विज्ञान रंजन – सागर पातळीखालचे प्रदेश

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

>> विनायक

पृथ्वीवर जिथे जिथे मानव किंवा प्राण्यांची वस्ती आहे त्या जागा 75 टक्के सागरी पाण्याच्या पातळीपेक्षा दोन-चार ते शेकडो मीटर उंच असलेल्या भूभागावर आहेत. अगदी मुंबईतल्या, पहिल्या देशी रेल्वेच्या, मुंबईतील उपनगरी स्टेशनांवर, ती जागा समुद्राच्या पातळीपासून, (सी-लेव्हलपासून) किती उंचीवर आहे ते नोंदलेलं आढळतं. मुंबईकडून मध्य रेल्वेच्या ट्रेनमधून कर्जत किंवा कसाऱयाकडे जाताना, स्टेशनच्या नावांच्या पाट्या बारकाईने वाचल्या तर आपण समुद्रसपाटीपासून क्रमाक्रमाने किती उंच जात आहोत ते लक्षात येतं. हवा थंड होत जाते. समुद्रसान्निध्य संपल्यामुळे हवा कोरडीसुद्धा होते. नाशिक किंवा पुण्याला जाईपर्यंत आपण कोकणपट्टीच्या सागरकिनारी भागातून उंच पठारावर पोचलेलो असतो.

समुद्राला उद्देशून कवी कुसुमाग्रजांनी ‘किनारा तुला पामराला’ म्हटलंय. त्याचा अर्थ माणसाच्या जिद्द, कष्ट, उन्नतीला ‘किनारा’ नाही असा घ्यायचा. कविकल्पनेतलं एकेकाळचं हे भौगोलिकही सत्य असलेलं सागराचं किनाऱ्यावर थबकणं अनेक ठिकाणी बदलत चाललं. या लेखमालेतून आपण पृथ्वीवरच्या ‘बुडित खाती’ नोंद होणाऱया अनेक छोटय़ा-मोठय़ा बेटांची माहिती घतेली होती. त्यात मालदीवसारख्या संपूर्ण द्वीपदेशाचा समावेश आहे. त्यांच्या एका अध्यक्षाने तर ऑक्सिजन-मास्क लावून समुद्रात पाण्याखाली मंत्रिमंडळाची बैठक घेतली होती.

जागतिक तापमान कसं वाढतंय त्याचे चटके आपल्याला आता मार्च महिन्यातच बसतात. पूर्वी केव्हा तरी मे महिन्यात मुंबईचं तापमान चाळिशी पार करून गेलं तर गहजब व्हायचा. आता लोकांनी त्याचा विचार करणंही सोडून दिलंय. समुद्राच्या पाण्याचंही तापमान वाढतंय. त्यामुळे हवेतला दमटपणा अधिक होतो. तसंच अंटार्क्टिकावरचं आणि उत्तर धुवीय प्रदेशातलं बर्फही वितळतं. त्याचा फटका बसून ‘टुवाळु’सारखा कमी लोकसंख्येचा देश लवकरच जलमय होणार आहे. ती मंडळी हळुहळू ऑस्ट्रेलियाकडे धाव घेतायत.

ही जर सागर सपाटीपासून काहीशा उंचीवर असलेल्या भूप्रदेशांची अवस्था, तर मग मुळातच सागर सपाटीखालीच असलेल्या देशांचं काय होईल? असे किती देश-प्रदेश जगात आहेत? आणि त्यांचं येत्या पन्नास वर्षांत काय होईल? असे अनेक प्रश्न आहेत. त्याच अनुषंगाने हा लेख. याला काही विज्ञानाधिष्ठत उत्तर आहे का, त्याचाही आढावा घेऊ.

