करंट अफेअर : फेसबुक बंद आयुष्य बंद

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

>> अतुल कहाते

चार ऑक्टोबर रोजी अचानकपणे फेसबुक, इन्स्टाग्राम, व्हॉट्सअॅप या जगाला वेड लावणाऱ्या सुविधा बंद पडल्या आणि काही जणांना खरोखरच जग ठप्प झालं असं वाटायला लागलं. तब्बल सहा तास या सुविधा बंद असल्यामुळे सगळीकडे एकच खळबळ माजली. जगभरात एकमेकांशी संपर्क साधण्यासाठी लोक ही माध्यमं खूप मोठय़ा प्रमाणावर वापरत असल्यामुळे अनेक जणांची पंचाईत झाली. शिवाय ही माध्यमंच बंद असल्यामुळे ती बंद असल्याचं कुठून आणि कुणाला कळवायचं असा प्रश्नही निर्माण झाला. अखेर ट्विटरवर लघुसंदेशांचा पाऊस पाडून लोकांनी या विषयासंबंधीचा आपला संताप, आपली अगतिकता हे सगळं व्यक्त केलं. फेसबुकवर टीकेचा भडिमार झाला. काही तासांनी या सुविधा पूर्ववत झाल्या खऱ्या, पण यातून अनेक प्रश्न निर्माण झाले. त्यांचाच हा एक छोटासा आढावा.

इंटरनेट हे जगभरात विणलं गेलेलं एक संगणकीय जाळं आहे. आपल्या सगळ्यांचे संगणक आणि आता स्मार्टफोन्स एकमेकांना आभासी प्रकारे जोडले जाऊन हे जाळं तयार होतं. त्यामागच्या तंत्रज्ञानामधल्या क्लिष्ट संकल्पना बाजूला ठेवल्या तरी अगदी सोप्या शब्दांमध्ये सांगायचं तर जसं दोन वेगवेगळ्या जलवाहिन्या जोडण्यासाठी प्लंबर लोक त्यांच्यामध्ये एखादी नळी टाकून ती दोन्ही बाजूंना जोडून टाकतात तशाच प्रकारे संगणकांना आणि त्यांच्या जाळ्यांना एकमेकांशी जोडण्यासाठी ‘राऊटर’ नावाचं उपकरण वापरतात. एकीकडून आलेली माहिती पुढे ढकलत राहणं हेच या राऊटरचं काम असतं. साहजिकच कुठली माहिती नेमकी कुठे पुढे ढकलायची याची जाण या राऊटरला असावी लागते. अन्यथा एखाद्या इप्सित ठिकाणचा मजकूर भलतीकडेच जायचा. म्हणजेच जगभरात ठिकठिकाणी राऊटर बसवलेले असतात. आपला संगणक ते पुढचा संगणक यांच्यामधल्या तारांच्या किंवा बिनतारी प्रकारच्या माध्यमांमधून होत राहण्यासाठी हे राऊटर अहोरात्र काम करतात. हे राऊटर बिघडले किंवा बंद पडले तर काय होईल? अर्थातच एकीकडून दुसरीकडे संदेश जाऊ शकणार नाहीत. म्हणजेच संदेशवहन ठप्प होईल. फेसबुक आणि तिच्या इतर सुविधा बंद पडण्यामागचं मुख्य कारण ढोबळमानानं हेच होतं.

