लेख – शेती सुधारणा कायदे आणि शेतकरी आंदोलनाची भूमिका

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

– प्रतिभा शिंदे

दिल्ली येथे संयुक्त किसान मोर्चा या बॅनरखाली पंजाबमधील 33 किसान युनियन्स, अखिल भारतीय किसान संघर्ष समन्वय समिती व देशभरातून पोहोचलेल्या 15 राज्यांमधील शेतकरी संघटनांच्या वतीने सुरू असलेल्या घेरा डालो – डेरा डालो या शेतीविरोधी कायद्यांच्या विरोधातील आंदोलनाला आता दोन आठवडय़ांपेक्षा जास्त दिवस उलटून गेले आहेत. हे शेतीविषयक कायदे ज्या पद्धतीने संसदेत पारित केले गेलेत त्यामागची सरकारची भूमिकाच संशयास्पद आहे. या तीन अधिनियमांमध्ये हिंदुस्थानी शेतीपद्धतीच्या मूळ स्वरूपात बदल करून कृषी क्षेत्राला व्यापारी रूप देऊन ते उद्योगपतींच्या हाती सोपवण्याचेच हे षड्यंत्र आहे.

केंद्र सरकारच्या शेती सुधारणा कायद्यांविरोधात गेल्या दोन आठवडय़ांपासून दिल्लीत शेतकरी आंदोलन सुरू आहे. सरकारसोबतच्या चर्चेच्या फेऱया आतापर्यंत निष्फळ ठरल्या आहेत. आंदोलक शेतकरी आपल्या मागण्यांवर ठाम आहेत. सरकारकडून हे आंदोलन बदनाम करण्याचा, त्यात फूट पाडण्याचा प्रयत्न झाला. मात्र तो यशस्वी होऊ शकलेला नाही. त्याचवेळी या तीन कायद्यांबाबत चर्चेत व माध्यमांमधून बोलताना या कायद्यांची भलामण करताना शासकीय यंत्रणा काही चुकीच्या गृहितकांची सातत्याने मांडणी करते आहे ते व त्यावरची संयुक्त किसान मोर्चाची भूमिका पुढीलप्रमाणे आहे –

1) शेतकऱयांना आता कृषी उत्पन्न बाजार समित्यांव्यतिरिक्त खुल्या बाजारात त्यांचे धान्य विकण्याचे स्वातंत्र्य मिळेल. मुळात यापूर्वीही अनेक राज्यांमध्ये हे स्वातंत्र्य आहेच, उलट एकूण शेतीमालाच्या फक्त 20 ते 23 टक्के धान्यच कृषी बाजारात खरेदी केले जाते तर 63 टक्के शेतमाल हा खासगी व्यापारीच खरेदी करतात. प्रश्न आहे तो ते ज्या भावाने खरेदी करून शेतकऱयाला लुबाडतात त्या किमती सनियंत्रित करण्याचा.

2) शेतकऱयांनाही व्यापाऱयांसारखेच किंमत ठरवण्याचे स्वातंत्र्य व शक्ती आहे, मुळात आजवरचा इतिहास बघितला तर शेतमाल निघाल्यावर शेतकऱयाने गुंतवलेला पैसा, त्यासाठीचे कर्ज व त्याची परतफेड, शेतीमाल दीर्घकाळ साठवून ठेवण्यासाठीची क्षमता व साधने नसणे यामुळे तो तत्काळ विकण्याशिवाय त्याला पर्याय नसतो. त्यामुळे तो व्यापाऱयासोबत बार्गेनिंग करण्याच्या क्षमतेत नसतो व त्याला त्याचा माल विकण्याशिवाय पर्याय नसतो.

