
>> सुनील कुवरे
यंदा उन्हाळ्याच्या सुरुवातीपासूनच, म्हणजे मार्च महिन्यापासून संपूर्ण महाराष्ट्रासह देशाच्या उत्तर मैदानी प्रदेश, वायव्य तसेच मध्य हिंदुस्थानात उष्णतेची लाट तीव्रपणे जाणवत असून, उकाडय़ामुळे नागरिक हैराण झाले आहेत. उष्णतेच्या लाटेची तीव्रता अधिक वाढत आहे. मुंबई शहरात मार्च महिन्यात तापमानाने चाळिशी ओलांडली. तेव्हाच पुढील दोन महिने कसे असतील, याची चाहूल लागली होती, ती चाहूल खरी ठरली. विदर्भातील ब्रम्हपुरी, चंद्रपूर, अकोला या शहरांतील तापमान हे धडकी भरवणारे आहे. ही तीन शहरे देशातील नव्हे तर जगातील सर्वाधिक उष्ण शहरे ठरली आहेत. गेल्या 100 वर्षांत पृथ्वीचे तापमान 0.8 डिग्रीने वाढले आहे, तर गेल्या तीन दशकांत 0.6 डिग्रीने तापमान वाढले आहे. हाच तापमान वाढीचा धोका लक्षात घेता देशातील वाढते तापमान हे धोकादायक पातळीकडे वाटचाल करीत असल्याचे हवामान तज्ञांनी म्हटले आहे. कारण यंदा उष्णतेची पहिली लाट मार्च महिन्यात नोंदवली गेली. मार्च महिन्यात तापमानाने 121 वर्षांचा विक्रम मोडीत काढला. देशाने विक्रमी तापमानाचा अनुभव घेतल्यानंतर देशाच्या अनेक राज्यांत सरासरीपेक्षा अधिक तापमान नोंदवले गेले आहे. काही राज्यांत 47 अंश सेल्सिअस तापमान नोंदविले गेले. हिंदुस्थानचे नंदनवन असलेल्या जम्मू आणि कश्मीरमधील तापमानसुद्धा 47 अंश सेल्सिअस नोंदविले गेले. यावरून उष्णतेच्या लाटेची तीव्रता किती आहे, हे आपण लक्षात घेतले पाहिजे.
विदर्भातील उन्हाळ्याचा अनुभव आता संपूर्ण महाराष्ट्र अनुभवत आहे. पश्चिम महाराष्ट्रात कमाल तापमान 41 ते 43 अंश सेल्सिअस इतके आहे. मुंबई तसेच कोकणातसुद्धा तापमानात वाढ होत आहे, परंतु यंदाच्या उष्णतेच्या लाटेमुळे महिनाभरात 25 जणांचा बळी गेला. यातील सर्वाधिक 41 टक्के बळी हे एकटय़ा नागपूरमध्ये झाले आहेत. ही बळींची संख्या गेल्या आठ वर्षांतील उच्चांकी ठरली आहे, तर दुसरीकडे 374 लोकांना उष्माघाताचा आजार झाला आहे. उष्माघाताने जे बळी गेले आहेत, त्यांच्या नातेवाईकांना राज्य सरकारने भरपाई देण्याचा विचार करायला हवा. केंद्र सरकारने या उष्णतेच्या लाटेची तीव्रता लक्षात घेऊन राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांना पिण्याचे पुरेसे पाणी, आवश्यक असलेली औषधे, वैद्यकीय उपकरणांची सुविधा सज्ज ठेवण्याच्या सूचना केल्या आहेत. तसेच जास्त उष्णता असलेल्या भागात गारवा देणारी उपकरणे कार्यरत ठेवावी. उष्माघात आजारांच्या बाबतीत राष्ट्रीय कृती आराखडय़ातील मार्गदर्शक तत्त्वांची सर्व जिह्यांमध्ये अंमलबजावणी करावी, अशा अनेक सूचना केल्या आहेत. नागरिकांनीसुद्धा उष्माघातापासून आपल्या आरोग्याची काळजी घेतली पाहिजे.
गेली काही वर्षे संपूर्ण जगाप्रमाणे आपल्या देशालाही बदलत्या हवामानाचा सामना करावा लागत आहे. महाराष्ट्राला वर्षाचे बाराही महिने कधी अवकाळी पाऊस, कधी चक्रीवादळे तर कधी गारपिठीसारख्या आपत्तींना सामोरे जावे लागते आहे. यंदा तर चांगला पाऊस पडूनही कडक उन्हाळ्यामुळे पाण्याची पातळी कमी झाली आहे. कारण राज्यातील वाढत्या तापमानामुळे पाण्याच्या बाष्पीभवनचा वेग कमालीचा वाढला. ग्रामीण भागातील अनेक धरणे कोरडी पडली आहेत. सिमेंट काँक्रीटचे जाळे पसरले आहे. त्यासाठी मोठय़ा प्रमाणावर वृक्षतोड केली जात आहे. याच वृक्षतोडीमुळे वातावरणातील बदल घडून येत आहेत. यामध्ये अवेळी पडणारा पाऊस, उष्णतावाढ, कांदळवनाची कत्तल, बदलते निसर्गचक्र अशी तापमान वाढीची अनेक कारणे आहेत. तसेच जागतिक तापमानवाढीचा परिणाम समुद्राच्या पातळीत वाढ होत आहे. पर्यावरण तज्ञांच्या मते गेल्या तीन-चार दशकांत बंगालच्या उपसागरात उष्णतेच्या लाटेचे प्रमाण तिप्पट वाढले आहे. त्यामुळे समुद्रमार्गे नैसर्गिक आपत्तीत झालेली वाढ ही खरी चिंतेची बाब आहे.
हवामान तज्ञांच्या मते पर्यावरणाकडे गांभीर्यपूर्वक लक्ष देणे आवश्यक आहे, अन्यथा त्याचे परिणाम भविष्यात भोगावे लागतील. निसर्गाचे काही नियम असतात त्याप्रमाणे हवामानातील बदल घडत असतात. अलीकडे तापमानाचा वाढता पारा हा मानव निर्मित कारणामुळे त्याची तीव्रता कमी अधिक होत असते. त्यादृष्टीने कोणीही गंभीरपणे विचार करायला तयार नाही. कारण 1972 ते 2019 या कालावधीत उष्णेतेच्या लाटा जवळपास 700 च्या वर घडल्या आहेत. गेल्या पाच वर्षांत अति उष्णतेच्या घटना घडल्या आहेत. त्याचा परिणाम दीर्घकालीन होण्याची भीती आहे. तापमानवाढीचा इशारा लक्षात घेऊन केंद्र आणि राज्य सरकारने पर्यावरणपूरक योजना हाती घ्यायला हव्यात. राज्य सरकारनेसुद्धा गांभीर्याने दखल घेतली पाहिजे. तात्पुरत्या उपाययोजनांमधून काहीच साध्य होत नाही. जर परिस्थितीनुसार नियोजन केले तर भविष्यातील धोके कमी करता येतील.





























































