चेहरे… पुन्हा भेटणारे

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

>> मलिका अमरशेख

माणसं स्वतःला भेटायला भितात… काहींना एकटेपणाची भीती वाटते. खरं तर एकटेपणा ही एकच अशी जागा आहे की जिथं हमखास तुम्ही स्वतःला भेटू शकता! एकटेपणात तुम्ही मेंदूच्या शुभ्र गल्ल्यांतून बिनधास्त फिरत जाता… काही रोकटोक नाही- मास्क पण नाही… तिथंच भेटता तुम्ही स्वतःला न् स्वतःच्या एकच नव्हे असंख्य चेहऱयांना!!

कुठे असतो तो चेहऱयामागचा चेहरा!’
अशी नामदेव ढसाळांची भन्नाट लाईन आहे कवितेतली.
-तर आपण आपल्याला कधी भेटतो? कसा दिसतो आपला चेहरा न् चेहऱयामागचा चेहरा? आपण ओळखतो का स्वतःला? आरशात आपण पाहतो तोच आपला चेहरा असतो का? नाहीच!
एका प्रसिद्ध तत्त्वज्ञाचं वाक्य आहे, ‘नदीच्या प्रवाहात आपण उभे राहून म्हणू शकत नाही की, मी त्याच पाण्यात उभा आहे! कारण क्षणापूर्वी पायाखाली असलेलं पाणी पुढे सरकून गेलेलं असतं!’ तर तद्वत आपला चेहरा क्षणापूर्वी असलेला नसतो. कधी आनंदी, कधी रागीट, कधी हास्य, कधी कारुण्य काळजीनं चिंतातुर, अनेक नवरसांच्या छटा त्यावर येतात जातात…
रोज सकाळी उठून आपण घडय़ाळाला भेटतो… गाडी-रस्ते-कामाची ठिकाणं ते घर… मग थेट निद्रादेवीच्या आधीन. पण काही काळापासून हे काळ-काम-वेगाचं गणित बदललं!
कुत्र्या-बैलांना घालायचं मुसकं माणसांच्या तोंडावर आलं… लोकांना घरातच थांबायला शासन-मीडिया ओरडून, विनवून सांगू लागले- पोरांना आईबाप दिसू लागले. बायका धास्तावल्या, पण खूशही झाल्या. घरातच राहायचं न् पोराला नवऱयाला चांगलंचुंगलं खाऊपिऊ घालायचं. त्यांच्याशी गप्पा करायच्या! फॅमिली टाइम मिळू लागला.
अर्थात काही वेळा सहवासाचा अतिरेक जाचक होऊ लागला. चोवीस तास एखाद्याचं अस्तित्व सहन करणं त्रासदायक होऊन भांडणं पण होऊ लागली. काहीवेळा रोजीरोटी सुटल्यामुळे रोजचं अन्न मिळणं पण कठीण झालं!
घरात राहिलं तर उपाशी मरणार, बाहेर गेलं तर कोरोना मारणार! चॉइस काहीही असला तरी उत्तर एकच- मरण! अशा बिकट वेळेला बऱयाचदा खरा चेहरा दिसतो माणसाचा. बऱयाच लोकांना विशेष म्हणजे भटक्या विमुक्त समाजाचे काही लोक निस्सीम भक्त असतात. त्यांना तर प्रचंड नैराश्य-वैफल्यानं डिप्रेशनच येते एकदम!
– बापरे! नाक्यावर उभं राहून मित्रांबरोबर सिग्रेट, कटिंग चाय न् गप्पा नाही? ट्रेकिंग, पर्यटन नाही? दोन बिल्डिंगा सोडून राहात असलेल्या चिकण्या रेखा, सोनिया तत्सम परींकडे जायचं नाही? मरणच बरं त्यापेक्षा असा विचार केला तरी आपल्या जगण्या मरण्यावर आपल्या घरच्यांचं पण जगणं-मरणं अवलंबून आहे हे लक्षात येऊन आणि कुचंबणा होऊन हात चोळत घरात बसायचं…
-ओझोनला पडलेलं होल बुजला या सुखद माहितीबरोबर अजून बऱयाच गोष्टीचं ज्ञान होत गेलं-
आपल्या नवऱयाला घरातलं एकही काम येत नाही, हा शोध काही बायकांना लागला तर आपल्या बायकोला व्यवहाराची काडीचीही अक्कल नाही न् पोरांना पेटीएम येतं न् हातचलाखीनं पाकिटातले पैसेही गायब करता येतात याचं ज्ञान झालं!
घरात बसूनही जगणं सुंदर करता येतं हाही एक जगण्याचा आयुष्याचा चेहरा! तर घराबाहेर मृत्यू वाट पाहात असतानाही दुसऱयाची सेवा, दुसऱयाचा जीव वाचवायला बाहेर पडणं हाही माणसाचा माणुसकी असलेला सुंदर चेहरा! न् मास्क अन् संपूर्ण बंद पोशाख चढवला तरी तो सुंदर चेहरा लपत नाही न् तेजानं झळकतच राहतो…!
