीमा. त्या समुद्री सीमेवर जहाजाने किंवा बोटीने पेट्रोलिंग करणे खर्चिक असते. तिथे ड्रोनचा वापर झाला समुद्राकडून होणारी घुसखोरी थांबवण्यास मदत मिळेल. आधुनिक ड्रोनची किंमत खूपच कमी आहे. आधुनिक राफेल विमान अत्यंत महागडे आहे, पण त्याच किमतीमध्ये आपल्याला शेकडो ड्रोन्स विकत घेता येणार असतील तर त्याचा फायदा आपण करून घेतला पाहिजे. अर्थात लढाऊ विमान विरुद्ध ड्रोन अशी ही लढाई किंवा तुलना मुळीच नाही. मात्र लढाऊ विमानाचे पुष्कळसे काम ड्रोन्सचा वापर करूनसुद्धा आपण करू शकतो. इराक, सीरिया आणि अफगाणिस्तानमध्ये ड्रोन्सचा वापर अमेरिका अतिशय चांगल्या पद्धतीने करून दहशतवाद्यांना मारण्याचे काम करत आहे. तसा वापर आपण कश्मीर आणि ईशान्य हिंदुस्थानात का करू शकत नाही? म्हणजेच ड्रोनचा वापर करण्याच्या अनेक संधी आपल्याकडे आहेत. त्यामुळे देशाची सुरक्षा मजबूत होऊ शकेल.

पाकिस्तानच्या दहशतवादाला आपण आता आक्रमक प्रत्युत्तर देऊ लागलो आहोत. पाकिस्तानच्या आत सर्जिकल स्ट्राइक करण्यात आला. त्यानंतर दहशतवादी प्रशिक्षण शिबिरे अधिक आत सरकल्यानंतर हवाई दलाच्या मदतीने बालाकोट येथे दुसरा स्ट्राइक केला. त्यानंतर पाकिस्तानी विमानांबरोबर झालेल्या लढाईत आपल्या मिग विमानाचा वैमानिक पाकिस्तानच्या हद्दीत पकडला गेला. अशा परिस्थितीत 100 कोटी रुपये एवढय़ा किमतीच्या राफेल विमानाचा वापर करण्याऐवजी त्याच्या 5 टक्के किमतीच्या ड्रोनचा वापर करू शकतो का? एक अत्याधुनिक ड्रोन हे 5 कोटीमध्ये मिळू शकते. 40 ड्रोनचा एक समूह (Swarm drones) एकदम हल्ला करण्यासाठी वापरला जाऊ शकतो. एक राफेल विमान विकत वापरण्याऐवजी आपण चाळीस ते पन्नास ड्रोन असलेली 100 स्वॉर्म विकत घेऊ शकतो. अर्थात ही ड्रोन पाडली तरी शत्रू आपला कुठलाही वैमानिक पकडणार नाही. त्यामुळे यापुढे पाकिस्तानच्या दहशतवादाला प्रत्युत्तर देण्यासाठी आपण ड्रोनचा वापर करू शकतो का? यापुढील सर्जिकल स्ट्राइक ड्रोनच्या मदतीने केला तर त्यात काहीही आश्चर्य वाटू नये.

[email protected]

आपली प्रतिक्रिया द्या