3) नियंत्रणमुक्त बाजारपेठ व कायद्याचा अडथळा नसल्याने शेतकरी मुक्तपणे त्याचा व्यापार करू शकेल व त्याला जास्त किंमत मिळू शकेल. आतापर्यंतच्या घटना व इतिहास बघितला तर शेतकऱयाला शासनाच्या कायदेशीर संरक्षणाची गरज भासली आहे. त्यामुळेच कायदा तयार करावा लागला. या कायद्यात सुधारणा होऊ शकतात, परंतु त्याचे अस्तित्वच नष्ट केले किंवा त्या व्यवस्थेला मुक्त बाजार व्यवस्थेच्या समोर कमजोर केल्यास शेतकऱयाचे शोषणच होईल.

4) या नव्या कायद्यांमुळे मधले अडते व दलाल दूर होऊन शेतकऱयाला फायदा होईल. कृषी उत्पन्न समित्यांमधले अडते व दलाल यांच्याकडून शेतकऱयांची लूट होते हे खरे असले तरी त्यात नियम करून सुधारणा आणता येईल. अशा फसवणुकीविरुद्ध तक्रार करायला मार्केट कमिटी असते, परंतु या अडत्यांची लूट बंद करण्यासाठी मार्केट कमिटीलाच निष्प्रभ करणे योग्य नाही.

या तिन्ही कायद्यांमुळे निर्माण होणारे काही धोके

1) विस्कळीत बाजारपेठांमुळे शेतकऱयांची सामूहिक बार्गेनिंग शक्ती कमी होईल. या कायद्यांमध्ये बाजार समितीला बायपास केल्यामुळे अनेक व्यापारी व कंपन्या अस्तित्वात येतील. सर्वांचे नियम अथवा व्यवहार समान नसल्याने शेतकऱयांना बाजार समित्यांमध्ये जी सामूहिक सौदेबाजीची शक्ती होती अथवा त्याला भांडायला जागा होती तीच नष्ट होईल. समान नियम नसल्याने यात बाजार समित्यांचे अस्तित्वही कमजोर होईल.

2) जेव्हा शेतीमालाच्या भावात घसरण होईल तेव्हा सरकारला या कायद्यांमुळे बाजारपेठेत हस्तक्षेप न करण्याची पळवाट तयार होईल व हमी भावाची सक्ती नसल्याने व्यापारी त्याचा फायदा घेतील.

3) शेतकरी उत्पादने व्यापार आणि वाणिज्य (प्रोत्साहन व सुविधा), कायदा व अत्यावश्यक वस्तू कायदा या दोन्ही कायद्यांचा फायदा घेऊन कृषी मालाच्या बाजारपेठेत उतरलेल्या मोठय़ा बलाढय़ कंपन्या बाजारभाव व साठवणुकीच्या बळावर स्पर्धा संपवून त्यांची मक्तेदारी स्थापित करतील. त्यात शेतकरी व बाजार समित्या दोन्हींचे अस्तित्व कायमचे संपून जाईल.

4) या देशातील ग्राहकांची अन्न सुरक्षा साठेबाजीमुळे धोक्यात येईल. अत्यावश्यक वस्तू कायद्याचा व कंत्राटी शेती कायद्याचा गैरफायदा घेऊन उलट साठेबाजी वाढेल, कारण करार शेतीमध्ये अमर्याद साठवणूक करण्याची तरतूद आहे.

5) शासनाने या कायद्यांमध्ये शेतकऱयाला त्याच्या शेतीमाल व्यवहारसंबधी काही तक्रार असल्यास त्याला न्यायालयीन पर्याय बंद करून प्रशासकीय पातळीवर उपजिल्हाधिकारी स्तरावर दाद मागण्याची तरतूद केली आहे ज्यामुळे त्याला मोठय़ा कंपन्यांच्या विरुद्ध न्याय मिळणे अवघड होईल. प्रशासकीय अधिकारी हे शासनाच्या हितसंबंधांसाठी काम करतील व हे नैसर्गिक न्यायाच्या विरुद्ध व मुलभूत मानवी हक्काचे उल्लंघन आहे.

