
>> दिलीप जोशी
कसोटीचा काळ जसा व्यक्तीच्या किंवा समूहाच्या जीवनात येतो तसा तो काही वेळा सबंध मानवजातीच्या जीवनात कसा येऊ शकतो याची जाणीव कोविड-19 किंवा कोरोना व्हायरसने अनपेक्षितपणे करून दिली आहे. काही महिन्यांपूर्वी चीनच्या वुहान शहरात कोरोनाचा उद्रेक झाला आणि त्याने बघता बघता पृथ्वीव्यापी व्हायला सुरुवात केली. हा व्हायरस घातक असल्याने त्यावर सगळय़ा जगाने जागृत होऊन तातडीचे उपाय सुरू केले. संसर्गजन्य असलेला हा विषाणू (व्हायरस) नेमका कसा आहे याचीच कल्पना नसल्याने त्यावर ‘लस’ उपलब्ध असण्याचा प्रश्नच नव्हता. आता मात्र जगातल्या अनेक वैद्यकीय प्रयोगशाळा या विषाणूविरोधातील ‘लस’ शोधण्याचा अथक प्रयत्न करीत आहेत. अमेरिकेत त्याला चांगला प्रायोगिक प्रतिसाद मिळाल्याचेही म्हटले जाते. परंतु तशी लस जनसामान्यांसाठी उपलब्ध होण्यासाठी काही काळ जावा लागेल.
अशा एखाद्या अज्ञात रोगाचा आकस्मिक प्रादुर्भाव होऊ लागला की काय परिस्थिती उद्भवते त्याचा अनुभव हिंदुस्थानने पूर्वी येणार्याया प्लेगच्या साथीत घेतला आहे. विसाव्या शतकात प्लेगने महाराष्ट्रालाही ग्रासले होते. इंग्रजांच्या हडेलहप्पी कारवाईचा निषेध पुण्यात होत होता. त्यावेळी लोकमान्य टिळकांचा जनसामान्यांवरचा प्रभाव लक्षात घेऊन त्यांनी लोकांना आरोग्यरक्षणासाठी आवाहन करावे अशी फिल्म ब्रिटिशांनी बनवली होती असा उल्लेख आढळतो. आपल्याकडे मोठे अभिनेते ‘पोलिओ डोस’चा प्रचार करतात. तसाच तो प्रयत्न होता. कालांतराने प्लेग आटोक्यात आल. देवीचा प्रादुर्भावही देशातून कमी होत त्या रोगाचे उच्चाटन झाले.
काळाच्या ओघात ऑण्टिबायोटिक किंवा प्रतिजैविकाचा शोध अलेक्झांडर फ्लेमिंग यांनी लावला. पेनिसिलीन अनेक रोगांवर रामबाण ठरू लागले. पुढे त्याची ‘ऍलर्जी’ काही रुग्णांना होऊ शकते हे लक्षात येताच त्याचा वापर मर्यादित प्रमाणात होऊन इतर प्रभावी प्रतिजैविके आली. जगाचे जीवनमान (लाँजिलिटी) वाढले. जगाची लोकसंख्या सात अब्जांवर पोहोचली.
एकेका दुर्धर आजारावर उपचार शोधण्याचे प्रयत्न सुरू असतानाच नवीनच काही ‘साथ’ अचानक उद्भवते, कोणता तरी अज्ञात व्हायरस हाहाकार उडवतो याचा अनुभव जगाला वेळोवेळी येत गेला. 1980 च्या दशकात ‘एड्स’ व्हायरसने जगाला घाबरवलं. हळूहळू त्यावर काबू आणण्यात बरेचसे यश आले.
मात्र ‘कोरोना’ने आतापर्यंतच्या सर्व विषाणूंवर कडी केल्याचे दिसते. प्रगत-अप्रगत असा कोणताही भेदभाव न करता या आजाराचा विषाणू जगभर पसरतोय. त्यामुळे सबंध जगात ‘न भूतो’ अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. सर्वच राष्ट्रांना रोगप्रसार रोखण्यासाठी प्रवेशबंदीचा निर्णय घ्यावा लागलाय. इटली आणि स्पेनमध्ये चीनपाठोपाठ कोरोना थैमान घालतोय. अमेरिकेसारख्या प्रगत राष्ट्राचीही त्यातून सुटका झालेली नाही. अध्यक्ष ट्रम्प यांनी स्वतःची कोरोना टेस्ट करवून घेतली. ते या विषाणूपासून मुक्त आहेत, पण ब्रिटनचे पंतप्रधान राजपुत्र आणि कॅनडाच्या प्रधानमंत्र्यांच्या पत्नीला कोरोनाने ग्रासले.
हिंदुस्थानात केंद्र, राज्य सरकारे आणि स्थानिक स्वराज्य संस्थांनी जनजागृतीची वेळीच मोहीम सुरू केली. सध्या देशव्यापी लॉक डाऊन सुरू आहे. प्रचंड गर्दीच्या मुंबई शहराची काळजी सर्वांनाच वाटतेय, पण इतरत्रही कोरोना रुग्ण आढळलेत. हिंदुस्थानातील या विषाणूचा प्रादुर्भाव बाहेरच्या देशांतून इथे आलेल्यांमुळे झाल्याचे लक्षात आलेय. ज्यांना या रोगाची लागण झाल्याचा संशय आणि पुष्टी मिळते त्याला विलग ठेवण्यात येतेय. घरातही आरोग्याची काटेकोर काळजी घेऊन विलगीकरण शक्य असल्याचे सरकारचे म्हणणे योग्यच आहे. सरकार आणि आरोग्यसेवक व पोलीस यंत्रणा कोरोनाचा मुकाबला करायला सिद्ध झालेत.
त्याचबरोबर कोरोनाविरुद्धची ही ‘लढाई’ आजच्या घडीलाही तुमची आमची आणि संपूर्ण मानवजातीची आहे. कोणत्याही अफवांनी घाबरणे किंवा अफवा पसरवणे यापासून दूर राहायला हवे. गर्दीच्या ठिकाणी अकारण जाण्याची गरज नाही हे पथ्य पाळलेच पाहिजे. अचानक आलेल्या या संकटाने भांबावून न जाता त्याचा प्रतिकार करण्यासाठी सर्वांनी सिद्ध व्हायला पाहिजे. आपले आणि आपापसातल्या लोकांचे आरोग्य अबाधित राखण्याचे आटोकाट प्रयत्न सर्वांनीच केले पाहिजेत. ‘ऑनलाइन’ काम होऊ शकत असेल तिथे तसेच करावे. परस्परांचे प्रबोधन करून या संकटाचा न डगमगता सामना करण्यावाचून पर्यायही नाही. मानवता या अनपेक्षित आपत्तीतून सहीसलामत बाहेर पडेल अशा आत्मविश्वासाने ‘कोरोना’विरोधी मोहिमेला सहकार्य करू या. मग यश आपलेच आहे.























































