
कोरोना संसर्ग नियंत्रणात आल्यामुळे यंदा निर्बंधमुक्त वातावरणात मोठय़ा उत्साहात गणेशोत्सव साजरा करण्यात आल़ा. कोरोना काळातील सरकारने केलेल्या नियंत्रणाची जाणीव पूर्णपणे विसरून विद्यमान सरकारने गणेशमूर्तीच्या उंचीचे निर्बंध शिथिल केले. लोकमान्यांचा हेतू आणि आजच्या या उत्सवाची आणि उत्साहाची स्थिती पूर्णतः भिन्न आहे. मुळात विनायकाचे व्रत दीड दिवसाचे असावे. कारण या व्रतातील वापरली जाणारी माती दीड दिवसाहून अधिक ओली राहू शकत नाही. ती कोरडी पडल्यास मूर्ती भंग पावते. मात्र माणसाने आपल्या सोयीनुसार, उत्सव प्रियतेनुसार पाच दिवस, सात दिवस, दहा दिवस उत्सव साजरा करण्याचे ठरवले. त्यातूनच मग या व्रतासाठी शाडूचा वापर होऊ लागला. पुढे प्लॅस्टर ऑफ पॅरीसच्या मूर्ती आल्या.
गणपती ही बुद्धिदेवता म्हणून ओळखली जाते. उत्सवप्रियतेमुळे आपण या सणाचा कालावधी वाढवला आणि कालौघात अनंत चतुर्दशीला सार्वजनिक गणेशमूर्तीचे विसर्जन करण्याची प्रथा सुरू झाली. मूर्तीचे विसर्जन करताना तिचे पावित्र्य जपले जाणे आवश्यक असते. आज देशातील नद्या प्रदूषणाच्या विळख्यात आहेत. अशा पाण्यामध्ये गणेशमूर्ती विसर्जन करणे म्हणजे एक प्रकारे त्या देवतेचा अपमानच आहे, शिवाय त्या मूर्तीच्या विसर्जनाने मूर्तीवरील रासायनिक रंगामुळे जलचर जिवांवर परिणाम होतो.
विसर्जित केलेल्या ग़णेश मूर्ती दुसऱ्या दिवशी नदीकिनारी, समुद्रकिनारी दयनीय स्थितीत पसरलेल्या पाहवत नाही. किनारी आलेल्या मूर्ती घरगुतीच असतात असे नाही, सार्वजनिक गणेशोत्सव मंडळात पूजेकरिता लहान मूर्तीचाच वापर केला जातो. म्हणून कालांतराने याबाबतीत उत्साहाचे भान राहण्यासाठी काही बदल आवश्यक आहेत. मात्र, त्यामध्ये श्रद्धा, सामाजिक भावना दुखावण्याचा प्रश्न उद्भवू नयेत अशी अपेक्षा केल्यास वावगे ठरणार नाही.
सर्वप्रथम लहान मूर्ती भरीव आणि मातीच्याच असाव्यात तसेच विसर्जन केल्यानंतर त्या प्रवाहाबरोबर वाहत न जाता ताबडतोब पूर्णपणे विसर्जित व्हाव्यात अशाच प्रकारच्या मातीचा वापर करण्यात यावा. शासनाने विसर्जनाकरिता तयार केलेल्या कृत्रिम तलावातच विसर्जित कराव्यात असे सक्तीचे करणे आवश्यक वाटते. गावाखेडय़ात कृत्रिम तलावाची सुविधा करणे ही ग्रामपंचायत, नगर परिषद यांनी जबाबदारी घ्यावी त्यासाठी शासनाने निधीची तरतूद करावी, अन्यथा गावातील प्रतिष्ठतांनी गावोगावी सर्वांना सोयिस्कर असलेल्या वाडय़ांच्या मध्यभागी कृत्रिम तलाव बांधून त्यात मूर्ती विसर्जन करण्याची प्रथा सुरू करावी. अशा प्रकारे पर्यावरणपूरक उपक्रमांना शासनाने ‘आदर्श गाव’ वैगरे पुरस्काराने सन्मानित करून प्रोत्साहन द्यावे. मूर्तिकारांवरही केवळ मातीच्याच मूर्ती बनविण्याची सक्ती असली पाहिजे, मूर्ती आगमनासाठी आलेल्या भाविकांकडून मूर्तीचे विसर्जन कृत्रिम तलावातच करण्याची लेखी अट मान्य करून घेण्यात यावी ती सर्व जबाबदारी प्रशासनाने मूर्ती विक्रेत्यांवर सोपवावी व अटीप्रमाणे लहान/घरगुती गणपतीचे विसर्जन करण्यात येते किंवा नाही याची संपूर्ण जबाबदारी प्रशासनाची असेल. जेणेकरून गणेशमूर्तीचे पावित्र्य राखले जाईल. गणेशोत्सव, देवी, छटपूजा या उत्सवाचे विसर्जन समुद्र, नद्यात होऊन पाण्याचे प्रदुषण होते.प्रशासन ज्याप्रमाणे उत्सव साजरा करण्याकरिता नियमावली तयार करते, त्यात आगमन आणि विसर्जनाचे नियम, अटी नमूद असल्या पाहिजेत. केंद्र व राज्य सरकार, पर्यावरण विभाग आणि पर्यावरणप्रेमींनी याबाबत पुढाकार घ्यावा.
>> ऍड. मनमोहन चोणकर




















































