लेख – सणासुदीचा सुज्ञपणा!

564

>> दिलीप जोशी ([email protected])

पाऊस आता बहुदा संपलाय. दिवाळीचे पहिले दोन दिवस त्याने सणाचा थोडा विचका केला खरा, परंतु नंतरच्या दोन दिवसांत बरीच उघडीप मिळाली. दिवाळीच्या खरेदीची झुंबड उडाली. रस्ते माणसांच्या जथ्यांनी फुलले. रंगीबेरंगी पोषाख, रंगीत रोषणाई, रंगतदार रांगोळय़ा आणि रंगीत आकाशदीप. सारा सप्तरंगांचा सुखद सोहळा सजला. त्याआधीचे बरेच दिवस मात्र कमालीचं मळभ घेऊन आले होते. कुठे दुष्काळ तर कुठे महापूर यांनी अनेकांचं जीवन मेटाकुटीला आणलं. त्याची जाणीव ठेवूनच दिवाळीच्या आनंदाकडे पाहायला हवं. एका मित्र दांपत्याने आणि त्यांच्या तरुण विद्यार्थ्यांनी ट्रकभर चांगले कपडे गोळा करून गरजूंपर्यंत पोहोचवले आणि अनेकांचा आत्मदीप तेवत केला.

पावसाळय़ातल्या पहिल्या थेंबाचा आनंद जसा अवर्णनीय असतो, पहिल्या हिरव्या तृणपात्याचं भुईतून उगवणं जसं आल्हाददायक भासतं तसंच पावसानंतर निरभ्र झालेल्या आकाशातून पृथ्वीवर स्रवणाऱ्या उन्हाचं अप्रूप वाटतं. परवा मुंबईपासून तास-दीड तासाच्या प्रवासात ट्रेनमध्ये मुद्दाम पूर्वेकडच्या खिडकीशी बसलो. तिथे सकाळचं ऊन येतं म्हणून काही जणांनी जागा ‘सोडली’ होती. अर्थात ‘ऑक्टोबर हीट’चा ताप होतोच, पण ही गोष्ट दिवाळीतली म्हणजे ऑक्टोबर संपत आलेल्या काळातली. गर्दी नव्हती म्हणून जागा ‘सोडून’ देण्याची चैन इतरांना परवडली होती हेही खरंच. मात्र मला ऊन ‘खात’ बसलेलं पाहून समोरच्याला वाटलेलं आश्चर्य जाणवलं.

पावसानंतरचं पहिलं ऊन, त्या सोनेरी किरणांचा चार महिन्यांच्या वियोगानंतर झालेला ऊबदार स्पर्श त्या समोरच्या माणसाला काय सांगणार! मी खिडकीबाहेर पाहू लागलो. बाकीचे सहप्रवासी सेलफोनवरच्या फिल्म, मेसेज किंवा गेममध्ये गुंतले होते. कानात कॉर्ड अडकवून कोणी स्वतःशीच हसत होता तर कोणी काहीबाही पुटपुटत होता. बेताच्या आवाजात कोणाचं पलीकडच्याशी बोलणं चाललं होतं. खिडकीबाहेरचा सूर्य माझ्या एकटय़ासाठीच उगवला असावा असं वाटताच हसू आलं. ट्रेन शहराबाहेर पडताच खाडीकाठच्या खारजमिनीचा आणि आसपास फोफावलेल्या झाडाझुडपांचा, गवताचा गंध जाणवू लागला. बऱ्याच ठिकाणी अजूनही पाणथळ जागांवर पक्षी दिसत होते. डोंगरभागात नुकत्याच सुकलेल्या पावसाळी धबधब्यांच्या चमकत्या जागा अणि आजूबाजूला गर्द हिरवाई जाणवत होती. त्यावरून विहरणारा वाराही थंड होता. आणखी दोन-तीन महिन्यांत हे वैभव ओसरू लागेल. थंडीनंतरचा उन्हाळा वाढू लागला की, हिरवळ सुकून जाईल. डोंगरामाथे पुन्हा उघडे-बोडके होतील. तेव्हाच्या उन्हाच्या झळा नकोशा वाटतील… पण आताचं हे थोडय़ाशा का होईना, पण थंडीतलं ऊन किती आनंददायी आणि आरोग्यदायीसुद्धा.

मग मनात आलं की, सर्वंकष प्रदूषणाने सभोवतालची हवा – पाणी तरी कुठे शुद्ध राहिलंय? जगातल्या सगळय़ाच महानगरांना आणि त्यांच्या आसपासच्या प्रदेशांना त्यानं ग्रासलंय. आहे नाही ती हिरवाई दिवसेंदिवस नष्ट होतेय. त्यात निसर्गाशी संवाद साधायला लोकलच्या ‘फास्ट लाइफ’मध्ये वेळ कोणाला?

त्याचवेळी त्या दिवशीच्या वर्तमानपत्रातली एक बातमी आठवली. यंदा मुंबईत फटाक्यांचं प्रदूषण खूपच कमी झालं आणि हवेची गुणवत्ता वाढली. अन्यथा या दिवसांत कानठळय़ा बसवणारे आणि दमा, खोकला वाढवणारा धूर ओकणारे फटाके हैराण करतात. सर्वसामान्य तरुण नागरिकांनाही आता त्याचा त्रास जाणवतो, मग वृद्ध आणि आजाऱ्यांची गोष्टच वेगळी. या दिवाळीत सर्वांनीच सामूहिक सुज्ञपणा दाखवत शहराचा श्वास स्वच्छ आणि निरोगी ठेवला ही गोष्ट आनंदाची आहे. गेल्या वर्ष-दोन वर्षांत प्लॅस्टिकविरोधी मोहीम सुरू झाल्याचे चांगले परिणाम हळूहळू दिसायला लागलेत. मुंबईचे सुमद्रकिनारे स्वच्छ करणाऱ्या संस्थांच्या आणि व्यक्तींच्या परिश्रमातून तिथे शंख-शिंपले पुन्हा दिसू लागल्याची बातमी फार उत्साहवर्धक आहे. समाजाच्या सामूहिक सुज्ञतेने निर्णय घ्यायला सुरुवात केली की, रचनात्मक बदल कसे घडतात याची ही उदाहरणं. आगामी काळात आपल्यापुरताच विचार करायचं सोडून ‘सभोवताल’चा विचार करणं पृथ्वीवरच्या सर्वच माणसांना भाग पडणार आहे. कारण गेल्या दशकात निसर्गाने जगभर असे काही तडाखे दिलेत की, त्यातून प्रगत देशही सुटलेले नाहीत.

निर्हेतुक निसर्गाची कृपा किंवा प्रकोप काही देशांच्या, खंडांच्या सीमा ठरवून होत नसतो. सारी पृथ्वीच त्याने व्यापलेली असते. तेव्हा त्याची ‘संवाद’ साधण्याची कला अवगत करायला हवी. त्याच्यावर मात करण्याच्या बाता न मारता त्याला साथ द्यायला हवी. त्यासाठी घराची, ट्रेनची, कारचीच नव्हे, तर आधी मनाची ‘खिडकी’ उघडायला हवी. म्हणजे तेच सभोवताल निराळं दिसू लागेल. निसर्ग अंत पाहत असेल तर अथक, अनंत प्रयत्न करून त्याला आपलंसं करून घ्यावं लागेल. तेवढा सुज्ञपणा माणूस नावाच्या ‘सेपियन’ प्राण्यात नक्कीच आहे. या दिवाळीत त्याची झलक दिसली. तोच दीपोत्सवातील खरा आशेचा किरण आहे.

आपली प्रतिक्रिया द्या