
>> प्रा. सचिन बादल जाधव
मानवाने विकासाच्या नावावर नैसर्गिक संसाधने संपविली आणि निसर्गाला जिंकण्याचा प्रयत्न केला तर काय होऊ शकते, याची प्रचीती सध्या आपल्याला येत आहे. प्रदूषण, जागतिक तापमान वाढ, हवामान बदल, विरळ ओझोन थर, समुद्र सपाटीत वाढ, नैसर्गिक आपत्ती आणि यातून होणारे प्रचंड आर्थिक नुकसान अशी कडू फळे आपण चाखत आहोत. ज्या जंगलांनी आपल्याला जन्म दिला, ज्या हवा, पाणी आणि वृक्षांनी आपल्याला जगविले तेच आता आपण नष्ट करायला निघालो असून आपल्याच हाताने आपल्याच अंगावर कुऱ्हाड चालवीत आहोत. स्वतःला बुद्धिमान आणि विज्ञान युगात वावरतो अशी घमेंड मारणाऱ्या मानवाला साधे निसर्गाचे गणित समजू शकले नाही याचे आश्चर्य वाटते.
जागतिक सरासरी तापमान वाढ होते त्याचा परिणाम पृथ्वीवर सर्वत्र जाणवतो, परंतु प्रादेशिक भौगोलिक कारणांमुळेसुद्धा तेथील तापमानात वाढ होते. खडकाळ आणि वाळूच्या भागात दिवसाचे तापमान जास्त असते. वायुप्रदूषण ज्या प्रदेशात मोठय़ा प्रमाणावर उद्योग आहेत आणि प्रदूषण आहे तिथे तापमान जास्त असते. जसे विदर्भात नागपूर आणि चंद्रपूरसहित अनेक शहरांचे तापमान जास्त असते. मोठय़ा प्रमाणात शहरीकरण हेसुद्धा तापमान वाढीसाठी कारणीभूत आहे. जागतिक तापमान वाढीमुळे पृथ्वीवरील ऋतुचक्र व हवामानात मोठे बदल झाले आहेत. पावसाळा, हिवाळा आणि उन्हाळा या ऋतुचक्रात बदल झाला आहे. अल-निनो, ला-निनोच्या सतत प्रभावामुळे जगभरातील दैनंदिन हवामानावर प्रभाव पडला आहे. तापमान वाढ ही ऋतुचक्र व हवामानावर परिणाम करते. त्यामुळे अति पाऊस, ढगफुटी, वादळे, महापूर, थंडी आणि उष्णतेची लाट व रोगराई अशा अनेक नैसर्गिक संकटांना आज सर्वच देशांना सामना करावा लागतो.
जागतिक तापमान आणि प्रदूषण कमी करायचे असेल तर त्यांचे स्रोत बंद करावयास पाहिजेत. उद्योगातून जल, वायू, कचरा प्रदूषण होणारच नाही याची काळजी घेतली पाहिजे. वाहने सौर ऊर्जेवर, बॅटरीवर किंवा सीएनजीवर चालवावी. कोळसा आधारित वीजनिर्मिती कमी करून सौर, जल, वायू, ऊर्जा, नैसर्गिक व बॉयोगॅस ऊर्जा अशा अपारंपरिक ऊर्जा स्रोतांकडे आपण वळलो पाहिजे. एलईडी दिव्यांचा सर्वत्र वापर व्हावा आणि वीज बचत करावी. जागतिक आणि प्रादेशिक पातळीवर, शहरातील सर्व खुल्या जागांवर वृक्षारोपण झालेच पाहिजे. जंगले वाचवावी आणि लावावी. काँक्रीटची घरे व रस्ते तापू नये म्हणून त्यांना पांढरा रंग द्यावा. गाव तिथे तलाव आणि लहान धरणे सर्वत्र बांधावी, पावसाचे पाणी अडवावे व जिरवावे. जगाची 7.19 अब्ज एवढी मोठी लोकसंख्या सर्व नैसर्गिक संसाधनांना संपवीत आहे. त्यामुळे तिला कमी करणे गरजेचे आहे. अशा अनेक उपाययोजना आज राबविल्यास हळूहळू अनेक वर्षांपर्यंत पर्यावरणाचे झालेले नुकसान भरून निघेल.
निसर्गाचे एक चक्र आणि साखळी आहे. त्यातील एक साखळी तुटली तर दुसरी आणि पुढे ती तुटत जाते. आपण जंगले तोडली त्यामुळे जैवविविधता कमी झाली. प्राणवायू कमी होऊन कर्ब वायू वाढला. कारखानदारी वाढविली. प्रदूषण वाढले. तापमान वाढले. नैसर्गिक संकटे वाढली आदी आज पर्यावरणाच्या गंभीर समस्या निर्माण झाल्या आहेत. वायू, जल, भूमी अशा जीवनावश्यक नैसर्गिक घटकांचे आपण प्रदूषण करून आपले मरण ओढवले आहे. थर्मल पॉवरच्या प्रत्येक मेगावॅटसाठी दरवर्षी एका माणसाचा जीव जातो असा अहवाल ग्रीन पीस या संस्थेने दिला आहे. शहरातील पाण्यात घाण, कचऱ्याचे ढिगारे, हाच कचरा पुढे नाल्यातून नदीत जातो आणि समुद्रात साचतो. यामुळे जल जैवविवधिता ढासळते. सागरी क्षारता व आम्लता वाढते आणि याचा दूरगामी परिणाम सागरी प्रवाहावर होतो आणि या प्रवाहाचा परिणाम तापमान वाढीवर होतो असे हे दुष्टचक्र सुरू होते आणि पर्यावरणाला दूषित करते. प्रदूषणाला जितके उद्योग तितकेच लोकसुद्धा जबाबदार आहेत.
आपण आपले घर कसे स्वच्छ राहील एवढाच विचार करतो, पण आजूबाजूचा परिसर साफ ठेवला पाहिजे याचा कोण विचार करणार? वर्षाला प्रत्येकाने एक झाड लावले पाहिजे, जगवले पाहिजे यासाठी पुढाकार आपणच घ्यायला हवा. सरकार सर्व काही करेल, आपण मात्र हातावर हात ठेवून राहणार असू तर एक दिवस वाढते तापमान माणसाला जगवणाऱ्या पृथ्वीच्या मुळावर येणार आहे. लोकांची मानसिकता बदलली तरच सरकारही बदलेल. आता आपण कोणत्याही स्थितीत पर्यावरणाचा ऱ्हास थांबवलाच पाहिजे. नाहीतर पुढच्या पिढीचे भविष्य अंधकारमय आहे.






























































