
>> सुशांत सरीन
ड्युरंड सीमेवर पाकिस्तानने ‘थेट युद्धाची’ घोषणा करून नाहक स्वतःसाठीच मोठी अडचण ओढवून घेतली आहे. पाकिस्तान आता अशा पेचात अडकला आहे की, तो तालिबानला सहनही करू शकत नाही आणि रोखूही शकत नाही. दोन दशकांहून अधिक काळ जगासमोर तालिबानचे उघड कौतुक करून पाकिस्तानने त्यांच्यावर जो ‘गुंतवणूक’रूपी जुगार खेळला होता, तो आता पूर्णपणे उलटल्याचे दिसत आहे. पाकिस्तानला अफगाण राजवटीला आपल्या अंकित ठेवायचे होते. मात्र, अफगाणांबद्दल एक म्हण प्रसिद्ध आहे की, ‘त्यांना भाडय़ाने घेता येते, पण विकत घेता येत नाही’. त्यामुळे अफगाणिस्तानला आपला ‘पाचवा प्रांत’ बनवण्याची पाकिस्तानची मनीषा धुळीला मिळाली आहे.
पाकिस्तान आणि अफगाणिस्तानमधील 2611 किलोमीटर लांबीची सीमारेषा सध्या धगधगत आहे. गेल्या काही दिवसांपासून या भागात दोन्ही देशांकडून भीषण हल्ले प्रतिहल्ले सुरू असून एकमेकांचे मोठे नुकसान केल्याचा दावा केला जात आहे. या ताज्या संघर्षाच्या मुळाशी दशकानुदशके चालत आलेला ‘डय़ुरंड रेषेचा’ वाद आहे. भारत आणि पाकिस्तानमधील प्रत्यक्ष नियंत्रण रेषा किंवा आंतरराष्ट्रीय सीमेप्रमाणे या डय़ुरंड रेषेला जमिनीवर कोणतेही ठोस अस्तित्व नाही. तरीही हा वाद दोन्ही देशांमधील संबंधांना सुरुंग लावत आहे. यंदा डय़ुरंड सीमेवर पाकिस्तानने ‘थेट युद्धाची’ घोषणा करून नाहक स्वतःसाठीच मोठी अडचण ओढवून घेतली आहे. दहशतवादाला खतपाणी घालणाऱ्या पाकवर आता स्वतःच पेरलेल्या काटय़ांवर चालण्याची वेळ आली असून अफगाणिस्तानसोबतचा हा संघर्ष एका नव्या आणि धोकादायक वळणावर येऊन ठेपला आहे.
आपल्या हवाई हल्ल्यांमध्ये अफगाण-तालिबानचे 133 लढवय्ये मारले गेले असून दोनशेहून अधिक जखमी झाल्याचा दावा पाकिस्तानने केला आहे. दुसरीकडे, काबूलनेही अधिकृत पत्रक प्रसिद्ध करून प्रत्युत्तरादाखल केलेल्या कारवाईत 55 पाकिस्तानी सैनिकांना कंठस्नान घातल्याचे जाहीर केले आहे. या वेगाने बदलणाऱया घडामोडींकडे जगाचे लक्ष लागले असून रशियासह अनेक देशांनी या दोन्ही राष्ट्रांना तत्काळ युद्धविरामाचे आवाहन केले आहे.
संबंधांमधील कटुतेचे मूळ
अफगाणिस्तान आणि पाकिस्तानमधील संबंध इतके विकोपाला का गेले? हा यातील खरा प्रश्न आहे. गेल्या काही दिवसांमध्ये सीमाभागात अनपेक्षित घटना घडल्या असल्या तरी या तणावाची बीजे 2021 मध्येच रोवली गेली होती, जेव्हा तालिबानने काबूलची सत्ता हस्तगत केली. दोन दशकांहून अधिक काळ जगासमोर तालिबानचे उघड कौतुक करून पाकिस्तानने त्यांच्यावर जो ‘गुंतवणूक’रूपी जुगार खेळला होता, तो आता पूर्णपणे उलटल्याचे दिसत आहे. याची सुरुवात अफगाण तुरुंगात बंदिस्त असलेल्या ‘तहेरीक-ए-तालिबान’च्या (टीटीपी) सुमारे पाच हजार लढवय्यांच्या सुटकेने झाली. त्यानंतर पाकिस्तानमध्ये दहशतवादी हल्ल्यांचे सत्र वाढले. यामागे अफगाण-तालिबानचा हात असल्याचा आरोप पाकिस्तानकडून केला जात आहे, तर प्रत्यक्षात यामागे ‘तहेरीक-ए-तालिबान पाकिस्तान’ची कारस्थाने होती.
‘तहेरीक-ए-तालिबान पाकिस्तान’ आणि अफगाण-तालिबान यांचे सलोख्याचे आणि रक्ताचे नाते असल्याने पाकिस्तानने या हल्ल्यांना उत्तर देण्यासाठी अफगाणिस्तानच्या हद्दीत बॉम्बफेक सुरू केली. या कारवाईमागे एक छुपे कारण असेही होते की, पाकिस्तानला अफगाण राजवटीला आपल्या अंकित ठेवायचे होते. मात्र, अफगाणांबद्दल एक म्हण प्रसिद्ध आहे की, ‘त्यांना भाडय़ाने घेता येते, पण विकत घेता येत नाही’. त्यामुळे अफगाणिस्तानला आपला ‘पाचवा प्रांत’ बनवण्याची पाकिस्तानची मनीषा धुळीला मिळाली आहे.
