>> दिलीप देशपांडे
मानवनिर्मित कारणांनी प्रदूषण वाढून पर्यावरणाचा समतोल ढळत आहे. अर्थात ती आपल्या सगळ्यांची जबाबदारी आहे. या पर्यावरण र्हासाला आपणच पायबंद घालायला हवा. प्रत्येकाने मनावर घेतले तर ते सहज शक्य आहे. पण तेच होत नाही. अनेक अभियाने यासंदर्भात राबवली जात आहेत. प्लास्टिक पिशवी मुक्ती अभियान, स्वच्छता अभियान हे अधिक कठोरपणे राबवायला हवे. फक्त दरवर्षी येणार्या पर्यावरणदिनी नव्हे, तर प्रत्येक दिवशी आपण निसर्गाची काळजी घेवू. आपण सारेच या वसुंधरेचे सेवक आहोत याचे भान ठेवू.
जागतिक पर्यावरण दिवस नुकताच साजरा केला गेला. पर्यावरण संवर्धनासाठी जागरूकता निर्माण करून, त्याच्या समस्या जाणून पर्यावरणाची गुणवत्ता वाढावी म्हणून पोषक वातावरण निर्माण करणे हाच पर्यावरण दिन साजरा करण्यामागचा प्रमुख हेतू असतो. हा दिवस यावर्षीही साजरा केला गेला. अनेक ठिकाणी व्याख्याने, स्पर्धा, आयोजित करून, पर्यावरणाचा र्हास कसा रोखता येईल याविषयीची माहिती आणि संदेश दिले गेले. यावर्षी ओढवलेल्या कोरोना संकटामुळे जाहीर कार्यक्रम झाले नाहीत. पण मर्यादित स्वरूपात शासकीय आणि प्रशासकीय पातळीवर हा दिवस साजरा झाला. परंतु एक प्रश्न सतत मनात येतोच, तो असा की असे दिवस साजरे करून पर्यावरणाचे संवर्धन कितपत होईल?
पर्यावरणाचा र्हास का होतो? त्याला आपण किती जबाबदार आहोत? निसर्गातील बदल, अनियमितपणा यासाठी आपली जीवनशैली आणि विकास किती कारणीभूत आहे? या आणि अशा प्रश्नांचा विचार करावा लागेलच. खरं म्हणजे पर्यावरण आणि प्रदूषण यांचा खूप जवळचा संबंध आहे. अनेकविध प्रकारच्या प्रदूषणामुळे पर्यावरणाचा र्हास होत असतो. मग हे प्रदूषण निसर्गनिर्मित असो वा मानवनिर्मित असो. निसर्गनिर्मित कारणांबाबत आपण काय करणार? ती एक प्रकारची आपत्तीच असते. पण आपल्याकडून ज्या ज्या कारणांमुळे प्रदूषणनिर्मिती होते ती आपण नक्कीच कमी करू शकतो.
दरवर्षी पर्यावरण दिवस साजरा करताना एक घोषवाक्य असते. 5 जून 2011 मध्ये हिंदुस्थानची यासाठी प्रथमच यजमानपदी निवड झाली होती. ‘वन-निसर्ग आपल्या सेवेसी’ असे घोषवाक्य त्यावेळी होते. परत दुसर्यांदा 5 जून 2018 मध्ये हिंदुस्थान यजमान बनला. मात्र तेव्हा ‘प्लास्टिक प्रदूषणाशी संघर्ष’ असे घोषवाक्य होते. म्हणजे या सात वर्षांत प्रदूषणाचा प्रवास कसा झाला आहे हे लक्षात येते. या वर्षी जागतिक पर्यावरण दिवस कोलंबियात साजरा झाला. ‘जैवविविधता’ हे यंदाचे घोषवाक्य आहे. जैवविविधता म्हणजेच जीवांची विविधता. मग त्यात पशू, पक्षी, निरनिराळे प्राणी येतात. पर्यावरणाचा समतोल राखण्यासाठी जैवविविधता संपन्न असायला हवी. मात्र निरनिराळ्या कारणांमुळे ती कमी होत आहे. त्याच्यावर उपाययोजना करायला हव्या.
पर्यावरणाचा समतोल न राहण्याचे प्रदूषण हेच महत्वाचे कारण कसे आहे हे बघू. तसेच सर्वसामान्य माणसाचा त्याच्याशी काय संबंध आहे तो काय करू शकतो आणि काय करू शकत नाही हे पाहणेही उचित ठरेल. तसेच शासकिय व प्रशासकीय पातळीवर काय करता येईल, काय होत नाही, हेदेखील पहायला हवे.
अनेक कारखाने आहेत. त्यांच्या निर्मितीप्रक्रियेतून वायू, धूर यांची निर्मिती होत असते. बर्याचवेळी हा वायू आरोग्यासाठी हानिकारक तर असतोच, पण त्यामुळे सभोवतालचे वातावरणही दूषित होते. दुसरीकडे वाहनांची संख्या खूप वाढली आहे. जुनी वाहने वेळीच सर्व्हिसिंग न होणारी वाहने खूप धूर सोडतात. त्यामुळेही मोठ्या प्रमाणावर प्रदूषण होते. आपल्याकडे प्रदूषण नियंत्रण मंडळ आहे. वाहन तपासणीही होते, पोल्युशन प्रमाणपत्र बंधनकारक केले आहे हेदेखील खरे. पण कुठेतरी या दोन्हीही प्रक्रियेत काहीतरी दोष आहेत. त्यात सुधारणा व्हायला हवी.
