
गंजिफा खेळणे हा परंपरेचा भाग आहे. पूर्वी राजवाडय़ांमध्ये ‘गंजिफा’ म्हणजे पत्त्यांचा खेळ खेळला जाई. आता या गंजिफाच्या पत्त्याकडे ‘कलाकृती’ म्हणून पाहिले जाते. प्रत्येक पत्ता म्हणजे एक सुंदर कलाकृतीच असते. प्रत्येक ठिकाणच्या गंजिफाचे विषय भिन्न, संख्या भिन्न, प्रदेशानुसार वापरले जाणारे रंग भिन्न आहेत. महाराष्ट्रात सावंतवाडी येथील राजघराण्याने ही कला अद्यापही जोपासली आहे. जतन केली आहे.
गंजिफा कलेच्या जपणुकीत मोहन शामराव कुलकर्णी यांचा सिंहाचा वाटाआहे. 53 हून अधिक वर्षे गंजिफा कलेसाठी ते काम करीत असून नाशनल अवार्डनी पुरस्कृत असलेले कुलकर्णी यांचे ‘रामा’चे चित्रण हे मुख्य वैशिष्टय़ आहे.
पर्शियन भाषेत ‘गंज’ म्हणजे खजिना, गंजिफा हा शब्द त्यापासून आला असावा. पूर्वी राजवाडय़ांमध्ये ‘गंजिफा’ म्हणजे पत्त्यांचा खेळ खेळला जाई. आता या गंजिफाच्या पत्त्याकडे ‘कलाकृती’ म्हणून पाहिले जाते. प्रत्येक पत्ता म्हणजे एक सुंदर कलाकृतीच असते. गंजिफेह या मूळ पर्शियन शब्दाचा अर्थ ‘खेळातील पत्ते’ असा होतो. हिंदुस्थानात 16 व्या शतकातील मुघल काळात गंजिफाचे मूळ दिसते. 12 व्या शतकापूर्वी इराणमध्ये गंजिफा बनविणे बंद झाले. हिंदुस्थान हा गंजिफा बनविणारा शेवटचा देश असून ओरिसात याला गंजापा म्हणतात. म्हैसूर, राजस्थान येथेही ही परंपरा दिसते. महाराष्ट्रात सावंतवाडी येथे गंजिफाचे सुंदर पत्ते बनविले जातात.
‘अष्टदिग्पाल’ हा ओरिसा मुक्तेश्वर मंदिरापासून प्रेरित होऊन बनविलेला ‘गंजिफा.’ अष्ट म्हणजे आठ, दिग् म्हणजे दिशा आणि पाल म्हणजे रक्षणकर्ता.
महाराष्ट्रातील सावंतवाडीत दशावतार म्हणजे विष्णूचे दहा अवतार. यात एकूण 120 पत्ते असतात आणि रामायण, महाभारतातील दृश्ये गंजिफावर आढळतात. मैसूरमधील गंजिफावर दरबारी दृश्ये, प्राणी, पक्षी, तर कश्मीरमधील गंजिफावर पर्शियन छाप असलेले फुलांचे नक्षीकाम, नैसर्गिक रंग, लाख याबरोबर ऐश्वर्य प्राप्त व्हावे यासाठी सोन्याचा वर्ख वापरलेला दिसतो. गुजरात आणि राजस्थानमध्येही गंजिफा आढळतात. राजस्थानमधील गंजिफा भडक रंगातील असतात व राजस्थानी शैलीतील असून प्रत्येकी 96 पत्ते असलेले 8 संच असतात. त्यांची संख्यांशी संबंधित, राजदरबाराशी संबंधित, समाजातील वेगवेगळय़ा स्तरांशी संबंधित अशी विभागणी असते.
प्रारंभीच्या काळात कासवाच्या पाठीचे कवच, हस्तिदंत, चंदनाचे लाकूड यांचा वापर पत्ते बनविण्यासाठी होत असे. राजे-रजवाडय़ांसाठी बनविलेल्या गंजिफामध्ये हिरे-माणके बसविली जात. अशा पत्त्यांना ‘दरबार कलम’ म्हणत व साध्या पद्धतीने कापड, कागद यावर बनविलेले बाजार कलम. ‘क्रीडापत्र’ असेही नाव पूर्वी गंजिफासाठी वापरत.