खरं म्हणजे वेबसाइट्स अनेकदा बंद पडतात. त्यामागे कारणंही अनेक प्रकारची असू शकतात. कधी वर उल्लेख केलेले प्रकार घडतात. कधी एखादी वेबसाइट हॅक होते; म्हणजेच हल्लेखोर तिच्यावर हल्ला करून ती बंद पाडतात. कधी एखादी वेबसाइट खूप यूजर्सची गर्दी झाल्यामुळे ठप्प म्हणजेच ‘हँग’ होते. कधीकधी इंटरनेटचा वेगच मंदावल्यामुळे वेबसाइट उघडत नाही. असे सगळे प्रकार लोकांना काही प्रमाणात माहीत असले तरी फेसबुकसारख्या कंपनीच्या बाबतीत हे घडल्यावर त्याचे परिणाम खूप जास्त असू शकतात. एक तर मुळात कोट्यावधी लोक या सुविधा रात्रंदिवस वापरतातच; पण शिवाय अलीकडच्या काळातल्या संदेशवहनाचा हा जणू जीव की प्राणच झालेला आहे. व्हॉट्सअॅप बंद असेल तर काही लोकांना सगळं जगच बंद पडल्याची भावना येते. या सगळ्याशिवाय कित्येक लोकांचं पानही हलू शकत नाही. अशा परिस्थितीमध्ये कित्येक तास या सुविधा बंद पडण्याचे प्रकार गंभीर ठरू शकतात. काही महत्त्वाच्या संदेशांचं वहन होऊ शकत नाही. अगदी तातडीच्या म्हणून पाठवलेल्या संदेशांना अडकून पडावं लागल्यामुळे हाहाकार माजू शकतो.

यातून एक महत्त्वाचा प्रश्न निर्माण होतो. इंटरनेट हे एकाधिकारशाही दूर करण्याचं, लोकशाही पसरवण्याचं महत्त्वाचं साधन असल्याची टिमकी अनेक जण वाजवतात. प्रत्यक्षात मात्र फेसबुकसारख्या कंपन्या याच एकाधिकारशाही निर्माण करण्याचं आणि ती वाढवण्याचं महत्त्वाचं साधन बनलेल्या आहेत; याकडे अनेकांचं दुर्लक्ष होतं. उदाहरणार्थ इन्स्टाग्रामची स्पर्धा निर्माण झाल्याबरोबर फेसबुकनं आपल्या आर्थिक ताकदीच्या आणि दांडगाईच्या जोरावर तिला खिशात टाकलं. व्हॉट्सअॅपचंही तेच. असं अनेक कंपन्यांच्या बाबतीत सातत्यानं घडत असल्यामुळे फेसबुक तसंच गुगल यांच्यासारख्या कंपन्यांचीच एकाधिकारशाही निर्माण झालेली आहे. साहजिकच या कंपन्यांची संदेशवहनाच्या जगतावर प्रचंड मोठी पकड निर्माण झालेली आहे. लोकांची खासगी माहिती अवैधपणे गोळा करून ती विकण्यापासून अनेक प्रकार त्या करतातच, पण शिवाय आताच्या घटनेमुळे आणखी एक नवाच प्रश्न निर्माण होतो. या कंपन्यांच्या सुविधांमध्ये काही दोष निर्माण झाला किंवा त्या ठप्प झाल्या की सगळं जगच जणू ठप्प झाल्यासारखं वातावरण निर्माण होतं. कारण आपल्या सगळ्या प्रतिस्पर्धी कंपन्यांना गिळंकृत करणं किंवा संपवून टाकणं या मार्गानं या कंपन्यांनी जगभरातल्या संदेशवाहनावर आपली हुकूमत निर्माण केलेली आहे. या कंपन्यांना पर्याय नसल्यामुळे लोकही त्यांच्यावर प्रमाणाबाहेर विसंबून राहायला लागले आहेत.