मुल्ला अब्दुल सलाम झैफ यांच्या ‘माय लाइफ विथ द तालिबान’ या पुस्तकाचा संदर्भ येथे महत्त्वाचा ठरतो. झैफ 2000-01 दरम्यान पाकिस्तानमध्ये अफगाणिस्तानचे राजदूत होते. त्यांच्या मते, इस्लामचा चुकीचा वापर केल्यामुळे अफगाणांना पाकिस्तान अजिबात आवडत नाही. अरब देशांकडून मदत लाटण्यासाठी पाकिस्तान नेहमीच इस्लामचा जप करतो आणि धर्माचा कथित ठेकेदार बनून राहतो. स्वतःच्या स्वार्थासाठी पाकिस्तानने तालिबानच्या विरोधात अमेरिकेशी हातमिळवणी केल्याने अफगाणांच्या मनात फसवणुकीची भावना आहे.
संरक्षणाचे आश्वासन देऊनही आपल्याच लोकांना ओलीस ठेवणे आणि त्यांच्यावर अमानुष अत्याचार करणे, हे पाकिस्तानी कृत्य अफगाण विसरलेले नाहीत आणि भविष्यातही कदापि विसरू शकणार नाहीत. सद्यस्थितीत डय़ुरंड रेषेवर ‘पारंपरिक युद्ध’ होण्याची शक्यता कमी असली तरी ऑक्टोबर 2025 पासून तिथे जो तणाव आहे, त्याचा मोठा फटका बसत आहे. पाकिस्तानने आता आपली रणनीती बदलून तिथे अनेक दशकांपासून राहणाऱया अफगाण निर्वासितांना लक्ष्य करण्यास सुरुवात केली आहे. प्रामुख्याने पंजाबी मुसलमानांनी अफगाणांच्या मालमत्ता लुटून त्यांना सक्तीने मायदेशी पाठवण्यास सुरुवात केली आहे. त्यामुळे अफगाणिस्तानात पाकिस्तानविरोधात प्रचंड संताप निर्माण झाला आहे. पाकिस्तानमधील सध्याची राजवट जनतेत लोकप्रिय नसल्याने आणि अलीकडेच त्यांच्या देशात झालेल्या मोठय़ा हल्ल्यांमुळे, केवळ लष्कराच्या दबावाखाली अफगाण सीमा भागात हल्ले केले जात आहेत. यात तालिबान्यांपेक्षा सामान्य अफगाण नागरिक अधिक मारले जात असल्याने काबूललाही आता चोख प्रत्युत्तर देणे भाग पडले आहे.
आता प्रश्न उरतो तो या युद्धाचा शेवट काय? हा संघर्ष थांबण्यासाठी प्रामुख्याने तीन शक्यता समोर येत आहेत. 1. पाकिस्तानकडून सतत हल्ले होत राहतील आणि अफगाणिस्तानच्या हद्दीत सुमारे 10 किलोमीटरपर्यंत ‘नो मेन्स लँड’ (मानवविरहित क्षेत्र) तयार करण्याची योजना इस्लामाबाद पूर्ण करेल. 2. दोन्ही बाजूंकडून अधूनमधून चकमकी होत राहतील आणि त्रयस्थ देशांच्या मध्यस्थीने तात्पुरता शांतता करार केला जाईल. 3. तिसरी आणि अत्यंत गंभीर स्थिती म्हणजे अफगाण राजवट आपल्या अंतर्गत असलेल्या तालिबानी गटांना पाकिस्तानविरोधात उघडपणे लष्करी कारवाई करण्याची मोकळीक देईल. काबूलची सत्ता आधीच पाकिस्तानवर प्रचंड संतापलेली असल्याने पाकिस्तानसमोर मोठे आव्हान उभे राहील. थोडक्यात सांगायचे तर पाकिस्तान आता अशा पेचात अडकला आहे की, तो तालिबानला सहनही करू शकत नाही आणि रोखूही शकत नाही. अमेरिकेने लाखो अफगाणांना मारूनही अखेर तिथून माघार घ्यावी लागली हे जळजळीत उदाहरण जगासमोर आहे. ज्या दहशतवादाची आग पाकिस्तानने वर्षानुवर्षे भडकावली, आज तीच आग त्याला गिळंकृत करायला निघाली आहे. भारताला या संघर्षाबाबत फारसा धोका नाही. भारताची भूमिका स्पष्ट आहे. आम्ही पाकिस्तानच्या कृतींना अफगाणिस्तानच्या सार्वभौमत्वाचे उल्लंघन मानतो. सीमेपलीकडून होणाऱया कारवाया केवळ तणाव वाढवतील. अर्थात, गरज पडल्यास भारत तालिबानला योग्य ती मदत करण्यास मागेपुढे पाहणार नाही हेही निश्चित आहे.
मागील काळात याच तालिबानी दहशतवाद्यांना हाताशी धरून पाकिस्तानने कश्मीर भारतापासून तोडण्याची स्वप्ने पाहिली होती. पण आज नियतीचे चक्र उलटे फिरले आहे. अफगाणिस्तानातील तालिबानी राजवटीला भारताविषयी आस्था आहे आणि पाकिस्तानच्या पाठीत खंजीर मारण्याच्या भूमिकेविषयी राग! ही पाकिस्तानच्या दुष्कृत्यांची आणि पाताळयंत्री भूमिकेची परिणती आहे. भविष्यात याचे आणखी बरेच परिणाम पाकिस्तानला भोगावे लागणार आहेत.































