नेदरलॅन्डस् (पूर्वीचा हॉलन्ड) देशाचा 25 ते 30 टक्के भाग नैसर्गिकरीत्याच्या सपाट पातळीखाली आहे. यातील सर्वात सखोल भाग सागर सपाटीच्या 22 फूट खाली आहे. या सखल भागात या देशाची अर्धी लोकसंख्या म्हणजे सुमारे 90 लाख लोक राहतात. कझाकीस्तानचा काही भाग सागर सपाटीच्या 22 मीटर खाली असून, चीनमधला एक भूभाग तर समुद्र सपाटीपेक्षा 150 मीटर खोलवर आहे. इजिप्त आणि इथिओपियामध्येही सागर सपाटीहून सुमारे 125 मीटर सखल असणाऱया जागा आढळतात. अझबैझान या देशाची राजधानी वाकू समुद्र सपाटीखाली आहे. सागर पातळीपेक्षा 90 फूट सखल भागात असल्याने संपूर्ण राजधानी, सागर पातळीपेक्षा खोलगट भागात असणारा तो एकमेव देश ठरला आहे. हिंदुस्थानात, केरळ राज्यामध्ये कोचीच्या आसपासचा कुट्टानंद वगैरे भाग 4 ते 10 फूट सागर सपाटीखाली असून त्याचं वर्णन ‘राइस बाऊल ऑफ केरळ’ किंवा ‘भाताचा वाडगा’ असं केलं जातं.

अमेरिकेतील न्यू ऑर्लिन्सचा बराचसा भाग समुद्र सपाटीखाली असून जेरिकोचा पश्चिम भाग सागर सपाटीच्या बराच खाली आहे. याशिवाय इन्डोनेशियाची राजधानी असलेलं जकाती शहर दरवर्षी साडेसहा इंच खचतेय. म्हणजे त्याची भूभाग सपाटी सागरपातळीपेक्षा खाली जाऊ शकते. हैती, अल्जेरिया, डेन्मार्क, मोरोक्को, जपान, उझबेकिस्तान, इंग्लंडमधलं फेन्स आणि ऑस्ट्रेलियाचाही काही भाग सागर पातळीपेक्षा सखल असून जगात अशा 250 जागा आहेत. मुंबईची सात बेटं जोडून महामुंबई बनवताना इंग्रज सरकारने भराव टाकून बुनवलेला खाडी भाग, तसंच नरिमन पॉइंटचं ‘लॅण्ड रिक्लेमेशन’ किंवा समुद्र हटवून केलेलं भूसंपादन यामुळेही समुद्राच्या पाण्याची पातळी वाढली आहे.
वाढतं जागतिक तापमान, ढासळते ध्रुवीय बर्फ-तट, माणसांनी निर्माण केलेली कृत्रिम बेटं, छोट्या खाड्या, विहिरी, तलाव बुजविण्याचे प्रकार यातून पावसाचं सारं पाणी समुद्रातच जातंय. आणखी एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे भूगर्भातील अच्छिद्र (नॉन-पोरस) कातळांमध्ये लाखो वर्षे साठलेलं पाणी, माणसाने विविध कारणांनी गेल्या शंभर वर्षांत इतकं उपसलंय की त्यामुळे भूपृष्ठ ठिकठिकाणी खचत आहे. त्याची आपल्याला जाणीवच नाही. एवढंच काय, पण या अवास्तव, हव्यासी जल-उपशापायी पृथ्वीचा अक्षसुद्धा (तोल बिघडून) कलतो की काय अशी धास्ती व्यक्त केली जाते.

उद्याच्या ग्लोबल वॉर्मिंगच्या, समुद्र हटवून भूभाग निर्माण करण्याच्या ‘पराक्रमा’ने समुद्राच्या पाण्याची पातळी काही मीटरने वाढली तर मुळातल्याचा सखल भागांभोवती घातलेले बंधारे ओलांडून सागरजल आत येईल. दक्षिण कोरियात 40 किलोमीटर लांबीचा बंधारा बांधून समुद्राचं पाणी अडवण्याचा प्रयत्न केला आहे. नेदरलॅन्डमध्ये तर 17 हजार किलोमीटर लांबीचे ‘डच डाइक’ (बंधारे) बांधले आहेत, पण ‘काय हटवुनी हटतो सागर, हटेल एकीकडे, उफाळेल तो दुसरीकडुनी गिळून डोंगरकडे…’ असं कवी यशवंत (पेंढरकर) म्हणतात ते खरंच. त्यातही मुदलातच खोलगट भागात राहणाऱ्या जिवांना अधिकच धास्ती वाटणारच.