चोवीस तास घरात बसून घराला सजवून सुंदर करता येतं. पण घराच्या भिंती रंगवून मनातल्या भिंती तशाच कठोर भकास राह्यल्या तर काय उपयोग? मृत्यूला काय एकदा भेटायचंच आहे. पण मग त्यासाठी आज असलेला दिवस रडून का वाया घालवायचा?
एकनाथांची गोष्ट आठवली. एकदा एकनाथ असेच बसले असता एक माणूस येऊन आपलं रडगाणं ऐकवू लागला-‘कोणीच माझ्याशी चांगलं वागत नाही. तो असं वागला, तो असं म्हणाला, ती असं बोलली…!’ बराच वेळ हे ऐकून घेऊन नाथ शांतपणे म्हणाले, ‘‘तुझ्या चेहऱयावरून मी सांगतो की आजपासून तू फक्त आठच दिवस जगणार आहेस.’’
माणूस हबकला… रडत भेकत घरी पळाला… सगळय़ांचे निरोप घेऊ लागला- सगळय़ांना गळाभेट घेत बोलत राह्यला.
आठ दिवस होऊन गेले… नववा… दहावा दिवस… हा आपला खटखटीतच.
अतीव आश्चर्य आनंदानं तो पुन्हा नाथांकडे आला.
‘‘पहा पहा… मी अजून आहे…!’’
नाथ आपले शांतच! त्याच शांतपणे त्यांनी विचारलं,
‘‘या आठ दिवसांत तुला कुणाचा वाईट अनुभव आला? कोणी बोललं?’’
‘‘छे छे… सगळेजण खूप चांगलं वागले माझ्याशी… किती प्रेम करतात माझ्यावर…’’ नाथ गालातल्या गालात हसले. म्हणाले, ‘‘अरे, हेच लक्षात ठेव… आपला आजचा शेवटचा दिवस असंच समजून वागत जा. त्यामुळे तू दुसऱयांशी चांगला वागलास तर तेही तुझ्याशी चांगलंच वागतील…!’’
तर अशी ही नाथांघरची उलटी खूण! सुलटा चेहरा दाखवणारी!
तीक्र प्रतिकूल परिस्थितीतही काही माणसं हिरवीगार हसतात… छोटय़ा छोटय़ा सुखांच्या पिल्लांना गोंजारतात… सुख आणि आनंद क्षणभंगूर असले तरी मनाच्या कप्प्यात आता… त्यांना सुरक्षित ठेवता येतं… साठवून साठवून ठेवायचं… न् मग बाहेर दुःखाची वादळं आली की हळूच आत जपून ठेवलेल्या त्या सुखाच्या आठवणींना अलगद स्पर्श करायचा की मग दुःखाची वादळं पण त्या दारावरून निघून जातात…
माणसं स्वतःला भेटायला भितात… काहींना एकटेपणाची भीती वाटते. खरं तर एकटेपणा ही एकच अशी जागा आहे की जिथं हमखास तुम्ही स्वतःला भेटू शकता! ते एकमेव तुमचं फक्त तुमचं स्वतःचं सिंहासन असतं… जिथं तुम्ही एकमात्र सर्वसत्ताधीश असता. जिथं कुणी येणार नसतं न् कुणी तुम्हाला ‘जा’ म्हणणार नसतं… अशा ठिकाणाला कशाला घाबरायचं? कदाचित एकटेपणात भूतकाळाचं भूत कोपऱयात उभं असेल या विचारानं पण दचकत असावेत; पण कसं असतं पहा, की माणसाला आत्मसंरक्षणाचं कवच मन इतकं प्रभावीपणे देत असतं की भूतकाळातली भूतं ते सफाईनं गाडून टाकतं… विस्मृतीच्या तळघरात बंद करून टाकतं मन- त्रासदायक आठवणींनं आपण त्रस्त होऊन विकल होऊ नये म्हणून. मग एकटेपणात कोण भेटतं? एकटेपणात शैशव भेटतं… गाभुळलेल्या चिंचा भेटतात… अवखळ खटय़ाळ हसू भेटतं… गालगुच्च्या घेणाऱया आठवणी भेटतात…आईचा मऊ ऊबदार स्पर्श भेटतो… तर बापाची भक्कम पाठ, खांदा भेटतो- एकटेपणात शाळा सुटलेल्या पोरींपोरांसारखी पळत आपल्याजवळ येणारी स्वप्नं भेटतात… एकटेपणात कानात कुजबुजत गुपितं सांगणाऱया कथा भेटतात… एकटेपणात तुम्ही मेंदूच्या शुभ्र गल्ल्यांतून बिनधास्त फिरत जाता… काही रोकटोक नाही- मास्क पण नाही…
तिथंच भेटता तुम्ही स्वतःला न् स्वतःच्या एकच नव्हे असंख्य चेहऱयांना!! जे माहीत करून घेणं खूप छान न् आवश्यक असतं आपल्याला!

[email protected]