एकच संकल्प

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

दिलीप जोशी, [email protected]

जगभर प्रचलित नववर्षाचा आरंभ होऊन तीन दिवस उलटलेत. एकवीस वर्षांपूर्वी नवं सहस्रक सुरू झालं. त्याने माणसाच्या जीवनात आमूलाग्र बदल घडविले. वैज्ञानिक प्रगतीने कमालीचा वेग घेतला. एकोणिसाव्या शतकापासून जनसामान्यांचं जीवन हळूहळू व्यापणारी वैज्ञानिक गती आणि प्रगती एकवीसाव्या शतकाच्या पहिल्या दोन दशकांतच विलक्षण प्रभाव दाखवू लागली. संपर्क साधनांमधल्या क्रांतीने जगातल्या कोणाशीही, कधीही संवाद साधता येऊ लागला. पलीकडची व्यक्ती समोर असल्यासारखी गप्पा करू लागली. हे नव्या-जुन्या सर्वांनाच ‘ऍमॅझिंग’ वाटत गेले. नव्या तंत्रज्ञानाबरोबर जगातल्या सर्व भाषांमध्ये नवे शब्दही रुजले. इंटरनेट, ई-मेल तसे जुने वाटू लागले. व्हाटस्ऍप, इन्स्टाग्राम वगैरे नवी परिभाषा आली. नवी पिढी तर इंग्लिश भाषा संक्षिप्तपणे (ऍब्रिव्हिण्टेड) लिहू व बोलू लागली.

याचबरोबर गेल्या दोन-सवादोन वर्षांत कोविड-19 अथवा ‘कोरोना’ने हाहाकार उडवून हा शब्द पृथ्वीवरच्या सर्व लोकांच्या बोलण्यात येऊ लागला. कोविड महामारीचा विषाणू (व्हायरस) काटेरी टोकं असल्यासारखा दिसतो. म्हणून त्याला ‘कोरोना’ म्हटलं जाऊ लागलं असावं. वास्तविक सूर्याच्या पृष्ठभागाबाहेरच्या सुमारे 60 लाख किलोमीटरपर्यंत पसरलेल्या आणि प्रकाशाचे ‘स्पाईक’ दिसणाऱ्या प्रभामंडलांना करोना म्हटलं जातं. त्या तेजस्वी शब्दाला एका भयावह विषाणूच्या विद्रूपाचं परिमाण लाभलं. तो शब्द उच्चारला तरी आता दचकायला होईल.

मात्र यावर उतारा म्हणून ज्या शब्दाचा ऊहापोह लगेच सुरू झाला तो आहे. व्हॅक्सिनेशन किंवा लसीकरण. हा शब्द मात्र आता कोणी ‘कॉइन’ (नव्याने निर्माण) केलेला नाही. तो पार अठराव्या शतकाच्याही आधीपासूनच अस्तित्वात होता. त्याची सुरुवात ‘व्हेरिझोलेशन’ पद्धतीने झाली. त्या काळात युरोपात गाईंना होणाऱ्या देवीचं (काऊ पॉक्स) प्रमाण बरंच होतं. त्यामुळे दुधाचा व्यवसाय करणाऱ्या लोकांना आणि मग इतरांनाही लागण व्हायची. यावरचा उपाय शोधला गेला. तो व्हेरिओला म्हणजे देवीच्या रुग्णाच्या फोडाची सुकत चाललेली खपली (स्कॅब) काढून निरोगी व्यक्तीच्या त्वचेवर घासली तर क्षीण जंतूसंसर्ग होऊन त्या व्यक्तीला देवीच्या रोगापासून संरक्षण मिळायचं, पण हा प्रकार तितकाच धोकादायकही होता. कारण यात डोस किंवा मात्रेचं प्रमाण परीक्षणाने ठरलेलं नसायचं.

