
>> अरुण जोशी
मराठीत भावगीतांचा जमाना सुरू झाला तो 1930 च्या दशकात. ‘रानारानात गेली बाई शीळ’ हे कवी ना.घ.देशपांडे यांचं गीत पहिल्यांदा भावगीत म्हणून ध्वनिमुद्रित झालं ते याच काळात. जी.एन.जोशी हे गायक आणि संगीतकार असलेलं हे गाणं त्या काळी खूप गाजलं. नाटय़पदांपेक्षा वेगळ्या धर्तीचं असलं तरी त्यावर ताना, आलापी यांची छाप असायचीच. तरीसुद्धा शास्त्रीय संगीत किंवा उपशास्त्रीय गाण्यापेक्षा वेगळं असं एक नवं दालन त्यामुळे मराठी संगीत विश्वात निर्माण झालं. आता अशा प्रकारची किंवा कोणत्याही इतर पद्धतीची मराठी गीतं कोणकोणत्या अमराठी गायक, गायिकांनी गायिली याचा मागोवा घेताना नेटवर अचानक गानतपस्विनी गंगूबाई हनगल यांच्या गोड स्वरातलं ‘आईचा छकुला चिमुकला, चपल सदा रुसलेला दिसला’ हे भा.वि. तथा मामा वरेरकर यांचं गीत ऐकता आलं. त्याचे संगीतकार बहुधा जी.एन.जोशीच असावेत. कारण चाल काहीशी ‘शीळ’ कवितेच्या आसपास फिरणारी वाटली. तज्ञ मंडळी त्यावर अधिक योग्य मार्गदर्शन करू शकतील.
… आणि मग गंगूबाई हनगल यांची आणखीही काही गाणी सापडली. मग आठवलं की, त्यातली कधीकाळी आमच्याकडच्या ग्रामोफोनवरून कानी पडली असावीत. कारण आजोबांच्या काळात, 1930 च्या काळात घेतलेला ग्रामोफोन आता बंद होऊन केवळ ‘ऍन्टिक पीस’ झालाय. त्यावेळी त्यांनी जमवलेल्या मेणाच्या (78 आरपीएमच्या) कितीतरी प्लेटी म्हणजेच ध्वनिमुद्रिका काळाच्या ओघात नष्टही झाल्या. तरी अनेकांच्या संग्रही असलेला हा दुर्मिळ खजिना आज इंटरनेटच्या माध्यमातून सर्वदूर पोचतोय हे चांगलं आहे.
गंगूबाईंचं गाणं आमच्या पिढीने मुंबईत ऐकलं तेव्हा त्यांनी साठी ओलांडलेली होती. तरी खणखणीत, परंतु भरदार आवाजातली त्यांची गायकी आणि ती खूप जुनी तलम स्वरातील वरच्या पट्टीतली फिरत असलेली गाणी यात बराच फरक जाणवत होता. त्याचं कारण असं समजलं की, वयाच्या पाचव्या वर्षापासून गायनाचे धडे गिरवणाऱ्या या सुरेल गळ्याच्या गायिकेचा स्वर घशाच्या शस्त्रक्रियेनंतर बदलला.
गंगूबाई हनगल कर्नाटकातल्या धारवाड जिह्यातल्या. 5 मार्च 1913 ते 21 जुलै 2009 असा त्यांचा 96 वर्षांचा प्रदीर्घ जीवनपट आणि त्यातली वय पाच ते त्राण्णव एवढी प्रचंड गानकारकीर्द. गंगूबाईंची आई अंबाबाई या उत्तम गायिका होत्या. सुरुवातीला कर्नाटक म्हणजे दक्षिणी संगीताची संथा त्यांना आईकडून मिळाली, परंतु शाळेत येता-जाताना रस्त्यावरच्या दुकानातल्या ग्रामोफोनवर वाजणारी उत्तर हिंदुस्थानी पद्धतीची ‘राधेकृष्ण बोल मुख से’ अशी गाणी कानावर पडत असल्याने बालवयात तीच गाणी सारखी गुणगुणण्याची सवय त्यांना लागली. ते ऐकून या मुलीला हिंदुस्थानी संगीतात रस आहे हे त्यांच्या आईनं ओळखलं आणि त्यांची रीतसर शिकवणी सुरू झाली. आचार्य हुलगूर, दत्तोपंत देसाई आणि अखेरीस उस्ताद अब्दुल करीम खांसाहेबांचे शिष्य असलेले किराणा घराण्याचे प्रसिद्ध गायक पंडित रामभाऊ कुंदगोळकर म्हणजे सवाई गंधर्व यांच्याकडे त्यांचं सांगीतिक शिक्षण परिपूर्णतेकडे जाऊ लागलं.
सवाई गंधर्वांकडे शिकत असताना त्यांना रोज रेल्वेने तीस किलोमीटर प्रवास करावा लागायचा. त्यावेळी त्यांचे गुरुबंधू भीमसेन जोशी त्यांना मदत करायचे. याच काळातील त्यांची ‘दरसन’ शब्दाने आरंभ होणारी तिनेक मिनिटांची दुर्गा रागातली ध्वनिमुद्रिका आली होती. स्वातंत्र्यप्राप्तीनंतर नऊ पंतप्रधान आणि पाच राष्ट्रपतींच्या उपस्थितीत त्यांचा सन्मान झाला. संगीत नाटक ऍकॅडमी पुरस्कारासह पद्मभूषण आणि पद्मविभूषण अर्पण करून त्यांचा उचित गौरव करण्यात आला.
मोकळ्या मनाच्या, घरगुती गप्पांसारखा संवाद साधणाऱ्या गंगूबाईंचं साधेपण त्यांच्या निर्मळ मनाची साक्ष देणारं होतं. त्यांची मुलगी कृष्णासुद्धा अप्रतिम गात असे. मात्र उतारवयात गंगूबाईंना लेकीचा वियोग सहन करावा लागला. वयाच्या 95-96 वर्षापर्यंत रसिकांशी संवाद साधणाऱ्या गंगूबाईंनी त्यांच्या गानकारकीर्दीला 75 वर्षे पूर्ण झाली त्यावेळी शेवटची मैफल केली, तीसुद्धा त्या त्र्याण्णव वर्षांच्या असताना! 2006 नंतर त्यांचं गाणं थांबलं आणि 96 व्या वर्षी 2009 मध्ये हा स्वर कालवश झाला. आज त्यांची ‘चकाके कोर चंद्राची’ आणि ‘तू तिथे अन् मी इथे’ ही जी.एन.जोशी यांच्यासह गायिलेली कवी स. अ. शुक्ल यांची भावगीतं उपलब्ध आहेत. धारवाडहून मुंबईला आल्यावर पंचवीसऐवजी सव्वाशे रुपये मानधन मिळाल्यावर झालेल्या आनंदाचा किस्सा त्या सांगत असत. महाराष्ट्राशी त्यांचं अतूट नातं होतंच. वृद्धापकाळातही त्या मुंबईतील कार्यक्रमांना आल्या होत्या. त्यांची ख्याल गायकी प्रसिद्ध होतीच. तशीच भावगीतांमध्येही ‘चकाकलेली’ चंद्राची कोर क्वचित ठाऊक असेल.
































