बाजार कलमची गंजिफाची वर्तुळाकार कडा पांढऱया, लाल व पिवळय़ा रंगांच्या ठिपक्यांनी आणि छोटय़ा रेषांनी चित्रित केली जाते, तर ‘दरबार कलम’च्या गंजिफाच्या कडेत सुंदर नक्षीकाम असते आणि हे सावंतवाडी गंजिफाचे वैशिष्टय़ आहे. जाड कागदावर प्रथम कडा रंगवून झाली की, मधल्या भागावर एका रंगाचे सपाट पटल रंगवितात. हळदीसारखा पिवळा रंग, गंजासारखा तांबूस रंग, काळा, लाल, हिरवा हे रंग वापरले जातात. ते पूर्ण वाळले की, छोटय़ा गोल दगडाने तो पत्ता हळुवार घासतात. जेणेकरून तो गुळगुळीत होईल आणि मग त्यावर थेट बारीक कुंचल्याने मुख्य आकृती म्हणजे राम, कृष्ण इ.चे रेखांकन करून ते पूर्ण रंगविले जाते. नंतर एका चौकोनी लाकडी पेटीत ठेवले जातात. ती पेटी अतिशय सुंदर चित्रांनी सर्व बाजूंनी अलंकृत केलेली असते. त्या पेटीत खेळाचे नियम सांगणारी एक पुस्तिकाही असते.
प्रत्येक पत्ता हस्तकलेचा सुंदर नमुना असतो. आयताकृती आणि गोल आकारात आढळतात. गोल आकार हा महाराष्ट्राचे वैशिष्टय़ आहे. पूर्वी हे पत्ते नैसर्गिक रंगाचा वापर करून बनविले जात. आता पोस्टर कलर्स वापरतात. पूर्वी पाच-सहा कागद एकावर एक चिकटवून जाड कागद बनवीत. आता तयार असलेला जाड कागद वापरतात. कापडाचा वापर केला तर चिंचोक्याच्या खळीमध्ये कपडा भिजवून ते कापड कडक केले जाते. आकार गोल असेल तर 5 ते 7 सें.मी. त्रिज्या असते. पाण्यापासून रक्षण व्हावे म्हणून त्यावर लाखेचा थर देतात. त्याला लाकरिंग करणे म्हणतात. त्यामुळे चकचकीत दिसतात. टिकाऊ होतात. गंजिफावरील चित्रे-चित्रकथी या महाराष्ट्राच्या चित्रशैलीशी मिळतीजुळत्या आहेत. सावंतवाडीच्या गंजिफात दशावतारी गंजिफा प्रसिद्ध आहे. त्यात अधिकाधिक म्हणजे 240 ते 288 पत्ते असतात. नवग्रह गंजिफामध्ये नवग्रह, तर राशी गंजिफामध्ये बारा राशींवर आधारित गंजिफांचे पत्ते असतात. त्यावर नवग्रह आणि राशींची चित्रे असतात. सावंतवाडीच्या दशावतारी गंजिफामध्ये विष्णूचे दहा अवतार – मत्स (मासा), कूर्म (कासव), वराह (डुक्कर), नरसिंह (अर्धा मानव, अर्धा सिंह), वामन (बटू), गोल असे मडके प्रतीक रूपाने दाखवतात. या संचातील पत्त्यावर दाखवितात. परशुरामाच्या पत्त्यांवर कुऱहाड, रामाच्या धनुष्यबाण, कृष्णाच्या गोल थाळी, बुद्ध-शंख आणि कलकी अवतारासाठी तलवारी दाखविल्या जातात.
पूर्वी सणासुदीला एकत्र बसून गंजिफा खेळत असत. रामाचा गंजिफा सकाळी 7 वाजल्यापासून खेळायला प्रारंभ होई, तर कृष्ण गंजिफा रात्री खेळला जाई. या खेळाद्वारे लोकांना नकळत पौराणिक धार्मिक कथांची ओळख करून दिली जाई. हे नुसते मनोरंजन नसून हिंदुत्वाविषयीची जाणीव निर्माण करते. हा खेळ खेळताना आध्यात्मिक अनुभव येतो असे खेळणारे लोक सांगतात. यावर जुगार किंवा पैसे लावून खेळणे वर्ज्य आहे.
‘गंजिफा कला’ जपणुकीत त्यांचा सिंहाचा वाटा आहे. पुण्याच्या राजा दिनकर केळकर वस्तुसंग्रहालयात ‘गंजिफा’चे सुंदर नमुने पाहायला मिळतात.
(लेखिका चित्रकर्ती, लोककला अभ्यासक व कलाशिक्षण तज्ञ आहेत)




























