6) राज्य सरकारांच्या अधिकारांचे उलंघन – शेती, बाजार व्यवस्था, राज्यांतर्गत व्यापार आणि अर्थव्यवहार हे सर्व विषय राज्यांच्या विषय सूचीत आहेत तरीही केंद्राने यासंबंधी केलेले हे 3 कायदे राज्यांच्या अधिकार क्षेत्रावर अतिक्रमण आहे.

7) या कायद्यांमध्ये शेतकऱयाला द्यावयाचे मूल्य, याव्यतिरिक्त त्याच्या मालाची प्रतवारी ठरवणे, वजनमापपद्धती याबाबतीत कुठलीच स्पष्टता नाही. ज्यामुळे शेतकऱयाचे शोषण होऊ शकेल.

8) कृषी बाजार समित्यांमधला भाव हा बाहेर खासगी व्यापाऱयांसोबत व्यवहार करताना बेंचमार्क ठरवला जातो, परंतु या बाजार समित्याच कमजोर झाल्या तर असा बेंचमार्क निश्चित करणे अवघड होईल.

9) करार शेतीच्या कायद्यात कुठेही कंपन्यांनी लेखी करार केला पाहिजे, अशी सक्ती करणारी तरतूद नाही त्यामुळे तोंडी शेती करारपद्धतीच नेहमीप्रमाणे वापरली जाण्याची भीती आहे.

10) करार शेती कायद्यात शेतीपिकाचे नुकसान झाल्यास त्याची भरपाई कोण झेलणार यावरही काहीच स्पष्टता नाही.

याव्यतिरिक्त विद्युत अधिनियम संशोधन बिल 2020चाही संयुक्त किसान मोर्चा विरोध करीत आहे, कारण यात शेतीसंबंधी वीज बिल तसेच घरगुती वापर वीज बिलावरची सबसिडी रद्द करण्याचे षड्यंत्र सुरू आहे.

एकूणच हे कायदे संमत करण्यामागे केंद्र सरकारची नीती स्पष्ट आहे ती अशी

1) लोकशाही पद्धतीने कायदेनिर्मितीची प्रक्रिया करताना भारतीय संविधान आणि संसदीय पद्धतींचा अवमान करत हे 3 कायदे बनवण्यात आले आहेत.

2) शेती विकासात पायाभूत सुविधांमध्ये कुठलीही गुंतवणूक न करता ही गुंतवणूक खासगी क्षेत्रे करतील, असे सांगत देशाच्या पायाभूत संरचना या खासगी क्षेत्राच्या हातात सोपविण्याचा शासनाचा हेतू आहे.

3) आतापर्यंतच्या लोककल्याणकारी शासनाची जबाबदारी यापुढे शासन स्वीकारणार नाही व अल्पभूधारक शेतकरी, शेतमजूर यांनी आपली सुरक्षा स्वतःच करायची आहे ही शासनाची भूमिका आहे.

4) केंद्र सरकार आतापर्यंतच्या धोरणांमध्ये त्यांच्या पद्धतीने कुठलेही बदल करू शकेल, परंतु त्याची जबाबदारी घेण्यास तयार नाही.

5) राज्य सरकारांना बाजार समित्यांमधून जो महसूल मिळत होता तो आता अप्रत्यक्ष रूपाने केंद्राकडे जाईल. या पार्श्वभूमीवर आम्ही केंद्र शासनाच्या या तिन्ही किसान विरोधी कायद्यांचा विरोध करतो व हे कायदे तत्काळ रद्द केले जावेत तोपर्यंत आमचे आंदोलन सुरूच राहील.

(लेखिका या दिल्लीत सुरू असलेल्या किसान आंदोलनात सहभागी अखिल भारतीय किसान संघर्ष समन्वय समितीच्या कोअर कमिटी सदस्य आहेत व लोकसंघर्ष मोर्चाच्या नेत्या आहेत.)