यावर सखोल विचार केला तो डॉ. एडवर्ड जेन्नर यांनी. म्हणूनच त्यांना लसीकरणाचे जनक (फादर ऑफ इनॉक्युलेशन) म्हटलं जातं. त्यांच्या काळात (1749 ते 1823) देवीच्या रोगाने ब्रिटनमध्येही अनेकजण दगावत. एकदा तर सुमारे दहा टक्के लोकांना असा उपसर्ग झाला आणि युरोप कमालीचं धास्तावलं. डॉ. एडवर्ड जेन्नर यांनी या रोगावर प्रभावी उपाय शोधण्याचा निश्चय केला आणि त्यांना इतकं यश मिळालं की, मानवजातीचं रोगापासून रक्षण करून सर्वाधिक संभाव्य मृत्यू टाळणारा संशोधक म्हणून त्यांचं नाव इतिहासात अमर झालं.

मायक्रोबायॉलॉजी (सूक्ष्मजीवशास्त्र) आणि हृदयाच्या रक्तवाहिन्यांचा (आर्टरींचा) अभ्यास करणाऱ्या जेन्नर यांनी हृदयशूला किंवा ‘अंजायना’ची मांडणी केली होती. मात्र 1770 मध्ये डॉक्टर झाल्यावर चौथ्या जॉर्ज राजाचे राजवैद्य झालेल्या जेन्नर यांनी देवी रोगाच्या (स्मॉलपॉक्स) निराकरणासाठी यशस्वी संशोधन करून एखाद्या रोगावरची पहिली प्रमाणित लस तयार केली. हा प्रयोग करताना त्यांनी लस तयार झाल्यावर आपल्या माळय़ाच्या आठ वर्षांच्या जेम्स फिप्स या मुलाला 14 मे 1796 रोजी देवीची ती लस टोचली. अशी लस घेणारा जगातला तो पहिलाच. त्यासाठी जेन्नर यांनी साराह नावाच्या देवी झालेल्या महिलेकडून घेतलेल्या जंतूंची लस करून फिप्सला टोचल्यावर त्याला थोडा ताप आला आणि नंतर तो बरा झाला, परंतु त्याला ‘देवी’ उमटल्या नाहीत. आमच्या लहानपणी आम्हीही देवीची अशीच लस घेतली होती. 1970 नंतर हा भयंकर रोग जगातून जवळपास गेलाय.

आपल्या या संशोधनाचा प्रसार करण्यासाठी जेन्नर तीन वर्षे जगभर फिरले. इंग्लंडचा कट्टर शत्रू असलेल्या नेपोलियनच्या सैन्यानेही लसीकरण किंवा ‘व्हॅक्सिनेशन’ करून घेतलं. त्याबद्दल कृतज्ञता म्हणून नेपोलियनने डॉ. जेन्नर यांना गौरव पदक दिलं. तेव्हा त्यांनी नेपोलियनने युद्धात पकडलेल्या दोन ब्रिटिश अधिकाऱ्यांच्या सुटकेची मागणी केली. ही देशभक्ती! नेपोलियननेसुद्धा मानवजातीचा त्राता असलेल्या जेन्नर यांची विनंती मान्य केली. 26 जानेवारी 1823 ला डॉ. जेन्नर गेले. त्याला या महिन्याच्या अखेरीस 188 वर्षे होतील. त्याच सुमारास (1822) जन्मलेल्या लुई पाश्चर (अथवा फेश्चर) यांनी त्यांचा वारसा पुढे चालवत रोग जंतूसंसर्गाने (बॅक्टेरिया) होतो हे सप्रमाण सिद्ध केलं.

त्यानंतर जगात अनेक रोग आणि त्यावरच्या लसी आल्या. आजही जग कोविडवरच्या प्रभावी लसीवरच अवलंबून आणि विश्वास ठेवून आहे. आता आलेल्या ओमायक्रोनचा मुकाबलाही त्याच पद्धतीने करावा लागेल. डॉ. जेन्नर यांच्याच मार्गाने जग जातंय. जगाचा खऱ्या अर्थाने उद्धार करणारी अशी माणसं सार्वकालीन आदरणीय असतात. 2002 मध्ये ‘बीबीसी’ने डॉ. जेन्नर यांचं नाव जगातल्या आतापर्यंतच्या ‘ग्रेटेस्ट व्यक्तीं’मध्ये समाविष्ट केलं. जनसामान्यांनी ते आधीच मान्य केलं होतं. या वर्षी एकच संकल्प हवा- लसीकरणाचा!