वेब न्यूज – फेसबुकचे जाहिरात धोरण वादात

खुद्द 250 फेसबुक कर्मचार्‍यांनीच सीईओ मार्क झुकरबर्ग यांना पत्र पाठवून फेसबुकच्या जाहिरात धोरणाविषयी टीका केली आहे. कर्मचार्‍यांनी राजकारण्यांनी पोस्ट केलेल्या जाहिरातींच्या संदर्भात कंपनी लागू करत असलेल्या धोरणावर टीका केली आहे. ‘राजकीय वादविवाद सोडविणे आणि एखाद्या नेत्याच्या भाषणास त्याच्या अनुयायांपर्यंत पोहोचण्यापासून रोखणे, किंवा सार्वजनिक वादविवाद आणि लोकांच्या खाजगी आयुष्यात डोकावणे ही आपली फेसबुकची भूमिका आणि धोरणे अयोग्य असल्याचे’ कर्मचार्‍यांचे म्हणणे आहे. फेसबुकचे हे धोरण एका वर्षापेक्षा अधिक काळापासून कार्यरत आहे.

मुक्त भाषण (फ्री स्पीच) आणि सशुल्क भाषण (पेड स्पीच) या दोन्ही गोष्टीत पूर्णतः फरक असल्याचे या पत्रात ठामपणे सांगण्यात आले आहे. सध्या फॅक्ट चेकिंगच्या नावाखाली राजकीय कार्यालयातील लोक आणि राजकीय पक्ष याबाबत फेसबुक अवलंबत असलेले धोरण, हे फेसबुकच्या मूळ उद्देश्याला काळिमा फासत असल्याचे मत या पत्रात व्यक्त करण्यात आले आहे. सध्याचे धोरण सामान्य माणसाच्या आवाजाचे रक्षण करत नाही, तर उलट राजकारणी जे काही फेसबुकवर पोस्ट करतात ते सत्यच असते असे मानणाऱया लोकांच्या एका मोठ्या गटाची फसवणूक करणारे आहे. या धोरणांमुळे राजकारण्यांच्या हातात फेसबुक नावाचे शस्त्र गवसले आहे असा आरोप यात करण्यात आला आहे.

फेसबुकच्या कर्मचार्‍यांनी आपल्याला वाटणारी काळजी स्पष्टपणे सांगण्याचे जे धाडस दाखवले आहे, त्याचे समाजाच्या सर्वच थरांतून प्रचंड कौतुक होत आहे. लोकशाहीसमर्थक आणि अनेक राजकीय कार्यकर्त्यांनीदेखील त्यांची प्रशंसा केली आहे. फेसबुकच्या धोरणांमुळे मतदार आणि त्यांच्या विचारांवरती दडपण येत असून हे लोकशाहीसाठी अत्यंत घातक असल्याने, फेसबुकने आपल्या धोरणांचा फेरविचार करावा असे आवाहन समाजातील अनेक थरांतून करण्यात येत आहे.

आपली प्रतिक्रिया द्या