पूर्वी वीजपुरवठा खंडित झाला तरी आपल्याला फारसं काही वाटायचं नाही. आता मात्र फेसबुक बंद पडणं म्हणजे जवळपास सगळीकडे अंधार पसरणं आणि अख्ख्या देशाची वीज जाणं असं वाटायला लागतं. लोक आपल्याच फोनमध्ये काही तरी दोष निर्माण झाला असेल असं समजून तो वारंवार रिस्टार्ट करायला लागतात. अशी ही या माध्यमांची पकड आणि ओळख आहे. साहजिकच त्यांच्यामधल्या बिघाडांचा फटका असंख्य लोकांना विविध मार्गांनी बसतो. अर्थातच याच्या जोडीला या माध्यमांवर दिवसरात्र टवाळक्या करत बसलेले अनेक रिकामटेकडे लोक असतात हे वेगळं सांगायला नको. आपल्याकडे जे येईल ते शक्य तितक्या ‘भक्तिभावानं’ (‘भक्त’ प्रकारची पोस्ट असेल तर) म्हणजेच निर्बुद्धपणे पुढे पाठवणं हाच त्यांचा रात्रंदिवस सुरू असलेला उद्योग असतो. अशा वेळी ही माध्यमं बंद पडल्यावर त्यांना आता काय करायचं असा प्रश्न पडतो. जणू प्राणवायू नावाची गोष्ट संपल्यासारखी त्यांची अवस्था होते.

अशा अनेक अंगांनी या घटनेकडे बघितल्यावर त्याचं गांभीर्य लक्षात येईल. ही माध्यमं आता निव्वळ करमणुकीची साधनं राहिलेली नसून लोकांचा दैनंदिन जीवनक्रम त्यांच्यावर अवलंबून असल्यासारखी परिस्थिती आता दिसून येते. साहजिकच अशा घटनांची पुनरावृत्ती होऊ नये यासाठी शक्य तितके प्रयत्न करायला हवेत. अर्थातच हे सगळं यंत्रं, तंत्रज्ञान यांच्यावर अवलंबून असल्यामुळे कितीही काटेकोर प्रयत्न केले तरीही अधूनमधून या गोष्टी घडणारच. फक्त त्यांची तीव्रता कमी कशी करता येईल याकडे लक्ष देणं आणि आपण वैयक्तिक पातळीवर अशा गोष्टींवर किती विसंबून राहायचं याचा विचार करणं हेच आपल्या हातात आहे.

फेसबुकसारख्या महाकाय कंपन्यांच्या सुविधा इतके लोक एका वेळी वापरत असतात की अशा कंपन्यांची जाळी इंटरनेटला जोडण्यासाठी अक्षरशः ढिगानं राऊटर्स लागतात. तसंच या कंपन्यांची जाळीच इतकी मोठी असतात की त्यांना स्वतःचं ‘स्वयंभू जाळं’ उभं करावं लागतं. या जाळ्याभोवती राऊटर्सची गुंफण केली जाते. या राऊटर्सद्वारे या महाकाय जाळ्यांशी बाहेरच्या लोकांना संपर्क साधता येतो. सोमवारी फेसबुकच्या या स्वयंभू जाळ्याशी संबंधित असलेल्या काही नोंदींमध्ये चुका निर्माण झाल्या. साहजिकच त्याच्याशी संबंधित असलेल्या कामकाजाविषयीची माहिती आसपासच्या राऊटर्सना मिळेनाशी झाली. जणू हे स्वयंभू जाळंच इंटरनेटवरून लुप्त झालं. कारण त्याच्यापर्यंत नेमकं पोहोचायचं कसं हेच त्या राऊटर्सना कळेना. जणू आपल्या मोबाईलची रेंज गेल्यावर आपण ‘अनरिचेबल’ होतो तसा प्रकार अख्ख्या फेसबुकसाठी आणि तिच्या उपकंपन्यांसाठी घडला. साहजिकच फेसबुक, इन्स्टाग्राम, व्हॉट्सअॅप हे सगळं ठप्प झालं.

अट्टल दारुड्या माणसाला दारू न मिळाल्यावर त्याची अवस्था कशी होईल तशीच अवस्था या माध्यमांपासून अगदी काही तास दूर राहावं लागणाऱ्या अनेक लोकांच्या बाबतीत बघायला मिळते, हा यामधला काळजीचा विषय आहे!

 [email protected]