
>> डॉ. निखील गोखले
आपल्या देशात नेत्रदानाचे प्रमाण अतिशय कमी आहे आणि म्हणून जनमानसात नेत्रदानाविषयी जागरुकता निर्माण करण्यासाठी दरवर्षी 25 ऑगस्ट ते 8 सप्टेंबर या कालावधीत राष्ट्रीय नेत्रदान पंधरवडा पाळला जातो. या वेळी विविध उपामांचे आयोजन करून नेत्रदानाचा संकल्प करणे, लोकांनी मरणोत्तर नेत्रदान करणे याविषयी मार्गदर्शन केले जाते.
आपल्या देशात अंध लोकांची संख्या दोन कोटींच्या जवळ आहे. अंधत्वाची अनेक कारणे आहेत आणि त्यातले प्रमुख कारण मोतीबिंदू. मोतीबिंदूखालोखाल कॉर्निअल अंधत्व हे अंधत्वाचे एक कारण आहे. 50 वर्षांपेक्षा जास्त वयोगटात याचे प्रमाण 8.2 टक्के आहे आणि 0-49 वर्षे या गटात 37 टक्के इतक्या मोठय़ा संख्येने आहे.
भारतात दरवर्षी फक्त 30 हजार कॉर्निआ प्रत्यारोपण शस्त्रािढया होतात, परंतु आपल्याला दरवर्षी एक लाख शस्त्रािढया करण्याची गरज आहे. म्हणून साधारणपणे जर मृत्यूचे प्रमाण एक कोटी प्रतिवर्ष असेल तर त्यातील एक टक्का लोकांनी तरी नेत्रदान करणे आवश्यक आहे.
आपल्या डोळ्याचा पुढचा पारदर्शक काचेसारखा पटल ज्याला आपण कॉर्निआ म्हणतो, तो कॅमेऱयाचा पुढची लेन्स असते तसाच असतो. त्यातून प्रकाश डोळ्याच्या आत जातो. काही आजारांमुळे हे पटल अपारदर्शक होते आणि त्यामुळे प्रकाश डोळ्याच्या आत जाऊ शकत नाही. अशा रुग्णांना कॉर्निअल अंधत्व असते आणि त्यांना कॉर्निआ प्रत्यारोपणाने आपण परत नवी दृष्टी देऊ शकतो. इतर कारणामुळे जर अंधत्व असेल तर या रुग्णांना कॉर्निआ प्रत्यारोपणाचा उपयोग होत नाही. आपल्या डोळ्याची शीर किंवा मधुमेहामुळे आतला पडदा म्हणजेच रेटिना खराब झाला असेल तर अशा रुग्णांना या सर्जरीचा उपयोग होणार नाही.
गेल्या 30 वर्षांपासून मी दादर पश्चिमेला कॉर्निआ प्रत्यारोपण शस्त्रािढया करत आहेत आणि आतापर्यंत 1500 लोकांना त्याचा लाभ झालेला आहे. नेत्रदानासंबंधी अजूनही लोकांना पूर्ण माहिती नाही. लोकांमध्ये बरेच गैरसमज आहेत. नेत्ररोपण म्हणजे संपूर्ण डोळ्याचे रोपण नव्हे हे समजणे गरजेचे आहे. मृत्यूनंतर नेत्रदान करून त्यातला कॉर्निआ प्रत्यारोपणाकरिता वापरता येतो. आपण फक्त मरणोत्तर नेत्रदान करू शकतो. आधी नेत्रदानाचा संकल्प करता येतो आणि त्याची माहिती आपल्या जवळच्या नातेवाईक अथवा मित्रांना देणे आवश्यक असते. नुसता संकल्प करून त्याची अंमलबजावणी करता येत नाही. म्हणून इतरांना त्याची माहिती द्यावी. नेत्रदान कोणत्याही वयोगटातील व्यक्ती करू शकते. लिंग, रक्तगट व धर्म या गोष्टी नेत्रदानाच्या आड येत नाहीत. चष्मा असेल, मोतीबिंदू असेल किंवा त्याची शस्त्रािढया झाली असेल, मधुमेह, रक्तदाब असेल तरीही आपल्याला नेत्रदान करता येऊ शकते. मात्र एड्स, कावीळ, कोविड, विषाणूमुळे होणारे काही आजार व संसर्गजन्य आजार असल्यास आपण नेत्रदान करू शकत नाही. काही रक्ताचे कर्करोग किंवा मेंदूमध्ये पसरलेले कर्करोग असतील तरी नेत्रदान करता येत नाही.
नेत्रदानासाठी पूर्वनोंदणीची गरज नाही. आपल्या नातेवाईक अथवा मित्रपरिवारात कोणाचा मृत्यू झाला तर खचून न जाता सहा तासाच्या आत नेत्रपेढीशी संपर्क साधून त्यांनी सांगितलेल्या गोष्टी अमलात आणून नेत्रदान करता येते. अजूनही म्हणावे तसे नेत्रदानाचे प्रमाण वाढलेले नाही म्हणून जास्तीत जास्त लोकांनी नेत्रदान करणे आणि आपल्या माहितीतील लोकांना नेत्रदानासाठी प्रवृत्त करणे ही काळाची गरज आहे.
(लेखक प्रसिद्ध नेत्रतज्ञ आहेत.)