
>> प्रा. वैजनाथ महाजन
‘अंधाराची भीती कशाला गा प्रकाश गीत’ अशी एक छान ओळ आहे. ही ओळ तुम्हा-आम्हा सर्वांनाच प्रकाशाच्या दिशेने झेपावण्याकरिता प्रेरित करणारी आहे. दिवाळीच्या सण म्हणजे खरा दीपोत्सव मानला जातो. आणि याकरिता ‘अंधार फार झाला, पणती जपून ठेवा’ असे पण आपणास सुचविले जात असते. माणूस हा जन्मापासूनच प्रकाशाचा पूजक आहे. त्याने सदैव प्रकाशाचीच आराधना केलेली असून प्रकाश आणि अंधार या दोन्ही बाजू एकाच वेळी तो समजून घेत आला आहे. दिवाळीचा सण आपल्या पूर्वजांनी आणि परंपरेने जो निर्माण केला तो जीवनातील अंधाराला विराम देऊन प्रकाशाच्या दिशेने जाण्याकरिताच आहे. म्हणून तर पणती ही आजही पवित्र मानली जाते आणि दिवाळीच्या पहिल्या दिवशी दिव्याची पूजा करण्याची प्रथाही रूढ आहे. या साऱयाचे महत्त्वाचे कारण असे आहे की, दिवसातील एकूण घटकांची विभागणी उजेड आणि अंधार यातच झालेली आहे. अंधारानंतर उजेड आणि उजेडात आपणा सर्वांना सर्व सृष्टी लख्ख दिसू लागते. आपले मन विलक्षण प्रसन्न होऊन जाते. दिवाळी येते ती कार्तिकात आणि कार्तिकाइतका कोवळ्या किरणांचा दुसरा मास नाही. त्यामुळे या दिवसात आपण आप्तेष्टांना घरी बोलावतो. एकत्र फराळ करतो, सुख-दुःखाच्या गोष्टी जाणून घेतो आणि आपल्या परीने त्यांच्या व आपल्या अडीअडचणींचे निवारण करण्याचाही प्रयत्न करू लागतो. दिवाळीची सुट्टी म्हणजे आनंदाची पर्वणी असेच वर्षानुवर्षे आपण अनुभवत आलेलो असतो. याकरिता आकाशकंदील दारी लावणे आणि तेच मोठे करून आकाशी सोडणे यातला पण विलक्षण आनंद आपण घेत असतो. असे आकाशात झेपावणारे रात्रीचे आकाशकंदील आपणास आभाळी दूरवर चमकताना दिसत असतात. त्यातूनही दिव्यांच्या प्रकाशाची उजळाई उठून दिसत असते. घरी-दारी पणत्या लावल्याच जातात. त्या पणत्यांभोवती बालचमू बसून फुलबाजा पेटवत असतात. फुलबाजी म्हणजे पुन्हा प्रकाशाचेच प्रतीक. त्यामुळे मुलांना त्या प्रकाशाचे विलक्षण आकर्षण वाटत असते. आबालवृद्धांना आनंद देणारी दिवाळीतील एकमेव पणती आणि फुलबाजी हीच खरी आनंदाची प्रतीके म्हणून समोर येत असतात. पणतीचे पावित्र्य आपणाला आपल्या संस्कृतीने सतत शिकविलेले आहे. एखादा भक्कन लागणारा दिवा जसा एकदम आपला परिसर उजळून टाकत असतो तसे पणतीचे असत नाही. पणती तेवत राहते आणि आपल्या परीने तिच्यापुरता उजेड देत राहते. म्हणून रवींद्रनाथ टागोरांच्या चार ओळी या ठिकाणी आवर्जुन नमूद कराव्याशा वाटतात. त्या ओळींत रवींद्रनाथ सांगतात की, ‘मावळत्या सूर्याने मागे वळून पाहिले आणि मिणमिणत्या ज्योतीला विचारले की, माझ्यानंतर माझे काम कोण करील?, मिणमिणत्या ज्योतीने उत्तर दिले की माझ्या परीने मी ते करीन’ या ओळींना फार मोठा अर्थ आहे. याचा अर्थ सूर्य नसला तरी मनुष्य पणती जपून ठेवत आला आहे आणि पणती जपून ठेवण्याकरिता दिवाळीचा सण साजरा करत आला आहे. दिवाळीचे हे दिवस आल्हादाचे असतात. प्रत्येकाला मनोमन सुखावणारे असतात आणि आपले मन उन्नत करणारेपण असतात. दिवाळीचा आनंद म्हणजे उजेडाच्या उगवाईचा खराखुरा आनंद. म्हणून दिवाळी वर्षातून एकदा येते आणि तुम्हा-आम्हा सर्वांना तिच्या दीपोत्सवाने उजळून टाकत असते. यामुळे येणारे वर्ष उजेडाचे होते आणि तो उजेड आपणाला नव्या प्रकाशवाटा दाखविणारा असतो. आपली उद्याची वाटचाल उमेदीने करणारा असतोच असतो.





























