एका विशिष्ट मर्यादेपलीकडे निर्माण झालेले प्रदूषण म्हणजे ध्वनिप्रदुषण. कारखान्यांतील यंत्रांचे आवाज, वाहनांचे कर्कश्श हॉर्न, सायलेन्सरविना चालणार्या गाड्या, मर्यादेपलीकडील डेसिबलने वाजणारे डीजे हे ध्वनिप्रदुषणासाठी कारणीभूत ठरतात. त्यामुळे मानवी मानसिकतेत अस्वस्थता, चिडचिड निर्माण होते.
कारखान्यातील निर्मितीप्रक्रियेतून निर्माण होणारे रसायनेमिश्रित दूषित पाणी नद्या, नाले, तलावात सोडले जाते. ते आजूबाजूच्या परिसराला त्रासदायक ठरते. त्या ठिकाणी असलेले पाण्याचे स्त्रोत दूषित होतात. ते पाणी पिऊन मोठ्या प्रमाणात जनावरे मृत्यूमुखी पडतात. अनेक मोठ्या शहरात सांडपाण्याची विल्हेवाट व्यवस्थित नसते. हेदेखील एक कारण प्रदुषणासाठी आहेच.
प्लास्टिकचा कचरा, जुनी इलेक्ट्रिक उपकरणे फेकून दिली जातात. ते नष्ट होत नाही. प्लास्टिक पिशव्यांच्या वापरावर बंदी येऊनही त्यांचा सर्रास वापर सुरू आहे. आपल्याला तर ते घातक आहेच, मात्र जनावरांनाही ते धोकादायक आहे. प्लॅस्टिक खाल्ल्याने हजारो जनावरे दरवर्षी मृत्युमुखी पडतात. पशूधन नष्ट होते.
निसर्गातील, अर्थातच वातावरणातील बदलाचा पर्यावरणाचा समतोल ढासळण्यावर मोठा परिणाम होतो. आताचेच उदाहरण बघा. निसर्ग वादळ आणि मुसळधार पावसाने कोकणातील शेकडो झाडे उन्मळून पडली. शिवाय आपण शहराचे सुशोभीकरण करण्यासाठी, रस्ते रुंदीकरणासाठी हजारो वृक्षांची कत्तल करतो. म्हणजे एकीकडे वृक्षारोपण कार्यक्रम राबवतो आणि दुसरीकडे झाडे तोडतो. वाढलेले वृक्ष नष्ट झाल्याने पर्यावरणाचा समतोल ढळतो. आाqक्सजनचे प्रमाण कमी होते. अशावेळी प्रत्येकाने एक रोप लावण्याचा आणि ते जगवण्याचा संकल्प करायला हवा. सरकारी वृक्षारोपण कार्यक्रमात पारदर्शकता हवी. नाहीतर त्याच त्या जागी दरवर्षी वृक्षारोपण केल्याच्या बातम्या आपण वाचतो.
मानवनिर्मित कारणांनी प्रदूषण वाढून पर्यावरणाचा समतोल ढळत आहे. अर्थात ती आपल्या सगळ्यांची जबाबदारी आहे. या पर्यावरण र्हासाला आपणच पायबंद घालायला हवा. प्रत्येकाने मनावर घेतले तर ते सहज शक्य आहे. पण तेच होत नाही. अनेक अभियाने यासंदर्भात राबवली जात आहेत. प्लास्टिक पिशवी मुक्ती अभियान, स्वच्छता अभियान हे अधिक कठोरपणे राबवायला हवे. कारण अजूनही बाजारपेठेत प्लॅस्टिक पिशव्यांचा वापर सर्रास होत आहे. रस्त्यावर थुंकणार्यांचे प्रमाणही कमी होत नाही.
प्रदूषण नियंत्रण महामंडळ, गावोगावच्या ग्रामपंचायती, नगरपालिका, महानगरपालिका यांनी तसेच शासकीय अभियानांची जबाबदारी ज्यांच्यावर आहे त्यांनी आपले कर्तव्य आणि जबाबदारी आत्मीयतेने पार पाडली तर हे सहज शक्य आहे. वेळप्रसंगी दंडात्मक कारवाई करायलाच हवी. ती कोणी करावी हे नक्की करायला हवे. त्यात तूतू मैमै नको. कारण त्यामुळे कारवाईला फाटे फुटतात.
तेव्हा फक्त दरर्षी येणार्या पर्यावरणदिनी नव्हे तर प्रत्येक दिवशी आपण निसर्गाची काळजी घेऊ. आपण सारेच या वसुंधरेचे सेवक आहोत याचे भान ठेवू. माणसाने कितीही प्रगती केली तरी निसर्गाची ताकद अफाट आहे. त्याची प्रचिती नेहमीच येत असते. आताही निसर्ग चक्रीवादळाने त्याचा प्रत्यय दिला आहे. तेव्हा आपल्या आयुष्यातील प्रत्येक क्षण पर्यावरण स्नेही म्हणून जगण्याचा आणि वसुंधरेच्या रक्षणाचा संकल्प करूया. पर्यावरणाचा समतोल राखणे काळाची गरज आहे, याचे भान सगळ्यांनीच ठेवायला हवे.






























































