उत्पाती अशनीचा वेध!

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

वैश्विक
[email protected]

मला आठवतं, 1968 मध्ये 13 जूनला शाळा सुरू झाली. ते माझं दहावीचं वर्ष होतं. (पण एसएससीचं नव्हे. आमच्या वेळी अकरावी एसएससी होती) तर शाळेत पहिल्याच दिवशी चर्चा चालली होती ती उद्या म्हणजे 14 जूनला कदाचित पृथ्वीवर आदळू शकणाऱया एका ‘ग्रहा’ची. अर्थात तो ग्रह नव्हता तर 1.4 किलोमीटर लांबीचा महापाषाण (अशनी) होता आणि पृथ्वीपासून 6,300,000 किलोमीटर अंतरापर्यंत आल्यामुळे पृथ्वीच्या गुरुत्वाकर्षणाने खेचला गेला तरी तो उत्पात दिन (डूम्स डे) ठरला असता. उद्या शाळेला सुट्टी मिळेल असे आम्हा विद्यार्थ्यांना वाटले. सुट्टीबिट्टी काही मिळाली नाही आणि ‘इकॅरस’सुद्धा पृथ्वीला कोणतीही इजा न करता पसार झाला. हा अशनी पूर्वी म्हणजे इसवीसन 1898 मध्ये शोधलेल्या झॉससारखाच प्रचंड अशनी किंवा लघुग्रह होता.

त्याने काही विनाश घडवला नसला तरी 6 कोटी वर्षांपूर्वी एका महाकाय अशनीने पृथ्वीवरचे डायनॉसॉर नष्ट केले होते आणि 1910 मध्ये रशियात तुंगास्का येथे पडलेल्या अशनीने एक मोठे जंगल जाळले होते. ते कशाला, 52 हजार वर्षांपूर्वी आपल्या महाराष्ट्रात लोणार येथे कोसळलेल्या अशनीने पृथ्वीवरचे अद्वितीय विवर नाही का निर्माण केले!

तर एकूण उत्पाती अशनी मंडळी पृथ्वीकडे कधी येतील आणि त्रासदायक ठरतील यावर 1980 पर्यंत मोठे संशोधन झालेले नव्हते. त्यानंतर मात्र निअर अर्थ ऑब्जेक्टस् किंवा एनईओ यांचा शोध घेऊन पृथ्वीला संभाव्य धोका उत्पन्न करणाऱया अशनींचा बंदोबस्त कसा करता येईल यावर विचार सुरू झाला. त्यानुसार आतापर्यंत सुमारे 29,000 पृथ्वी-निकट (निअर अर्थ) अशनीची नोंद झालेली आहे.

आता पृथ्वी-निकट, कोणत्या अशनींना म्हणायचं? तर ज्यांचा आकार सुमारे 460 फुटांपेक्षा जास्त आहे आणि पृथ्वीपासून 7 लाख 50 हजार ते 5 कोटी किलोमीटरपर्यंतच्या कक्षेत भिरभिरतो आहे तो पृथ्वी-निकट अशनी! आणि असेच एकोणतीस हजार आहेत!! म्हणजे अंतराळात केवढा धोका ‘तरंगतोय’ बघा!

