लेख – गुलामीविरुद्धचा लढा…

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

>> दिलीप जोशी  

सध्या आपण आपल्या स्वातंत्र्याचं अमृत महोत्सवी वर्ष साजरे करीत आहोत. परकीय ब्रिटिश राजवटीच्या जुलमी जोखडातून हिंदुस्थानला मुक्त करण्यासाठी हजारो स्वातंत्र्यसैनिकांनी आपल्या आयुष्याचा होम केला.

लोकमान्य टिळक यांनी काँग्रेसला ब्रिटिश राजवटीविरुद्ध आवाज उठवणारी संस्था बनवले. देशभर दौरे करून त्यांनी जनजागृती केली आणि स्वराज्य हा जन्मसिद्ध अधिकार असल्याचं जनतेला पटवून दिलं. टिळकांना हिंदुस्थानी राजकारणातले जहाल पंथी म्हटलं जातं. गोपाळकृष्ण गोखले यांचे विचार मवाळ गणले गेले. महात्मा गांधी यांनी गोखले यांना गुरू मानून टिळकांच्या पश्चात त्यांचंच राजकारण आपल्या सत्याग्रह, असहकाराकरिता अशा मार्गांनी पुढे नेले. स्वातंत्र्यवीर सावरकरांचा सशस्त्र क्रांतीवर भर होता. भगतसिंग, राजगुरू अशा क्रांतिकारकांनी देशासाठी प्राणार्पण केले. नेताजी सुभाषचंद्र बोस यांनी तर ‘आझाद हिंद सेने’ची स्थापना केली. या विविध मार्गांनी लढणाऱयांचे ध्येय मात्र एकच होतं ते म्हणजे देशाला परकीयांच्या राजवटीपासून मुक्त करावे. ते साध्या झालं, त्याला आता पंच्याहत्तर वर्षे पूर्ण होतील. म्हणूनच हा स्वातंत्र्याचा अमृत महोत्सवी काळ.

राजकीय स्वातंत्र्याबरोबरच सामाजिक समताही अत्यंत महत्त्वाची. त्यासाठी सामाजिक विषमतेविरुद्ध महात्मा जोतीराव फुले, न्यायमूर्ती रानडे, विठ्ठल रामजी शिंदे, आगरकर आणि भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी अथक प्रयत्न केले. त्यातूनच स्वतंत्र हिंदुस्थानचे समताधिष्ठत संविधान साकारलं. डॉ. बाबासाहेब आंबेडकर संविधानाचे शिल्पकार ठरले.

जगातल्या सर्वच संस्कृतीत अन्यायाविरुद्ध लढणाऱ्या अग्रणी मंडळींनी समाजाला योग्य विचार आणि दिशा देण्याचे प्रयत्न केले. इंग्लंडच्या सत्तेपासून फारकत घेऊन स्वातंत्र्य जाहीर करणाऱ्या आधुनिक अमेरिकेचा इतिहास तसा साडेतीनशे वर्षांचाच, परंतु तेथे काळे-गोरे हा वर्णभेद तिथल्या आफ्रिकन वंशाच्या लोकांवर अन्याय, अत्याचार करणारा होता. विख्यात विनोदी लेखक मार्क ट्वेन यांनीही त्यांच्या बालपणी घरी असलेल्या गुलाम मुलाविषयी लिहिलं आहे. मोठेपणी त्यांनी या कुप्रथेला विरोध केला. कोणीही  सहृदय, सुबुद्ध माणूस कोणत्याही प्रकारच्या गुलामगिरीचा स्वीकार आणि समर्थन करूच शकणार नाही. अमेरिकेतली काळय़ा लोकांची गुलामगिरी अखेर अब्राहम लिंकन अध्यक्ष असताना कायद्याने नष्ट झाली, तरी एकविसाव्या शतकातही तिथे जॉर्ज फ्लॉइडसारख्यांवर अत्याचाराच्या तुरळक का होईना, घटना घडतच आहेत. ही गोष्ट उद्वेग आणणारी आहे. ‘ब्लॅक लाइव्हज मॅटर’चा घोष करीत आज काळय़ांबरोबर लाखो गोरी माणसंही समतेच्या बाजूने उभी राहतायत ही मात्र आशादायी गोष्ट आहे.

एकोणिसाव्या शतकात मात्र अमेरिकेतली काळय़ा माणसांच्या गुलामगिरीचा प्रकार केवळ भीषण असाच होता. त्याविरुद्ध फ्रेड्रिक डग्लस यांनी सक्रिय लढा दिला. स्वतः गुलामगिरीचे भयंकर अत्याचार अनुभवले आणि विलक्षण जिद्दीने, विपरीत परिस्थितीवर मात करीत त्यांनी स्वतःची गुलामीतून मुक्तता करून घेतली.

फेब्रुवारी 1818 मध्ये जन्मलेल्या फ्रेडरिक ऑगस्टस वॉशिंग्टन बेली या बालकाला आपलं कुटुंब ‘गुलाम’ असल्याची कल्पना असणं शक्यच नव्हतं. ते तान्हुल्या वयात असतानाच त्यांच्या आईची दुसरीकडे गुलाम म्हणून रवानगी झाली. मायलेकरांची ताटातूट करण्याइतके मळेवाले मालक दगडी काळजाचे होते. डग्लस यांनी नंतर लिहिलंय, ‘आई एकोणीस किलोमीटर अंतरावरून मला भेटायला रात्रीच यायची. तिला मी नेहमी अंधारातच पाहिलं.’ हे सुखही त्यांना फार काळ लाभलं नाही. नंतर काही काळ ते आजोळी राहिले. सातव्या वर्षी त्यांचीही ताटातूट झाली. पुढे बाल्टिमोरला मालकाची पत्नी त्यांना शिकवू लागली, पण गुलाम शिकले तर बंड करतील असं मालकाने सांगताच शिक्षण बंद झालं. मात्र याच वाक्याने शिक्षणाचं महत्त्व आपल्याला कळलं, असं डग्लस म्हणतात.

लपून शिक्षण घेत राहिले. लिहिता, वाचता येऊ लागलं. त्या किशोरवयात त्यांना आणखी एका मालकाने ‘भाडय़ाने’ घेतले. तिथे त्यांनी चाळीत गुलामांना शिक्षण देणं सुरू केलं. परिणामी ते मूळ मालकाकडे परत पाठवले गेले. त्याने डग्लसना एका क्रूर मालकाकडे धाडलं. तो त्यांना चाबकाने फोडून काढायचा. अखेर त्यांनी तारुण्याच्या शक्तीवर मालकाशी दोन हात केले. तो क्षण आयुष्य बदलणारा ठरला, असं नंतर त्यांनी म्हटलंय. कालांतराने गुलामांच्या प्रांतातून निसटून न्यूयॉर्कला आल्यावर जीवन केवळ श्वास आणि रक्ताभिसरण यापलीकडे काही असतं हे पहिल्याच दिवशी अनुभवलं. हे वाक्यही त्यांची वेदना प्रकर्षाने जाणवून देतं. नंतर त्यांची पत्नी आणि त्यांनी डग्लस हे आडनाव घेतले. आपल्या कुटुंबीयांच्या मुक्ततेसाठी प्रयत्न केले. महिलांच्या हक्कांसाठी सातत्याने लढा दिला. सत्याहत्तर वर्षांच्या आयुष्यात अखेरीस अध्यक्ष हॅरिसन यांनी त्यांची नेमणूक हैती येथे केली. त्यानंतर सारं जीवन समतेच्या लढाईसाठी खर्ची पाडलं.

[email protected]