
>>अमोल काळसेकर<<
कार्यक्षमता आणि सुरक्षा हे कोणत्याही स्मार्ट घरातील महत्त्वाचे मुद्दे आहेत. सर्वच नव्या इमारतींना आवश्यक विद्युत सुरक्षा नियमांचे पालन करून तो दर्जा राखणे बंधनकारक असते, मात्र जुन्या इमारती हा अधिक धोक्याचा विषय आहे. वाढत्या विद्युत मागणीला पुरे पडण्याची क्षमता या इमारतींमध्ये नसते आणि त्यामुळे अशा ठिकाणी विद्युत दुर्घटना घडण्याची शक्यता अधिक असते.
हल्लीच्या जगात आपण विविध उपकरणे आणि यंत्रांवर फारच अवलंबून आहोत आणि हे अवलंबित्व वाढत आहे. मात्र त्यामुळे आपल्या जुन्या वायरींवरील भारही वाढतोय, हे आपल्यापैकी अनेकांच्या लक्षात येत नाही. अशा परिस्थितीत वीज आणि संबंधित उपकरणांच्या सुयोग्य नियोजनाची आवश्यकता कित्येक पटींनी वाढते.
नव्या इमारतींमध्ये या मुद्दय़ांकडे लक्ष दिले जाते. बिल्डर्स सर्व खोल्यांमध्ये अनेक पॉवर सॉकेट देतात, मात्र सर्किट डिझाइनिंगवर अधिक भर द्यायला हवा. जुन्या इमारतींची काय परिस्थिती असेल, याचा कधी विचार केलाय का? दुर्दैवाने, या इमारतींमध्ये विद्युत जोडण्यांच्या नूतनीकरणाला नगण्य महत्त्व दिले जाते.
देशातील सर्वच शहरांमध्ये अशा अनेक जुन्या इमारती आहेत, ज्यांना विद्युत दुर्घटनांचा मोठा धोका आहे. मागील वर्षीच्या जानेवारीत हैदराबादमधील खैतराबाद रिजनल ट्रान्सपोर्ट ऑथॉरिटीमध्ये आग लागली आणि अनेक कागदपत्रे जळून गेली. कित्येक दशके जुन्या या इमारतीतील विद्युत जोडणीही तितकीच जुनी होती.
इंटरनॅशनल कॉपर असोसिएशन इंडिया (आयसीए इंडिया) च्या आकडेवारीनुसार, आग लागलेल्या सर्व आस्थापनांमधील 35 टक्के घटनांमध्ये इमारती जुन्या होत्या. जुन्या इमारतींमध्ये आगीची दुर्घटना घडण्यामागे अनेक कारणे असतात, असे तज्ञांचे मत आहे.
1980 आणि 90च्या दशकात वॉशिंग मशीन, गीझर्स आणि इतर उपकरणांचा वापर मर्यादित होता. त्यानंतर मोबाईल आणि इतर उपकरणे आली. मात्र विजेचा वापर वाढत असतानाही आपण विशेषतः जुन्या इमारतींमध्ये, आपल्या घरातील, आपल्या इमारतींमधील जुन्या विद्युत प्रणालीवरच अधिक भार देत जुन्या वायरींसहच ही उपकरणे वापरू लागलो.
सध्या सुरू असलेल्या विद्युत सुरक्षा सप्ताहाचा भाग म्हणून आयसीए इंडियातर्फे महाराष्ट्राच्या मुख्य विद्युत निरीक्षकांच्या साह्याने राज्य आणि देशभरात सुरक्षित विद्युत वापराचा संदेश पसरवला जात आहे. ते पुढे म्हणाले, जुनी होत जाणारी विद्युत प्रणाली बदलण्याची गरज अनेक जण दुर्लक्षित करतात. काही दशकांपूर्वी बसवलेले सॉकेट्स, बटणं आणि वायरी सध्याच्या काळातील विजेचा भार वाहू शकत नाहीत. त्यामुळेच शॉर्ट सर्किट, विजेचा झटका, आग अशा दुर्घटना घडतात आणि त्यात तुमच्या प्रियजनांचा बळी जाऊ शकतो.
त्याचप्रमाणे योग्य देखभाल नसणे आणि तंत्रज्ञानाप्रमाणे आधुनिकता अमलात न आणणे हेही यातील मुख्य मुद्दे आहेत. अनेक जण अप्रशिक्षित इलेक्ट्रिशिअन नेमतात. अशी माणसे शॉर्टकट घेऊन समस्या सोडवतात. वेगवेगळय़ा आकारांच्या वायरी वापरणे, रंगांचे नियम न पाळणे, अनेक ठिकाणी जोडकाम करणे, खर्च कमी करण्यासाठी कमी आकाराच्या वायरी वापरणे अशा गोष्टींमुळे तात्पुरता फायदा मिळत असला तरी भविष्यात हा फार मोठा धोका ठरू शकतो.
तुम्हाला आश्चर्य वाटेल, मात्र आजही अनेक जण मिनिएचर सर्किट ब्रेकर (एमसीबी) लावण्याबद्दल आग्रही नसतात. रेफ्रिजरेटर, फॅक्स मशीन, चोरीचा अलार्म अशा गोष्टी नेहमी स्वतंत्र सर्किटमध्ये लावाव्यात. मास्टर स्विच बंद असला तरी अशा उपकरणांना स्वतंत्र एमसीबीमधून वीजपुरवठा करावा, असे आयसीए इंडियाचे तज्ञ सुचवतात.
चीफ मॅनेजर (बिल्डिंग वायर) इंटरनॅशनल कॉपर असो. ऑफ इंडिया.





























