परंतु अशा बातम्यांनी संशोधक हताश होत नाहीत तर त्यांच्या बुद्धीला चालना आणि संशोधनाला गती मिळते. त्यातूनच ही संभाव्य धोकादायक अशनींची गणती झाली आहे. गणना झाल्यानंतर लवकरात लवकर आदळू शकणाऱया अशनीला धडक देऊन त्याचा नाश करणे किंवा कक्षा बदलणे असा कार्यक्रम आखला गेला. यासाठी नासातर्फे 24 नोव्हेंबर 2021 रोजी ‘डार्ट’ म्हणजे ‘डबल ऍस्टेरॉइड रिडायरेक्शन टेस्ट’ हे यान अंतराळात झेपावले आणि ठरल्या कार्यक्रमानुसार त्याने आपल्या वेळेनुसार 27 सप्टेंबर 2022 पहाटे पावणेपाच वाजता नियोजित ‘ऑब्जेक्ट’ला यशस्वी धडक दिली. एरवी धडक अपघाताने होते, पण अशनी थेट पृथ्वीवर धडकू नये म्हणून ही त्याची दिशा बदलणारी योजनाबद्ध धडक होती. ‘डार्ट’ यानाने ज्याला यशस्वी धडक दिली तो एका लघुग्रहाचा उपग्रह (चंद्र) आहे. पृथ्वीपासून सुमारे 71 लाख किलोमीटर अंतरावर हा द्वैती लघुग्रह आढळला. 11 एप्रिल 1996 रोजी संशोधकांना त्याचा पत्ता लागला. ‘डायडिमॉस’ नावाचा हा लघुग्रह सूर्याभोवती 770 दिवसांत (आपल्या 25 महिन्यांत) फिरतो. या लघुग्रहाच्या 169 मीटर लांबीच्या उपग्रहाचे नाव डायमॉर्फस आणि ‘डार्ट’ यान या उपग्रहावरच आदळले (इम्पॅक्ट) आणि त्याचा मार्ग बदलण्यात आपल्याला (संशोधकांना) यश आले.

अवकाशात मुक्तपणे विहरणाऱया 29 हजार अशनींपैकी कोण कधी पृथ्वीला दगा देईल याची माहिती पूर्वी नव्हती. आता ती मिळू शकते. एवढेच नव्हे तर हा तरंगता अवकाशी धोका वेळीच टाळताही येऊ शकतो हे ‘डार्ट’च्या यशाने सिद्ध झाले. अंतराळ संशोधनातला हा एक महत्त्वाचा टप्पा म्हणायला हवा.

अगदी गेल्या महिन्यात 11 ते 18 सप्टेंबर या काळात 2022 क्यूएफ नावाचा 140 फूट लांबीचा अशनी पृथ्वीजवळून गेला. मोठा अशनी पृथ्वीवर आदळला तर अवघी जीवसृष्टीच धोक्यात येऊ शकते. साडेसहा कोटी वर्षांपूर्वीच्या डायनोसॉर नष्ट करणाऱया धक्यातून सावरायला पृथ्वीला लाखो वर्षे लागली. आताच्या काळात असा अशनी कोसळला तर तो पृथ्वीवरच्या अण्वस्त्रांचा नाश करील आणि त्या विस्फोटांनी पृथ्वी हादरून भयंकर रेडिएशन पुढची हजारो वर्षे पृथ्वीला सोसावे लागेल. त्यानंतर पुन्हा जीवसृष्टी कधी निर्माण होईल आणि झाली तरी आजच्यासारखीच प्रगत (?) असेल का? असे अनेक प्रश्न उद्भवले होते.

‘डार्ट’ या यशाने निदान अंतराळी अशनी आघाताचा धोका टाळता येईल, असा आत्मविश्वास संशोधकांमध्ये निर्माण झालाय, परंतु पृथ्वीवरच्या माणूस नावाच्या प्राण्याने जी अतिसंहारक शस्त्रास्त्र निर्माण करून ठेवली आहेत त्याचे काय? आपल्यापुढचे संभाव्य धोके आपणच वाढवणार असू तर कोण वाचवणार!

या सगळय़ावरही चर्चा होते, परंतु विवेकवादी निर्णय एकमताने होत नाही. अलीकडेच निवर्तलेले सोव्हिएत रशियाचे भूतपूर्व अध्यक्ष गोर्बाचेव यांनी अमेरिकन अध्यक्षांशी वाटाघाटी करून शांततामय पृथ्वीसाठी प्रयत्न केले, पण त्याला मर्यादित यश आले तेव्हा अंतर्बाहय़ सावधगिरी आणि सदसद्विवेकबुद्धी माणसाने जागृत ठेवली तरच पृथ्वी नावाचा रम्य, अद्वितीय ग्रह सुरक्षित राहील.