नृत्य-गाण्याची मैफल- नर्तक पक्षी

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

>> विद्या कुलकर्णी

नर्तक पक्षी आपल्या शेपटीच्या पिसांची उघडझाप जपानी पंख्यासारखी सतत करत असतो यामुळेच त्याला इंग्रजीमध्ये फॅनटेल म्हणत असतील!!!

नर्तक हा पक्षी मुंबईमध्ये दिसतो असे सांगितले तर तुमचा कदाचित विश्वास बसणार नाही. मी उत्तराखंड – सत्तालमध्ये नर्तक पक्ष्याचे फोटो काढून आले व नंतर मला हे पक्षी माझ्या घरातील खिडकीतूनच बरेच वेळा दिसले. ‘‘काखेत कळसा व गावाला वळसा’’ असेच काहीतरी!!

नर्तक पक्षी आपल्या शेपटीच्या पिसांची उघडझाप जपानी पंख्यासारखी सतत करत असतो यामुळेच त्याला इंग्रजीमध्ये फॅनटेल म्हणत असतील!!! हा पक्षी अतिशय मोहक, गोड दिसतो. जादुई पंखा असलेला हा नर्तक एका फांदीवरून दुसऱया फांदीवर क्षणात उडतो. त्याच्या हालचालींमधील सहजता खूप मनोवेधक आहे. त्याने शेपटीवर करून पंख्याप्रमाणे पसरवली की शेपटीच्या पंखांवर नक्षी पहावयास मिळते. नर्तक पक्षी सतत नृत्य करत असतो. नृत्यासोबत त्याचे 4-8 सुरांचे मंजुळ गाणेही चालू असते. खरंच आनंदी वृत्ती त्याच्याकडून शिकावी!! नर्तक पक्ष्याच्या चार पोटजाती आहेत. पांढऱया गळ्याचा नर्तक, पिवळ्या पोटाचा नर्तक, पांढऱया भुवईचा नर्तक, पांढऱया ठिपक्यांचा नर्तक. पांढऱया गळ्याचा नर्तक व पिवळ्या पोटाचा नर्तक या पक्ष्यांची माहिती घेऊया.

1) पांढऱया गळ्याचा नर्तक
पांढऱया गळ्याचा नर्तक हे ‘ऱिहपिदूरीदी’ कुटुंबाचे सदस्य असून हिंदुस्थान, थायलंड व व्हिएतनाम या देशात आढळतात. हिंदुस्थान राजस्थान, मध्य प्रदेश, ओडिशा, आंध्र प्रदेश महाराष्ट्र इत्यादी राज्यांमध्ये वास्तव्य जास्त प्रमाणात आहे. उद्याने आणि पानझडीच्या जंगलात, शहरात घरांभोवतीच्या झाडांमध्ये या पक्ष्याचा निर्धास्तपणे वावर असतो. या पक्ष्यांची नाचण, नाचरा, न्हावी अशी अनेक नावे असली तरी ‘नर्तक’ नावाने जास्त प्रसिद्ध आहेत. या पक्ष्याची लांबी साधारण 12 ते 21 सें.मी. असून वजन 9 ते 13 ग्रॅम्स असते. शरीर काळसर तपकिरी-राखी रंगाचे असते. पोटाचा, मानेचा रंग पांढरा असतो. डोक्यावर रांगोळीने काढाव्यात अशा तीन-चार रेषा असतात. भुवयादेखील पांढऱया रंगाच्या असतात. शेपटीच्या पंखांवर नक्षी असते. या पक्ष्यांचे माश्या, डांस व किडे असे मुख्य खाद्य असते. हे पक्षी उडणाऱया कीटकांना हवेतच चिपळ्यांप्रमाणे मिटणाऱया चोचीत पकडतात. मार्च ते ऑगस्ट यांचा प्रजननाचा ऋतू असतो.

2) पिवळ्या पोटाचा नर्तक
पिवळ्या पोटाचा नर्तक हे पक्षी हिंदुस्थानी उपमहाद्वीप, हिमालय, थायलंड, व्हिएतनाम आणि म्यानमारसह दक्षिणपूर्व आशियाचे काही भाग येथे आढळतात. या पक्ष्यांचा वावर मुख्यत्वे रुंद पानांच्या सदाहरित झाडांच्या जंगलात असतो. या पक्ष्याची लांबी 11.5 – 12.5 असून वजन 6 ग्रॅम्स असते. रंग राखाडी असून खालील बाजू पिवळ्या रंगाची असते. त्यांची चोचसुद्धा राखाडी व पिवळ्या रंगाची मिळून असते. डोळ्याभोवती काळी पट्टी असते. त्यांच्या पंखांमध्ये पांढरे पट्टे असून शेपटी रुंद व काळसर राखाडी असते. तिची टोके मात्र पांढरी असतात. जून ते जुलै यांचा प्रजननाचा ऋतू असतो. यांचे घरटे छोटे व खोल असून ते शेवाळं वापरून बनवलेले असते. सत्तालमध्ये मी जरी दोन्ही पक्ष्यांचे फोटो काढले आहेत तरी पिवळ्या पोटाचे नर्तक खूपच दुर्मिळ आहेत. पांढऱया गळ्याचे नर्तक या पक्ष्यांचा वावर बऱयाच ठिकाणी होता व मला मनसोक्त फोटो काढता आले. एका उंच व दाट झाडावर पिवळ्या पोटाचे नर्तक दिसत आहेत कळल्यावर आम्ही सर्वजण तिकडे धावलो. या पक्ष्याने आमची उत्सुकता फारच ताणून धरली व त्याचे प्रत्यक्ष फोटो काढायला 3 – 4 तास वाट पाहायला लागली.

[email protected]